स्वायत्ता नसलेली, विद्वत्ता काय कामाची.
अभिव्यक्ती दडपणारी, सत्ता काय कामाची
पंख छाटून कैदेतून, मुक्तता काय कामाची.
नवनिर्माण नसलेली, सृजनशीलता काय कामाची.
उचलेगिरीतून भासवलेली, अभिजातता काय कामाची.
कोणाचेच भले न करेल ती, नीतिमत्ता काय कामाची.
गरजवंताला याचक बनवणारी, दानशूरता काय कामाची.
काही चांगला बदल न घडवणारी, महानता काय कामाची.
पीडितास वणवण भटकवणारी, न्यायदेवता काय कामाची.
दुष्कृत्यासाठी माफी मिळेल ही, विश्वासार्हता काय कामाची.
जगण्यासाठी वेठीस धरणारी, उद्योजकता काय कामाची.
दुसऱ्याच्या हक्काची लुबाडलेली, मालमत्ता काय कामाची.
व्यवस्थेत फेरफार करून आणलेली, सुबत्ता काय कामाची.
न्यूनगंडाची भावना निर्माण करणारी, भव्यता काय कामाची.
स्वछत्रछायेत दुसऱ्यांस खुंटवणारी, विशालता काय कामाची.
सुखाची आसक्ती ठेऊन, दिखाऊ विरक्तता काय कामाची.
दुसऱ्याला नामोहरम करण्याची, कल्पकता काय कामाची.
वंदून शिकवण पायदळी तुडवणारी, कृतज्ञता काय कामाची.
जबाबदारीतून पळवाट काढणारी, अलिप्तता काय कामाची.
संकट, संधीची चाहूल न लागणारी, दूरदृष्टिता काय कामाची.
ठराविक बाजू घेणारी, निवडक निरपेक्षता काय कामाची.
अन्यायात निर्विकार राहणारी, निरागसता काय कामाची.
असुरक्षितता निर्माण करणारी, सहिष्णुता काय कामाची.
आदेशच पाळावी लागणारी, सार्वभौमत्वता काय कामाची.
भल्याबुऱ्याची जाणच नसणारी, बुद्धिमत्ता काय कामाची.
संतोबा...
0 प्रतिक्रिया:
Post a Comment