माननीय माजी मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य.
कोणाला शिवसेनेची विचारसरणी, कार्यपद्धती पटो वा न पटो, कोणी शिवसेनेला मतदान करो वा न करो तरीसुद्धा बऱ्याच लोकांच्या मनात शिवसेनेबद्दल एक हळवा कोपरा असतो. उमलत्या वयात बहुतेक मुलांचा शिवसेना हाच पक्ष असतो. बाळासाहेबांचा करिश्मा, त्यांची खुमासदार तितकीच आक्रमक भाषणे, शिवसैनिकांची आक्रमता याचे लहानपणापासून किशोरवयीन मुलांना प्रचंड आकर्षण वाटत आलंय. शिवसेनेचा भगवा झेंडा, डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा जबडा आणि जोडीला धनुष्यबाण. कसलीही वैचारिक जडणघडण नसलेल्या आक्रमक, सळसळत्या रक्ताच्या किशोरवयीन मुलांना एखाद्या पक्षाच्या प्रेमात पडायला आणखी काय हवं?. शिवाय सोबतीला बाळासाहेबांची भावनिक साद होतीच. ज्याला स्वतःची ओळख नाही अशा आयडेंटीटी क्रायसिस असलेल्या वर्गाला शिवसैनिक, हिंदू म्हणून ओळख मिळाली तरी पुष्कळ होते. वर्ष १९९५ की ९९ मला नक्की आठवत नाही पण त्या निवडणुकीतील शिवसेनेची प्रचार गीते तर खूप भन्नाट होती. मी कशीबशी ती कॅसेट मिळवून चुलत भावाच्या टेपवर त्यातील वाघाची डरकाळी आणि काही स्पॅनिश, इंग्लिश गाण्यांच्या चालीवर असलेली प्रचारगीते सतत ऐकायचो. "उन दोस ट्रेस मारिया" या रिकी मार्टिनच्या स्पॅनिश गाण्याच्या चालीवर - शिवसैनिक आले आले, काँग्रेसचे धाबे दणाणले असे काहीसे ते गाणे होते. ऐकून-ऐकून ती कॅसेट खराब झाली नंतर काही वर्षानंतर इंटरनेटवर शोध घेतला पण ती प्रचारगीते कुठेच मिळाली नाही.
असा हा कट्टर शिवसेनेचा चाहता वर्ग जसा जसा शिकत जातो, तसा तो प्रगल्भ होत जातो. त्याला जगरहाटीचे ज्ञान मिळत जाते हळूहळू तो विवेकवादी बनू लागतो, त्याला भावनिक, धार्मिक राजकारणातला कट्टरपणातला फोलपणा लक्षात येत जातो. तसा हा किशोरवयीन वर्ग मतदार होईपर्यंत शिवसेनेपासून हळूहळू दूर होत जातो. एव्हाना तो संघर्ष करून स्व:कर्तृत्वावर, स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असतो, त्याला शिवसेनेबद्दलच किंवा इतर दुसऱ्या पक्षाबद्दल वाटणारी ओढ, आपलेपणा कमी झालेला असतो. खरंतर अशी पक्ष निरपेक्षता प्रत्येक मतदाराकडे असेल तर जात - धर्म ,भावनेच्या आहारी न जाता तो मतदार उपलब्ध उमेदवारांपैकी बरा उमेदवार निवडून देऊ शकतो अशाने आपली लोकशाही अधिक प्रगल्भ, अधिक सशक्त होऊ शकते. मी आतापर्यंत मी शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलेले आहे(पुरंदर विधानसभा, बारामती लोकसभा मतदारसंघ). आणि मी ज्यांना मतदान केले आहे ते त्या त्यावेळी निवडून आले आहेत या शिवाय मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राथमिक सदस्यत्व घेतले होते अर्थात त्या प्राथमिक सदस्यत्वाला आता आपण तरुण वयात झालेलं बचपन का प्यार म्हणू शकतो. आज जरी सगळ्याच राजकीय पक्षांबद्दलचा भावनिक ओढा कमी झालेला असला तरी आजही शिवसेनेवर काही संकट आले की मन व्यथित होते.
आताही चारेक महिन्यापूर्वी जूनमध्ये शिवसेनेत उभी फूट पडली २/३ पेक्षा अधिक फुटीर नेते शिवसेना सोडून गेले. त्यांनी कोणत्यातरी एका अदृश्य महाशक्तीच्या दबावाखाली शरणागती पत्करून राजकीय आत्महत्या केली. तदनंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही तात्पुरत्या स्वरूपात गोठवले. आजकालचे एकंदरीत सुडाचे राजकारण पाहता पुढे ते परत मिळेल की न मिळेल याची शाश्वती नाही. शिवसेनेला फुटीनंतर गेल्या चार महिन्यांत एकापाठोपाठ एक अनेक अनपेक्षित धक्के पचवावे लागले आहेत. त्या प्रत्येक धक्क्याबरोबर शिवसेना हे पहिलं प्रेम असलेल्या पिढीसोबत, महाराष्ट्रातील सद्सदविवेकबुद्धी शाबूत असलेला प्रत्येक माणूस हळहळला आहे, भले मग तो कोणत्याही पक्षाचा, विचारसरणीचा असो. अर्थात अपवाद काही मंदबुद्धी आणि नीच विचारसरणी असलेले पक्षाचे कार्यकर्ते असू शकतात. २०१९ ला महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून तसेच आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यापासून आपणांस सभागृहाचा कसलाही अनुभव नसताना आपण ज्या प्रगल्भतेने राज्यकारभार चालवला, कोरोना व इतर संकटाचा चांगल्याप्रकारे सामना केला. त्याबरोबरच आपल्या या सर्वसमावेशक भूमिकेमुळे शिवसेनेपासून वैचारिक भूमिकेमुळे जे सर्वसामान्य लोक दुरावले होते ते पून्हा परत आले एवढेच काय ज्या ज्यावेळी शिवसेनेवर सूडबुद्धीने आरोप करण्यात आले त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामन्य कार्यकर्त्यांनी आणि पक्षनिरपेक्ष तरुणांनी देखील शिवसेनेसाठी सोशल मीडियावर खिंड लढवली. ज्यांनी पूर्वी शिवसेनेवर कठोर टीका केली होती अशा कित्येक नेत्यांनी, विचारवंतांनी आपल्याला समर्थन दिले आहे ते त्यांना कुठेतरी आपण प्रबोधनकारांचा वारसा चालवत आहात याची खात्री वाटू लागल्यामुळे. आपण गेल्याकाही काळात घेतलेल्या भूमिकेतून ते दिसून येत आहे अर्थात त्याची फार मोठी किंमत आपणांस मोजावी लागली आहे.
आपणांस हे प्रेम आपण हिरव्या,भगव्या, निळ्या, पिवळ्याच्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक कारभार केला म्हणून आहे. एवढेच काय ज्यावेळेस महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेस तिला महाराष्ट्रातील जनतेने व काँग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फारशी कुरबुर न करता स्वीकारले, अन्यथा जिथे समविचारी म्हणवल्या जाणाऱ्या भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सतत कुरघोडी चालू असतात तिथे हे काँग्रेस-शिवसेना हे भिन्न विचारधारा असणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही आघाडी केवळ महाराष्ट्रहित लक्षात घेऊन मनमोकळेपणाने स्वीकारली. काँग्रेसने शेवटपर्यंत अपेक्षेपेक्षा अधिक चांगली साथ दिली, त्याबद्दल काँग्रेस नेतृत्व आणि कार्यकर्ते यांचे आभार मानावेच लागतील. राष्ट्रवादीची एवढी अडचण नव्हती कारण त्यांचे नेते आणि कार्यकर्ते तसे लवचिक(flexible) आहेत. सध्या राहुल गांधीची "भारत जोडो यात्रा" चालू आहे तिला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आदित्यजींनी देखील या यात्रेत सामील होऊन राहुल गांधींना पाठिंबा दिला हे चित्र निश्चितच आश्वासक आहे, त्याबद्दल आदित्यजींचे अभिनंदन आणि कौतुक. एका सभेत राहुल गांधींनी सावरकरांबद्दल एक वक्तव्य केल्यानंतर नुकतेच तुरुंगातून जामीनावर बाहेर आलेल्या खासदार श्री संजय राऊतसाहेबांनी थेट महाविकास आघाडीला तडा जाऊ शकतो असे विधान केले. काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा, राजकीय प्रतीके वेगळी आहेत. महाविकास आघडीचे सरकार असताना, सरकारच्या काही निर्णयांना अगदी ते काँग्रेसच्या विचारधारेच्या विरुद्ध असूनदेखील फारशी कुरबुर न करता पाठिंबा दिला होता. आपण एक लक्षात घ्यायला हवं राजकीय प्रतीके कालाऔघात दुसरी बाजू उघड पडू लागल्यास बदलूच शकतात. अगदीच ती नाकारली नाही तरी त्याकेंद्रित राजकारण नाही केले तरी ते पुरेसे आहे.
आता आपली जबाबदारी आहे की आपण ही जी वाट आपण निवडलेली आहे तिच्यापासून ढळू नका. आपण हा मार्ग पत्करल्यानंतर आपणांस अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे त्यापायी बरेच काही गमवावे लागले आहे. जेवढे वाईट व्हायचं होतं तेवढे वाईट घडून गेले आहे, आता नव्याने सर्वांची सुरुवात होईल. खरंतर काही अघटित घडण्याची भीती ही जास्त त्रासदायक असते एकदा अघटित घडून गेले की त्याला सामोरं जाणं तितकेसे अवघड नसतं. आपणांस जिथे आयुष्यभर विरोध करणाऱ्यांनी निर्विवाद साथ दिली तिथे ज्यांची आयुष्य शिवसेनेमुळे घडली त्यांनी दगाफटका केला. आपणांस आणि आपल्या कुटुंबाला देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केले. ज्या दगडांना शेंदूर फासून त्यांचा देव केलात ते दगड दगडच राहिले. उलट आपलाच कपाळमोक्ष झाला किंबहुना माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखे त्यांनी सगळी उठाठेव चालवली आहे. हे सर्व बघता ते शिवसेना सोडून गेले म्हणून आपण सुटकेचा निःश्वास च सोडला असेल. पानगळ झाल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही, त्यामुळे रोजच्या रोज फुटून जाणाऱ्या फुटिरांमुळे शिवसेना संपत चालली आहे असे न वाटता आम्हाला शिवसेना कात टाकतेय असे वाटतेय.
आपणांस संपवायला निघालेले फुटिरांचे हुजरे आता आपणाला मिळणाऱ्या समर्थनानंतर भविष्यात आम्ही परत एकत्र येऊ शकतो अशी भाषा करू लागलेत. ज्या फुटीरांनी धोका दिला त्यांना परत घेऊ नका, शिवाय सध्या पक्षात उपद्रवमूल्य असणाऱ्या आणि आडवळणाने ते दाखवून देणाऱ्यांना त्यांनी आपल्याला ब्लॅकमेल करण्यापूर्वीच त्यांना दूर करावे. शिवसेना तिकीट वाटप करताना उमेदवाराची जातपात, आर्थिक-सामजिक स्तर न पाहता तिकीट वाटप करते हे जे गृहितक रुजले आहे त्यात त्यामध्ये अजून एका गोष्टीची भर घालावी, केवळ निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार न करता जे लोक निवडून आल्यानंतर त्या पदास न्याय देऊ शकतील अशा लोकांना उमेदवारी द्यावी. पक्षाच्या पुनर्बांधणीचे आव्हान आणि संधी आपल्यापुढे आहे, प्रबोधनकारांच्या विचारांनुरूप आणि आजच्या काळानुरुप पक्षाचा जाहीरनामा आणि हिंदुत्वाची पुनर्मांडणी करावी.बाळासाहेबांचा धडाडीचा आणि प्रबोधनकारांचा वैचारिकतेचा वारसा आपण चालवावा ही महाराष्ट्रातील जनतेची एक इच्छा आहे. सर्वसामान्य जनता जनार्दनाचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या सोबत आहेत त्यांच्या विश्वासास तडा जाणार नाही असा विश्वास वाटतो आणि तो तडा जाऊ देऊ नका ही नम्र विनंती.
संतोबा....
0 प्रतिक्रिया:
Post a Comment