५) माय लेकरं- शिक्षण
घरात तसे फार कोणी शिकलेलं नव्हतं. मामा तेवढे बी. कॉम. झाले होते, तसेच दहावीत पारगांवमध्ये पहिले आले होते. त्याकाळात बी. कॉम. होऊनही त्यांना नोकरी काही मिळत नव्हती. शेवटी कशीबशी एका कंपनीत कामगार म्हणून मामा रुजू झाले जिथे शिक्षणाचा काडीमात्र संबंध नव्हता. मामांना शिक्षणायोग्य काम मिळाले नाही याची खंत आईला अजूनही आहे. आई अशिक्षित असली तरी शिक्षणाचे महत्व ती जाणून होती. तिने मला शिक्षणासाठी गरजेच्या गोष्टींची कधी कमतरता जाणवू दिली नाही. दहावी-बारावीपर्यंत शिक्षणासाठीचा रुळलेला मार्ग होता आणि त्यानंतर डी. एड किंवा बी.ए. बी. एड. अशी सरळधोपट शिक्षणपद्धती होती. मला बारावीनंतर डी. एडला प्रवेश न मिळाल्याने दाजींच्या(आतेभाऊ) आग्रहास्तव नाईलाजानेच आणि खूप मोठ्या धाडसाने डिप्लोमाला प्रवेश घेतला.
धाडस यासाठी की बारावीपर्यंतचे शिक्षण रडतखडत पूर्ण केले असताना, या पुढच्या शिक्षणाचा व बाहेरगावी (कोल्हापूर) राहण्याखाण्याचा खर्च झेपण्यापलीकडचा होता. शिवाय अभ्यासातही मी सर्वसामान्य होतो, आठवी-नववीपर्यंत शाळेत तिसरा येत असलो तरी बऱ्याचदा गणितात नापास व्हायचो तेही अगदी पाचवीपासून दहावीत देखील तेवढीच चिंता होती अखेरीस गणितात जवळपास काठावरच सुटलो होतो. त्यामुळे दहावीनंतर कॉमर्स, सायन्सचा विचार न करता सरळ आर्ट्सला प्रवेश घेतला, अर्थात वेगळे काही करण्यासाठी मार्गदर्शन करणारेही कोणी नव्हते. डिप्लोमा अर्थातच झेपण्यासारखा वाटत नव्हताच आणि झालेही तसेच आवडीचे राज्यशास्त्र, सहकार, शिक्षणशास्त्र सोडून फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्रीशी केमिस्ट्री जुळली नाही. पहिल्या सेमिस्टरलाच सीएसके वगळता सर्व विषयांत दांड्या उडाल्या अगदी शून्यावर सुद्धा. सुदैवाने त्याचवर्षी काही नियमांत बदल झाल्यामुळे पुढच्या सेमिस्टरला प्रवेश मिळाला. अन्यथा वर्ष वाया गेलेच असते कदाचित इतर विद्यार्थी जसे डिप्लोमा सोडून जातात तशी वेळ माझ्यावरही आली असती.
डिप्लोमा सोडून पुन्हा घरी जावे लागले तर काय होईल याचे भयानक विदारक चित्र डोळ्यांसमोरून तरळून गेले. डिप्लोमाला नाईलाजाने का होईना आलो असलो तरी आता काही झाले तरी माघार घ्यायची नाही असं मनोमन ठरवलं पण मॅथ्स-१,२,३ काहीकेल्या पाठ सोडायला तयार नव्हते, त्यात बऱ्याचदा भोपळाच मिळायचा. पुढे मॅथ्स गेलं आणि प्रोग्रॅमिंग आलं त्यातही तीच बोंब होती पण तरीही हळूहळू बॅकलॉग कमी करत गेलो, तिसऱ्या वर्षाला जाईपर्यंत केवळ एम३ बाकी राहिला होता. इथेही ना प्रोग्रॅमिंग जमत होते, ना डेटाबेस जमत होता पण क्लास वैगरे चा विचारही डोक्यात येत नव्हता. कॉलेजची फी अधिक मेसच्या खर्चाचीच तजवीज करणे अवघड होते त्यामुळे क्लास वैगरेचा प्रश्नच नव्हता. पाठांतर हा एकमेव पर्याय होता आणि त्याचाच अवलंब करून एकेक पायरी पुढे सरकत होतो.
प्रत्येक सेमिस्टरनंतर मला कॉलेज जॉईन करायला उशीर व्हायचा. कॉलेजची फी व मेसच्या खर्चासाठी पैशाची जमवाजमव करायला वेळ लागायचा. त्यातच गावी भयंकर दुष्काळ पडला होता, आर्थिक परिस्थिती अजूनच बिकट होत चालली होती. रोजगार हमीची कामे असायची त्याच्यावर अन्नधान्य भेटायचे पण पैशाचा काहीच स्रोत नव्हता. शेवटी आईला मामांकडे सहजपुरला जावे लागले, तिथे आईने मजुरी करून जमवलेले पैसे त्यात काही भर टाकून मामा मनीऑर्डर करत असे. सुट्टीत दाजींकडे गेलो की ते मला घरात अडकवलेल्या कपड्यांमधून तुला जे बसतील,आवडतील ते ड्रेस घेऊन जा म्हणून सांगायचे. त्यांच्याकडून घेतलेला मायक्रोचेक्सचा निळा व दुसरा ब्लॅक अँड व्हाईट शर्ट आणि एक कॉटनची क्रीम कलरची ट्राउझर यावर बहुतांश डिप्लोमा पूर्ण केला. आज पंधरा सोळा वर्षांनंतरही त्या शर्टचा एक तुकडा जरी दिसला तरी मी ओळखू शकतो, अक्षरशः पूर्णपणे विरून जाईपर्यंत ते शर्ट वापरले होते. अखेरीस कॉलेजमध्येही युनिफॉर्मची सक्ती झाल्याने सुटकेचा निश्वास टाकला.
शेवटच्या वर्षी मॅथ्स ३ सोडवायचाच या जिद्दीने प्रयत्न करूनही शेवटी तो काठावर राहिलाच आणि एक सेमिस्टर वाढणार हे निश्चित झाले. इतर विषयांत चांगले गुण मिळाल्याने मला डिप्लोमाला डिस्टिंक्शन मिळालं, पण केवळ मॅथ्स ३ राहिल्यामुळे आता पुढच्या सेमिस्टरची वाट पाहण्याव्यतिरिक्त माझ्या हातात काहीच पर्याय नव्हता. पारगावला परतल्यानंतरचा काळ मात्र खडतर होता, डिप्लोमा झाला आता नोकरी मिळेलच असे सर्वांना वाटतं होते, प्रत्येकाच्या प्रश्नाला, कुजबुजीला काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते. शेवटी री-रजिस्ट्रेशनचे फॉर्म सुटल्यानंतर, फॉर्म भरून येतानाच आप्पा बळवंत चौकातून मॅथ्स३ चे पुस्तक आणले मात्र घरी काही अभ्यास जमेना अखेर पेपरला पंधरा दिवस असताना कोल्हापूरला गेलो. समदुःखी मित्र युवराज पाटील भेटला, त्याची अभ्यासाला सोबत झालीच शिवाय त्याच्या रूमवर रहायची सोयही झाली. टर्मला वीस पैकी शून्य असल्यामुळे आता ८० पैकी ४० मार्क्स मिळवणे गरजेचे होते. पंधरा दिवस रात्रंदिवस फॉर्म्युले आणि संपूर्ण पुस्तक असे पाठ केलं की पेपरला जाण्याच्या आधीच ८० पैकी ८० पडतील याची खात्री होती. निकाल हातात पडेपर्यंत ८० ची अपेक्षा होती मात्र ६७ मिळाले, काहीसा अपेक्षाभंग झाला पण कायम शून्य पदरात पडणाऱ्याला हे खूप होते. डिप्लोमा पूर्ण झाला होता, खूप मोकळं वाटत होते. पहिल्या सेमिस्टरच्या ३० टक्क्यांवरून डिस्टिंक्शनपर्यंतचा थोडक्यात न झेपण्यावरून झेपावण्यापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास मला स्वतःला अजूनही अभिमानास्पद वाटतो.

0 प्रतिक्रिया:
Post a Comment