Ads 468x60px

Friday, March 20, 2020

मानवजात

आम्ही सर्वश्रेष्ठ, आम्ही सर्व शक्तिशाली.
आमुच्या हाती असे विनाशाच्या मशाली.
आम्ही वणवे पेटवू, आम्हीच झाडे तोडू.
प्राणी, पक्षी, सारे सजीवच जिंवत गाडू.
आम्ही करू विकास, धरती  करू भकास.
गुदमरे जरी श्वास, करू पर्यावरणाचा ऱ्हास.
हवापाणी दूषित करू, सारं वातावरण बिघडवू.
स्वार्थापोटी नियम सारे, आम्ही पायदळी तुडवू.
देवदानवा आम्ही निर्मिले, आम्हां कसली भिती.
साऱ्या विश्वाचा रहाटगाडा, आता आमुच्या हाती.
आमुची स्पर्धा आमुच्याशी, विध्वंसाचा खेळ मांडू.
देशा-धर्मात आम्ही विभागू, सारे एकमेकांशी लढू. 
क्षेपणास्त्र सुसज्ज आम्ही, हवा तेवढा संहार करू.
क्षणात सृष्टी भस्मसात करू, आम्ही कधी ना हरू.
वर्चस्वाची आस विज्ञानाची कास, करती ही प्रगती.
तरी भयभीत होती सारे, कळेना काय ही अधोगती.
एक अतिसूक्ष्म विषाणू,जो न दिसे दृष्टीला.
देई आव्हान, मानवजातीच्या अस्तित्वाला.
क्षणात पलटे बाजू, इथे काही नसे शाश्वत.
बेशिस्त मनुष्यजात, झाली स्वगृही बंदिस्त. 
हेवेदावे क्षणात विरघळती, सारे होती एक.
हरवण्या त्यांस, मिळून उपाय शोधती अनेक.
सर्वशक्तिमान, असहाय्य तो हिमनगाचे टोक.
उमगेल का मानवां, काय बरोबर काय चूक.
                                
                                             संतोबा...

Thursday, March 19, 2020

नातीगोती-२

पुरे झाल्या विनवण्या अन् पुरे झाल्या मिनतवाऱ्या. 
वाटलं होईल दुरावा दूर अन् सांधतील नात्यातील दऱ्या.
ह्याच पोकळ आशेपायी, झिजवले उंबरठे अन् पायऱ्या. 
आश्वासनांच्या थापा साऱ्या, किती खोट्या किती खऱ्या.
नात्यांच्या विश्वासापोटी घडल्या केवळ वांझोट्या वाऱ्या.
स्वार्थच ठरला वरचढ, न झाल्या कसल्याच अपेक्षा पुऱ्या.

पुरे झाले आता सारे हेवेदावे, अन् पुरे झाले डावपेच.
कोर्टकचेरीचे शुक्लाष्ठ मागे, पावलोपावली लागे ठेच.
सुंभ जळाला पीळ सुटेना, साधासरळ वाद मिटेनाच.
आयुष्य निघालं मावळतीला, सुटकेचा मार्ग दिसेनाच.
गुंठ्याच्या तुकड्यापायी, दलालांचा चौफेर नंगानाच.
हक्काचा हक्क मिळवण्या, किती हा जीवघेणा जाच.

पुरे झाले रुसवे फुगवे, अन् पुरे झाले मानपान.
हक्काची सर्वां जाण, कर्तव्याचे न कोणा भान.
सण-समारंभ ठरती,मानपान नाट्यास वरदान. 
पाहुण्यांरावळ्यांची उठबस, आणती कंठाशी प्राण.
नाती सांभाळ-सांभाळता, गहाण पडतो अभिमान.
तरी सदा उसवतच राहती, दुरावल्या नात्यांची वीण.

पुरे झालं देणंघेणं, अन् रुक्ष नात्यांचा व्यवहार सांभाळणं.
घ्यायला असतं हात पसरणं अन् परतफेडीला विव्हळणं.
मुद्दल राही बाजूला, व्याज म्हणून बदनामी अन् भांडण.
देऊन सवरून आपलीच चूक, जणू सारेच दिले आंदण.
नात्यागोत्यांनी लावलाय फास, झालीत गळ्यातलं लोढणं. 
धड तुटेना, ना धड जुळेना, झालंय अवघड जागचे दुखणं.

वाटतंय आता नात्यांच्या जोखडातून व्हावं एकदा मुक्त.
बेरीज-वजाबाकी सारं सोडून, खुशाल जगावे मनसोक्त.
भीडभाड न बाळगावी कोणाची, व्हावं मनमोकळं व्यक्त.
आधार-उधार नको कोणाचं,आपण आपल्यासाठी फक्त.
आपणच असू आपला देव अन् आपणच आपला भक्त.
राज्यही असेल आपलेच अन् आपलेच असेल तख्त.

                                                        संतोबा.

Saturday, March 14, 2020

६) माय लेकरं- शिक्षण

५) माय लेकरं- शिक्षण
                घरात तसे फार कोणी शिकलेलं नव्हतं. मामा तेवढे बी. कॉम. झाले होते, तसेच दहावीत पारगांवमध्ये पहिले आले होते. त्याकाळात बी. कॉम. होऊनही त्यांना नोकरी काही मिळत नव्हती. शेवटी कशीबशी एका कंपनीत कामगार म्हणून मामा रुजू झाले जिथे शिक्षणाचा काडीमात्र संबंध नव्हता. मामांना शिक्षणायोग्य काम मिळाले नाही याची खंत आईला अजूनही आहे. आई अशिक्षित असली तरी शिक्षणाचे महत्व ती जाणून होती. तिने मला शिक्षणासाठी गरजेच्या गोष्टींची कधी कमतरता जाणवू दिली नाही. दहावी-बारावीपर्यंत शिक्षणासाठीचा रुळलेला मार्ग होता आणि त्यानंतर डी. एड किंवा बी.ए. बी. एड. अशी सरळधोपट शिक्षणपद्धती होती. मला बारावीनंतर डी. एडला प्रवेश न मिळाल्याने दाजींच्या(आतेभाऊ) आग्रहास्तव नाईलाजानेच आणि खूप मोठ्या धाडसाने डिप्लोमाला प्रवेश घेतला.
              धाडस यासाठी की बारावीपर्यंतचे शिक्षण रडतखडत पूर्ण केले असताना, या पुढच्या शिक्षणाचा व बाहेरगावी (कोल्हापूर) राहण्याखाण्याचा खर्च झेपण्यापलीकडचा होता. शिवाय अभ्यासातही मी सर्वसामान्य होतो, आठवी-नववीपर्यंत शाळेत तिसरा येत असलो तरी बऱ्याचदा गणितात नापास व्हायचो तेही अगदी पाचवीपासून दहावीत देखील तेवढीच चिंता होती अखेरीस गणितात जवळपास काठावरच सुटलो होतो. त्यामुळे दहावीनंतर कॉमर्स, सायन्सचा विचार न करता सरळ आर्ट्सला प्रवेश घेतला, अर्थात वेगळे काही करण्यासाठी मार्गदर्शन करणारेही कोणी नव्हते. डिप्लोमा अर्थातच झेपण्यासारखा वाटत नव्हताच आणि झालेही तसेच आवडीचे राज्यशास्त्र, सहकार, शिक्षणशास्त्र सोडून फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्रीशी केमिस्ट्री जुळली नाही. पहिल्या सेमिस्टरलाच सीएसके वगळता सर्व विषयांत दांड्या उडाल्या अगदी शून्यावर सुद्धा. सुदैवाने त्याचवर्षी काही नियमांत बदल झाल्यामुळे पुढच्या सेमिस्टरला प्रवेश मिळाला. अन्यथा वर्ष वाया गेलेच असते कदाचित इतर विद्यार्थी जसे डिप्लोमा सोडून जातात तशी वेळ माझ्यावरही आली असती.            
            डिप्लोमा सोडून पुन्हा घरी जावे लागले तर काय होईल याचे भयानक विदारक चित्र डोळ्यांसमोरून तरळून गेले. डिप्लोमाला नाईलाजाने का होईना आलो असलो तरी आता काही झाले तरी माघार घ्यायची नाही असं मनोमन ठरवलं पण मॅथ्स-१,२,३ काहीकेल्या पाठ सोडायला तयार नव्हते, त्यात बऱ्याचदा भोपळाच मिळायचा. पुढे मॅथ्स गेलं आणि प्रोग्रॅमिंग आलं त्यातही तीच बोंब होती पण तरीही हळूहळू बॅकलॉग कमी करत गेलो, तिसऱ्या वर्षाला जाईपर्यंत केवळ एम३ बाकी राहिला होता. इथेही ना प्रोग्रॅमिंग जमत होते, ना डेटाबेस जमत होता पण क्लास वैगरे चा विचारही डोक्यात येत नव्हता. कॉलेजची फी अधिक मेसच्या खर्चाचीच तजवीज करणे अवघड होते त्यामुळे क्लास वैगरेचा प्रश्नच नव्हता. पाठांतर हा एकमेव पर्याय होता आणि त्याचाच अवलंब करून एकेक पायरी पुढे सरकत होतो.
                प्रत्येक सेमिस्टरनंतर मला कॉलेज जॉईन करायला उशीर व्हायचा. कॉलेजची फी व मेसच्या खर्चासाठी पैशाची जमवाजमव करायला वेळ लागायचा. त्यातच गावी भयंकर दुष्काळ पडला होता, आर्थिक परिस्थिती अजूनच बिकट होत चालली होती. रोजगार हमीची कामे असायची त्याच्यावर अन्नधान्य भेटायचे पण पैशाचा काहीच स्रोत नव्हता. शेवटी आईला मामांकडे सहजपुरला जावे लागले, तिथे आईने मजुरी करून जमवलेले पैसे त्यात काही भर टाकून मामा मनीऑर्डर करत असे.  सुट्टीत दाजींकडे गेलो की ते मला घरात अडकवलेल्या कपड्यांमधून तुला जे बसतील,आवडतील ते ड्रेस घेऊन जा म्हणून सांगायचे. त्यांच्याकडून घेतलेला  मायक्रोचेक्सचा निळा व दुसरा  ब्लॅक अँड व्हाईट शर्ट आणि एक कॉटनची क्रीम कलरची ट्राउझर यावर बहुतांश डिप्लोमा पूर्ण केला. आज पंधरा सोळा वर्षांनंतरही त्या शर्टचा एक तुकडा जरी दिसला तरी मी ओळखू शकतो, अक्षरशः पूर्णपणे विरून जाईपर्यंत ते शर्ट वापरले होते. अखेरीस कॉलेजमध्येही युनिफॉर्मची सक्ती झाल्याने सुटकेचा निश्वास टाकला.
             शेवटच्या वर्षी मॅथ्स ३ सोडवायचाच या जिद्दीने प्रयत्न करूनही शेवटी तो काठावर राहिलाच आणि एक सेमिस्टर वाढणार हे निश्चित झाले. इतर विषयांत चांगले गुण मिळाल्याने मला डिप्लोमाला डिस्टिंक्शन मिळालं, पण केवळ मॅथ्स ३ राहिल्यामुळे आता पुढच्या सेमिस्टरची वाट पाहण्याव्यतिरिक्त माझ्या हातात काहीच पर्याय नव्हता. पारगावला परतल्यानंतरचा काळ मात्र खडतर होता, डिप्लोमा झाला आता नोकरी मिळेलच असे सर्वांना वाटतं होते, प्रत्येकाच्या प्रश्नाला, कुजबुजीला काय उत्तर द्यावे हे कळत नव्हते. शेवटी री-रजिस्ट्रेशनचे फॉर्म सुटल्यानंतर, फॉर्म भरून येतानाच आप्पा बळवंत चौकातून मॅथ्स३ चे पुस्तक आणले मात्र घरी काही अभ्यास जमेना अखेर पेपरला पंधरा दिवस असताना कोल्हापूरला गेलो. समदुःखी मित्र युवराज पाटील भेटला, त्याची अभ्यासाला सोबत झालीच शिवाय  त्याच्या रूमवर रहायची सोयही झाली. टर्मला वीस पैकी शून्य असल्यामुळे आता ८०  पैकी ४० मार्क्स मिळवणे गरजेचे होते. पंधरा दिवस रात्रंदिवस फॉर्म्युले आणि संपूर्ण पुस्तक असे पाठ केलं की पेपरला जाण्याच्या आधीच ८० पैकी ८० पडतील याची खात्री होती. निकाल हातात पडेपर्यंत ८० ची अपेक्षा होती मात्र ६७ मिळाले, काहीसा अपेक्षाभंग झाला पण कायम शून्य पदरात पडणाऱ्याला हे खूप होते. डिप्लोमा पूर्ण झाला होता, खूप मोकळं वाटत होते. पहिल्या सेमिस्टरच्या ३० टक्क्यांवरून डिस्टिंक्शनपर्यंतचा थोडक्यात न झेपण्यावरून झेपावण्यापर्यंतचा अविश्वसनीय प्रवास मला स्वतःला अजूनही अभिमानास्पद वाटतो.

४) माय लेकरं - बाप

                   वडिलांनी आतापर्यंत माझ्यासाठी काहीही न करणे ही त्यांनी माझ्यासाठी केलेली सर्वात मोठी गोष्ट आहे. घरातील कर्ता पुरुष व्यसनाधीन असेल तर त्या कुटुंबातील स्त्रीला संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते, व्यसनाधीनतेचा विळख्यात असलेल्या अनेक कुटुंबाची अशी रडकथा आहे. माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे  वडिलांनी जरी माझ्यासाठी काही केलं नसले तरी इतरांप्रमाणे त्यांनी वडिलकीचा हक्क कधीही गाजवला नाही किंवा स्वतःचे कोणतेही निर्णय माझ्यावर लादले नाहीत.  अगदी लहानपणापासून ते आजपर्यंतच्या आयुष्यात त्यांनी कधीही माझ्या कोणत्याही निर्णयात कधीही कसलाही हस्तक्षेप केला  नाही. आजही घरात मी एखाद्या कामाबद्दल बोलत असतो तेव्हा माझं म्हणणं पूर्ण व्हायच्या आत "बापू बोलतोय तेच बरोबर आहे" असे म्हणत त्यांनी मला तात्काळ पाठिंबा दिलेला असतो. त्यांच्या दृष्टीने मी जे करतो ते सगळं बरोबरच असते.
                 वडिलांना आम्ही भाऊ म्हणतो, भाऊंना चार बहिणी व ते असे पाच जण, भाऊ एकुलते एक वारस.आजोबांना बैल पाळण्याचा शौक होता, त्यासाठी ते बाजारातून लहान गोर्‍हा आणून त्यास व्यवस्थित सांभाळून शेतीचे कामे शिकवत. त्यांचा हा उपक्रम सतत चालू असे त्यापैकी जो चांगला असेल तो घरच्या कामासाठी ठेऊन बाकीचे विकायचे. अर्थात त्यामुळे बैलपोळयाला सर्वात डौलदार बैलजोडी आमचीच असायची.आजही कोणी वयस्कर व्यक्ती भेटली तर ओळख सांगितल्या बरोबर  त्या व्यक्तीचा पहिला प्रश्न "तुमची बैलं आहेत का अजून?."  हाच असतो. घरी बैल बारदाना चांगला असल्याने घरच्या शेतीशिवाय वाट्याने अनेकांची शेती केली जात असे. वडील शेतीच्या सर्व कामांत निष्णात होते. मग ते नांगराचे तास असो वा साऱ्याचा दंड असो सारं काही आखीवरेखीव असायचे. कामाला वेळ लागला तरी चालेल पण कामात चालढकल त्यांना चालणार नाही. 
               माझ्या दोन्ही आई गावातील,  त्यामुळे गावातील सर्व परिचित लोक वडिलांना दाजी म्हणूनच बोलवत (पुढे हा वारसा मी चालवला). वडील म्हणजे एकदम देवमाणूस, कधी कोणाशी भांडण नाही, कोणाशी कसला वाद नाही. भावकीतही बांधाला बांध, सामाईक विहीर, उभ्या पिकाला गाईगुरांची वर्दळ लागायची पण भाऊ कधी कोणाला एक शब्दाने बोलणार नाही. दोन्ही आईंना असलं काही खपायचं नाही, त्या भांडायच्या पण भाऊ म्हणायचे " तेवढे नुकसान झालं म्हणून आपल्याला काही कमी पडणार आहे का?". कोणी कितीही त्रास दिला तरी भाऊ कोणाला ही काही बोलायचे नाहीत याचा दोन्ही आईंना फार राग असायचा. जगासाठी चांगली असलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी तितकीच चांगली असेल असं नसते. दादांना(आजोबा) आपले कुटुंब पुढे नेण्याची, प्रगती करण्याची फार जिद्द, इरशिर(ईर्ष्या) होती. भाऊंच्या मध्ये ती अजिबात नव्हती, त्यांनी भविष्याचा विचार कधीच केला नाही स्वतःच्या नाही अन दुसऱ्याच्याही नाही. 
             भाऊंना व्यसन जरी असले तरी कष्ट करण्यात ते कुठे कमी नव्हते, घरची आणि बाहेरचीही अनेक जणांची शेती करत असल्याने भाऊंनी त्यांच्या लहानपणापासून फार कष्ट केलेत. चांगले काम, प्रामाणिकपणा यामुळे त्यांना  भाड्यातोड्याचीही अनेक कामे मिळायची. एवढे सगळे करूनही प्रगतीच्या ऐवजी दिवसेंदिवस अधोगतीच होत होती. त्यासाठी कोणत्याही गोष्टीस जबाबदार धरता येणार नाही कारण पाचवीला पुजलेला दुष्काळ, बेभरवशाची बाजारपेठ त्यामुळे कोरडवाहू शेतीतून प्रगती हे एक दिवास्वप्नच होतं. भाऊंकडे थोडी दूरदृष्टी असती, कोणाचे तरी थोडं पाठबळ असते तर निदान आहे तेवढी शेती टिकवता आली असती.भाऊंकडे काळ्या मातीतून सोनं पिकवायची कला होती पण दूरदृष्टीचा अभाव आणि व्यसनापायी साऱ्याचीच माती झाली.
              भाऊंना शेतीबरोबरच, पाळीव प्राण्यांची फार आवड, त्यातल्या त्यात गाई-बैलांवर त्यांचा फार जीव, जन्मल्याबरोबर कालवड असो वा खोंड त्यांच नामकरण होणारचं, भाऊ माणसांशी कमी बोलतील पण प्राण्यांशी गप्पा मारणार. आज त्यांचे वय ऐंशीपार झाले असले तरी या वयातही ते नियमित गाईला रानात घेऊन जाणारच पण आता वयोमानानुसार त्यांना जमणार नाही, रस्त्याने जाता येता ओढाताणीत पडून काही दुखापत व्हायला नको म्हणून आम्ही तीनेक महिन्यांपूर्वी गाई विकली. अर्थात गाय विकण्यास भाऊंचा विरोध होता, त्यामुळे गाय विकल्यापासून थोडेदिवस भाऊ नाराज होते. माझ्या जन्मापूर्वी आमची संत्र्याची बाग होती, सामाईक असल्यातरी विहिरींना पाणी असल्यामुळे ज्वारीबाजरी बरोबर कांदा, माळवं असायचं. भावकी आणि धावपळ करायला कोणी नसल्याने जवळपास गेल्या दोन दशकांपासून आम्ही सामाईक हिस्यातून स्वतःहूनच बेदखल झाले आहोत. आपली स्वतःची विहीर, पाईपलाईन, फळबाग असावी अशी भाऊंची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. पण सध्या शेतीचा वाद कोर्टात असल्यामुळे तूर्तास हे सगळे बाजूला पडलंय. सध्यातरी कोर्टाचा निकाल लवकर लागून  हा वाद मिटावा व भाऊंची इच्छा लवकर पुरी व्हावी एवढीच अपेक्षा करू शकतो.  ज्यादिवशी शेतीचा वाद मिटेल त्यावेळी मी तात्काळ विहीर,पाईपलाईन आणि फळबाग लागवड करणार हे निश्चित. आई-बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यापेक्षा दुसरे मोठे कोणतं सुख असू शकते. 

३) माय लेकरं- जडणघडण

              माझ्यासाठी आई आणि बाप दोन्ही जबाबदाऱ्या आईलाच पार पाडाव्या लागत होत्या त्यामुळे माझ्यासाठी माझी आईच सारं जग होते. आम्ही मामांकडे रहायला होतो, त्यावेळी मामांचे कौलारू घर आणि समोर गव्हाच्या काड्यांची पडवी होती. मी साधारण आठेक वर्षांचा असेन, उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून आम्ही बाहेर पडवीमध्ये झोपलो होतो. अचानक मध्यरात्री छपरामधून माझ्या अंगावर विंचू पडला व दोन ठिकाणी चावला. त्यापूर्वी मला कधीही विंचू चावला नव्हता, मला असह्य वेदना होऊ लागल्या. चौगुलेवस्तीवरील अंकुश तात्या विष उतरवून देत असे पण सकाळ होईपर्यंत मला धीर धरवेल अशी शक्यताच नव्हती. बाहेर काळाकभिन्न अंधार, गुळवे वस्तीवर हाताच्या बोटावर मोजता येणारी घरे अन एवढ्या अपरात्री सोबत कोणी येण्याची शक्यता नव्हती. नांनाही एवढ्या अंधारात येणं शक्य नव्हते. शेवटी आईने मला पाठीवर उचलून घेतलं व ओढ्यातून, खाचखलग्यातून, काट्याकुट्यातून आम्ही अंकुश तात्याकडे निघालो. मी कमीतकमी पंचवीसेक किलोचा तरी नक्की असेन. धडपडत कसेबसे एक किलोमीटरहून अधिक अंतर चालत आम्ही तात्यांच्या घरी पोहोचलो. तात्यांना झोपेतून उठवलं तर आम्हां दोघांना बघून अंकुश तात्याही अचंबित झाले, "सखुबाई कमाल आहे तुझी, एवढ्या रात्री एकटी कशी काय आलीस?. रस्ता कसला, अंधार किती चार बाप्ये माणसं अशावेळी यायला घाबरतील". असे म्हणत तात्यांनी कसला तरी झाडपाला आणला आणि काहीतरी पुटपुटत विंचू चावलेल्या जागी लावला. मला बऱ्यापैकी आराम पडला.
                  आईच्या अंगात एवढं बळ कोठून आले असेल की एवढ्या अपरात्री, माझे पंचवीसेक किलोचे वजन घेऊन अंधारात ओढ्यातून, खाचखलग्यातून, काट्याकुट्यातून एक दिड किलोमीटर चालली असेल. आपल्या लेकरासाठी एक आई किती कणखर होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण होते. जसे माझ्यासाठी माझी आई हेच विश्व तसेच तिच्यासाठी मीच तिचे विश्व होतो. आईला त्रास देणारा प्रत्येकजण माझ्यादृष्टीने व्हिलन होता. मी लहान होतो पण आईचे कष्ट मला कळत होते. आम्ही ज्यावेळी वडिलांकडे असू त्यावेळी खूप कष्ट करूनसुद्धा संध्याकाळी नेहमीची भांडणे असायची आणि त्यात आई एकटी पडायची. अर्थात फार कमीवेळा आम्ही वडिलांकडे असायचो. दिवसभर मरमर काम कारायचे आणि संध्याकाळी काही ना काही कारणाने वाद व्हायचे, मी कधी काही बोलायचो नाही पण बाहेर जाऊन अंधारात हमसून रडायचो. हे निदान दिवसांआड तरी घडायचे. तसे तर व्यसनी व्यक्ती असलेल्या घरात वाद ठरलेलेच असतात, त्यात दोन बायकांची भर त्यामुळे रोजचा वाद साहजिकच असायचा. मात्र त्याचा खोलवर परिणाम माझ्या मनावर होत होता अन त्यामुळे मी जास्तच संवेदनशील होत गेलो. 
                  मी त्यावेळी साधारण आठ-दहा वर्षांचा असेन, या सगळ्यांचा मला फार राग यायचा. मी ज्यावेळी हा राग आई समोर व्यक्त करायचो त्यावेळेस आई मला समजावयाची भांडणं आमची आहेत, तुला तर कोणी काही बोलत नाही ना त्यामुळे तू भांडणाकडे लक्ष देऊ नकोस, आमचे आम्ही बघू.  मला नेहमी वाटायचं कधीतरी वडिलांनी आईची बाजू घ्यावी पण तसे कधी घडायचे नाही. त्यामुळे त्यांचाही खूप राग यायचा पण आई म्हणायची "बाप नावाला का होईना आहे ना, ही मोठी गोष्ट आहे ज्यांना बाप नाही त्यांच्याकडे बघ". तिथून पुढे थोडासा अंतर्मुख होत गेलो कारण ज्यांना वडील नव्हते असे त्यावेळी माझे एक दोन वर्गमित्र होते, कधी वडिलांचा विषय निघाला की त्यांचे दीनवाणे चेहरे पाहून त्यांच्या दुःखाची कल्पना येत होती. तेव्हापासून आजपर्यंत अनेकदा वडिलांमुळे बऱ्याचवेळा खूप त्रास झाला पण आजपर्यंत मी कधीही एका शब्दांनी वडिलांना बोललो नाही.
             घरात कितीही वाद असले तरी आईने मला कधी सख्खा-सावत्र असा भेदभाव करू दिला नाही. थोरल्या आईला पण मी आईच म्हणायचो. तिचाही माझ्यावर फार जीव होता. माझं पूढे खूप चांगले होईल असे तिला फार मनापासून वाटायचे. मी डिप्लोमाला असताना दुर्दैवाने दुर्धर आजाराने ती आम्हांस सोडून गेली. प्रचंड दुष्काळ पडला होता, परिस्थिती अतिशय बिकट होती. माझा डिप्लोमाचा खर्च भागावा म्हणून आई मामांकडे सहजपूरला रहात होती. मी सुट्टीला आलो होतो त्यातील एक दिवस पारगांवला आलो थोरल्या आईची अवस्था पहावत नव्हती पण काही पर्याय नव्हता. मला फार असहाय्य वाटतं होते, काहीच पर्याय नसला तरी आपण काहीच करू शकत नाही याची सल आणि वैषम्य वाटतं होते, ती सल आणि वैषम्य वाटते अजूनही मला वाटते.  कॉलेज केव्हाच सुरू झाले होते, मी सहजपूरवरून कोल्हापूरला निघायची तयारी करत होतो, तेवढ्यात थोरली आई गेल्याचा फोन आला. आई आणि मी तात्काळ पारगांवकडे निघालो. त्यावेळी माझ्याकडे मोबाईल फोन नव्हता, मी कदाचित काही वेळ आधी कोल्हापूरला निघालो असतो तर मी कोल्हापूरला पोहचेपर्यंत मला हे कळलेही नसते व कदाचित तिचे अंत्यदर्शन घेता आले नसते. थोरल्या आईलाही आयुष्यात काही सुख उपभोगता आले नाही, संघर्ष आणि कष्ट तिच्याही वाटेला होतेच कारण दोन्ही आईंच्या वरचढ त्यांची तिसरी सवत दारू होती. आयुष्यभर विविध कारणांनी चिंताग्रस्त असलेला चेहरा आज निष्प्राण असूनही निश्चिंत दिसत होता. छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधणारी थोरली आई आज ह्यात असती तर निश्चितच फार खुश आणि निश्चिंत जीवन जगली असती.  
            माझा डिप्लोमाच्या आसपासचा काळ फार खडतर गेला, मोठा दुष्काळ, त्यामुळे दयनीय झालेली आर्थिक परिस्थिती. शिवाय त्याच चारपाच वर्षाच्या कालावधीत आजी-आजोबा, थोरल्या आईचा मृत्यू झाला होता. या प्रत्येक गोष्टींमुळे मी अंतर्मुख होत गेलो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही बदलत गेला. गरीबी, अन्याय ही क्रांतीची आणि गुन्हेगारीची जननी आहे असे म्हणतात. माझ्या आयुष्याची वाटचाल दोन्हीपैंकी कोणत्याही बाजूला होऊ शकली असती. आईचा एकाकी संघर्ष मी जवळून पाहिला होता शिवाय मला आईच्या कष्टाची जाण होतीच. आईचा संघर्ष हीच माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा होती. मी जर चुकीच्या मार्गाची पळवाट निवडली असती तर तो आईचा फार मोठा पराभव ठरला असता आणि मला तसे काही होऊ द्यायचे नव्हते. आणि म्हणूनच आयुष्यात मला काही करता नाही आले तरी चालेल पण आपल्या हातून काही वाईट घडू न देण्याचा प्रयत्न करायचा असा मनोमन निश्चय केला होता. अर्थात काहीवेळा अजाणतेपणी माझ्याकडून काही चुका घडल्याही पण मी त्यातून तात्काळ सावरत गेलो आणि शिकतही गेलो. खरंतर बिघडण्यासाठी फार पोषक वातावरण होते पण मी घडत गेलो. 

२) माय लेकरं - पार्श्वभूमी-२

              आईचा सासर-माहेरचा कष्टाचा प्रवास हा निरंतर चालू होता. मी थोडासा मोठा झालो, थोडंफार कळायला लागले होते. आई व मी नानांसोबत(आजोबा) आजोळीच (गुळवेवस्ती) असायचो. वडिल घरी आले की मी समजून जायचो की शेतात काहीतरी काम असेल म्हणून ते आईला कामासाठी बोलावण्यासाठी आले असणार. आईसुद्धा विनातक्रार, निमूटपणे आवरून निघायची. गुळवेवस्तीवरून शेत जवळपास अडीच तीन किलोमीटर होते. संध्याकाळी दिवस मावळतीला निघाला की परतीला निघायचं, शेतापासून थोडं पुढे आले की मुख्य डांबरी रस्त्यापासून एक पायवाट फुटायची गुळवे वस्तीकडे जाणारी. आईची पावले आपोआप वा नाईलाजने त्या पायवाटेने पुढे जायची. मला ही फाटाफूट नको वाटायची पण नाईलाज असायचा. मी ही गुमान आईच्या मागे चालू लागायचो. 
               कधी कामाचा जास्त ताण असला तर मात्र चार आठ दिवस वडिलांकडे रहायला भेटायचं पण काही ना काही कारणांमुळे वाद ठरलेला असायचा. एवढी सगळी कामे निःस्वार्थीपणे करून आई एकटी पडायची. मला हा अन्याय सहन नाही व्हायचा पण माझे काही चालण्यासारखं नव्हतं. माझी मात्र घालमेल व्हायची आईवरचा अन्याय कधी डोळ्यांनी पाहिला आहे कधी आईकडून ऐकला आहे. बऱ्याचदा वडिलांनी आईवर हात उचलला होता. खूप चीड यायची पण आठ-दहा वर्षाचा मी काय करू शकणार होतो. मला वाटायचं आईची बाजू घ्यावी पण आईचे म्हणणं असायचं भाडणं आमची आहेत आमचं आम्ही बघून घेऊ तू मध्ये पडू नको. मला परिस्थिती किंवा कष्टाचे कधीच काही वाटले नाही पण घरात शांती समाधान असावं असं नेहमी वाटायचं.
                 आईच्या वाटयाला सुख ना माहेरी वाट्याला आले ना सासरी. कामासाठी वडील आईला हक्काने बोलवायचे पण तिची जबाबदारी घेण्याची त्यांना कधी गरज वाटली नाही. कधी माळवं वा इतर काही विकून थोडेफार पैसे आलेत आणि त्यातील काही पैसे आईला दिलेत असे कधीच झाले नाही. आपल्या नवसासायासाने झालेल्या एकुलत्या एक मुलाला शाळेत काय पाहीजे पुस्तक,कपडे कशाची कधी चिंता केली नाही. वडिलांनी सणावारालाच काय कधीच आईला साडी घेतलेली मला आठवत नाही. आईकडे सणावारासाठी, कुठे जाण्यायेण्यासाठी बऱ्यापैकी असलेली एखाद दुसरी साडी असायची इतर वेळेस मात्र आईला कायम धडप्याची साडी वापरावी लागायची(दोन फाटक्या साड्यांचा चांगला भाग जोडून तयार केलेली साडी) एकदा असेच सकाळी वडील घरी आले होते, आई  स्वयंपाक करत होती. ते आईशी दीनवाणे होऊन काहीतरी बोलत होते, मी बाहेर खेळत होतो. आईने मला बोलावून घेतले व मोठ्या बहिणीच्या लग्नात आत्यांनी कानपिळ्याला मला दिलेली सोन्याची अंगठी वडिलांना द्यायला सांगितली. मला ती अंगठी फार आवडली होती, मी अंगठी हरवेन म्हणून आईने मला ती कधी घालू दिली नव्हती.  त्यानंतर माझ्या लग्नापर्यंत मी कधी सोन्याचे कोणतेही आभूषण(अंगठी, चैन इ.) वापरलं नाही. 
            माहेरीही शेतीची सारी कामे आईच करायची, फार गरज असेल तर वारंगुळा करून कामे केली पण कधी रोजाच्या माणसांकडून कामे करून घेतली नाही. इथेही कांद्यासारखं नगदी पीक असले की विक्री आणि हिशोब मामांकडेच  असायचा. आईने इतर माळवं, भाजीपाला सासवडला नेऊन विकला तर तेवढे पैसे मात्र आईकडे रहायचे. मामां आठ-पंधरा दिवसांनी किंवा जेव्हापण यायचे तेव्हा माझ्यासाठी न विसरता खाऊ आणत असत, तसेच दिवाळीला फटाके, सामान आणायचे. आई आणि आजोबा दोघेही तापट त्यामुळे कधी-कधी छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचा याची तक्रार आजोबा मामांकडे करायचे त्यावेळी मामा आईने इथेच राहण्यात कसा फायदा आहे हे नानांना पटवून द्यायचे.  नानांचा माझ्यावर खूप जीव होता, आई माझ्यावर रागावलेली त्यांना अजिबात खपत नसे. मी सुट्टी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेत जायला घाबरत असे, त्यावेळी शाळेत सोडण्याची आणि बाईंना सांगण्याची जबाबदारी नाना पार पाडायचे. 
               दादांचा आणि आजीचाही माझ्यावर फार जीव होता, दोघांचेही वय झाले होते. कधी कधी दोघेही काठीच्या आधाराने काठी टेकवत मला भेटायला यायचे. माझ्या जन्मानंतर आजी मला पदराआड लपवून ठेवायची, मी झोपलोय अशी थाप आजी मारायची पण मला पाहण्याची कोणाची इच्छा आजीने पुरी होऊ दिली नाही. न जाणो कोणाची नजर लागायची. अगदी हेल (पाण्याची कमतरता असल्याने बाळंतिणीच्या घरी पाणी भरण्याची परंपरा) घालणार्‍या स्रियांना पण मला पाहू देत नसे. त्यामुळे त्या नाराज व्हायच्या पण आजीबाईंनी त्यांची कधी पर्वा केली नाही.दादांच्या वंशाला वारस हवा या अट्टहासापायी वडीलांना नाईलाजाने दुसरे लग्न करावे लागले होते. एकंदरीत चित्र पाहता या सर्वांपुढे आईचा निभाव लागणार नाही, शिवाय ज्या अट्टहासापायी लग्न केले ती जमीन पण शिल्लक राहील की नाही याची चिंता त्यांना होती व त्यामुळेच आहे तेवढी जमीन माझ्या नावावर करून घे असे ते आईला म्हणायचे पण काय कसे करायचे हे दोघांना ही माहिती नव्हते व पुढे खरंच असे होईल एवढे त्यावेळेस वाटले नव्हते. मी सहावीत असताना आजोबा तीन-साडेतीन हजार घेऊन आले होते व माझ्या नावावर टाकायचे म्हणून मला घेऊन गेले मात्र वय कमी असल्यामुळे खाते उघडता आले नाही व माझी शाळेच्या एका सॅकवर बोळवण झाली होती. आज मी पस्तिशी पार आहे आणि अद्याप वारसा म्हणून माझ्याकडे अजूनही काही नाही उलटपक्षी गेल्या आठ-नऊ वर्षांपासून विनाकारण कोर्ट-कचेरीत पाण्यासारखा पैसा ओतावा लागत आहे.

१) माय लेकरं - पार्श्वभूमी-१

               जवळपास बारा वर्षांपेक्षा अधिक काळ मी शिक्षणानिमित्त कोल्हापूरला आणि नोकरीनिमित्त मुंबईला असल्याने व त्याआधी शाळा कॉलेजच्याव्यतिरिक्त घराबाहेर फारसा फिरकत नसल्याने मला माझ्या स्वतःच्या गावात-पारगांवमध्येही फारसे लोक ओळखत नाहीत. काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्त गावातील एका व्यक्तीस भेटायचे होते अर्थात त्यांनी मला पाहून ओळखले नाहीच पण ओळख सांगताच त्यांच्या डोळ्यातून अक्षरश: पाणी आलं. हा माझ्यासाठी नेहमीचाच अनुभव होता. पण त्या व्यक्तीबद्दलच्या वाईट ऐकीव अनुभवातून त्या व्यक्तीबद्दलचे माझे मत काहीसे नकारात्मक होते. त्यामुळे मला थोडेसे आश्चर्य वाटले, पण कोणतीही व्यक्ती वाईट नसते तर त्या व्यक्तीचे काही निर्णय, कामे चुकीची असू शकतात. चांगले-वाईट असणे हे केवळ एखाद्या घटनेपुरते मर्यादित असते याची जाणीव मला त्या व्यक्तीच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंनी करून दिली. लोकांच्या असे भावनिक व्हायला आणि डोळ्यांतून अश्रू यायला कारण म्हणजे माझ्या आईने अफाट केलेले कष्ट आणि आयुष्यभर खाललेल्या खस्ता. मी चांगल्या नोकरीला लागलो आहे, आईने केलेल्या कष्टाचं चीज झालं या भावनेतून लोकांच्या डोळ्यांतून समाधानाचे अश्रू येत असतात.
               खरंतर आईच्या खडतर संघर्षाची सुरुवात अगदी तिच्या लहानपणापासूनच झाली, आई लहान असतानाच काही आजाराने आजी वारली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची त्यात आईचे छत्र हरवलेले. एकूण तिघीं बहिणी व एक भाऊ अशी चौघे भावंडे. त्या काळात मुलींची लग्ने लवकर व्हायची, थोरल्या मावशीचे लग्न झाल्यानंतर घरची सर्व जबाबदारी आईवर आली. घरदार सांभाळून सर्वांना मजुरीला जावे लागे. पारगांव पासून अगदी दिवे घाटा पर्यंत पायी चालत जाऊन खड्डे खोदण्याचे काम आईने केले, तसेच घरदार सांभाळून मावशी व मामाचा सांभाळ केला. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मामा व्यतिरिक्त इतरांना काहीही शिक्षण मिळाले नाही. सर्व कुटुंबाची शेतमजुरी आणि दुष्काळी कामे यावरच गुजराण होत होती. आजोबा(नाना) देखील प्रचंड कष्ट करायचे अगदी खड्डे खोदणे, खडी फोडणे, बोरींग लावण्यापासून ते गुळाचे गुऱ्हाळ चालवण्यापर्यंत सर्व कामे केली, त्या गुऱ्हाळावरूनच त्यांना गुळवे हे नाव पडले. नारायण गुळवे नावाने ते जास्त परिचित झाले.
              माहेरची ही अशी बिकट परिस्थिती, अशा परिस्थितीत मुलीचं लग्न कसे करायचे हा मोठा यक्षप्रश्न. हा प्रश्न सोडवणारे स्थळ आईसाठी सांगून आले. स्थळ दुसावट्याचे असले तरी गावातील होते त्यामुळे देण्याघेण्याचा मोठा प्रश्न नव्हता शिवाय एकाच गावात असल्याने माहेरी पण लक्ष देता येणार होते त्यामुळे नानांचा (आजोबा) होकारच होता पण स्थळ दुसावट्याचे असल्याने भविष्यात आपल्याला काय भोगावे लागणार आहे याची प्रचिती आईला आली होती. साहजिकच त्यामुळे आईचा नकार होता पण नाईलाजाने आणि थोरामोठ्यांच्या आग्रहाने आई लग्न करून सासरी आली. सासरी बऱ्यापैकी शेती, बैल-बारदाना, गाई, बकरी असा सारा लवाजमा होता. फार श्रीमंत नसले तरी मुबलक धनधान्य होते. कमी होती ती वंशाच्या दिव्याची आणि वंशाला दिवा हवा याचसाठी दुसऱ्या लग्नाचा घाट घातला होता.त्यामुळे अपेक्षा एकदम स्पष्टच होती. लग्नासाठी दादांची (आजोबा) जास्त आग्रही होते, वडिलांची मात्र दुसऱ्या लग्नाची अजिबात इच्छा नव्हती त्यांनाही सर्वांच्या आग्रहाने लग्न करण्यास भाग पडले.
              लग्नानंतर आईच्या गळ्यात शेतीकामासोबतच बकरी चरण्यासाठी नेण्याची जबाबदारी पडली. घरात धान्य असले तरी रोज खायला कोंड्याची भाकरी मिळायची. दिवसभर कष्ट त्याचबरोबर रात्री चुलीवरच्या स्वयंपाकाचे दिव्य, इकडून तिकडून गोळा केलेले सरपण, त्याचा प्रचंड धूर, पावसाळ्यात तर केवळ चूल पेटवणे हेच मोठे दिव्य असायचे एवढं सगळे करून घरातील धुसफूस, वादाने दोन घास सुखाने खाता यायचे नाही. सकाळी ह्या विहिरीचा उपासा झालाय तर त्या विहिरीला कासरा पुरत नाही म्हणून या विहिरीवरून त्या विहिरीवर अशी पाण्यासाठी वणवण करावी लागायची.  कष्ट, सासुरवास, त्याच जोडीला दोघी सवतींची धुसफूस होती. त्यामुळे सासर-माहेर हा प्रवास सतत चालू होता आणि त्याबरोबर चालू होता कष्टाचा प्रवास त्यात सासर-माहेर असा भेद नव्हता. कष्ट सर्वांच्याच वाट्याला कमी अधिक प्रमाणात असले तरी सोबत चार -दोन सुखाचे क्षणही तिच्या वाट्याला येत नव्हते. शारिरीक कष्टाबरोबरच मानसिक कोंढमारा ही होत होता. आला दिवस कसातरी ढकलणे एवढंच तिच्या हातात होते.
              या सर्व गदारोळात वंशाला दिवा मिळण्याचा मुख्य उद्देश होता त्यास एक तपानंतर यश आले. सर्व कुटुंब, पै पाहुणे, आत्या, काका, मामा, मावश्या सर्वांना आनंद झाला. एवढ्या उशिरा का होईना पण घरादाराला वारस मिळाल्याचे सर्वांनाच कौतुक होते. सर्वांना आनंद झाला म्हणून आनंदाने नाव संतोष ठेवले. आनंद सगळ्यांना झाला असला तरी माझी सारी जबाबदारी मात्र आईवरच होती. तिच्या हालअपेष्टामध्ये फार काही बदल पडला नाही. नेहमीचे भांडणतंटे, धुसफूस यामुळे आईला बराच काळ माहेरीच रहावे लागत असे. मामा नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यामुळे (नानांची)आजोबा आणि शेतीची जबाबदारी आईच्या वाट्याला आली. शेतात खुरपणी,काढणी वगैरे काही कामे असली की वडिल एखाद्या दिवशी यायचे आणि आई विनातक्रार कामाला जायची. सासर असो वा माहेर दोन्हीकडे फक्त कष्टच वाट्याला आले होते. आई कष्ट दोन्हीकडे करत असली तरी तिला घरखर्च मात्र मोलमजुरी करूनच भागवावा लागत होता.

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!