Ads 468x60px

Sunday, January 5, 2020

महिला मुक्ती

          मानवामध्ये जन्मतःच वर्चस्ववादाची भावना प्रबळ असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, धर्म, जात, भाषा, प्रदेश अशा अनेक गोष्टीच्या आधारे तो आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. या गोष्टीपैकी काही क्षणभंगुर असतात,  त्या परिस्थितीनुरूप वा कर्तृत्वाने बदलू शकतात पण काही गोष्टी सातत्यपूर्ण आहेत. जातीभेद आणि स्त्रीपुरुष भेद या भेदाने बहुसंख्य समाजाची वाताहत केलेली आहे आणि तो सातत्यपूर्ण आहे अगदी पिढ्यानपिढ्या. स्त्रीपुरुष भेद हा जातीभेदाच्याही वरचढ आहे आणि तो वैश्विक देखील आहे त्यांस कसलाही अपवाद नाही. स्त्री कितीही कर्तृत्ववान असली तरी कुटुंबात, समाजात अपवाद वगळता तिचे स्थान दुय्यमच असते आणि अपवाद नियम होऊ शकत नाही. मुलीने दुसऱ्या जातीत लग्न केले, त्यामुळे घराण्याची बेइज्जती झाली अशा समजुतीतून ऑनर किलिंगच्या नावाखाली अनेक पोटच्या मुलींचे निर्घृण बळी घेणारे पालक, नातेवाईक आपण पाहिले असतील पण मुलाने दुसऱ्या जातीत लग्न केले तर त्याचा बळी घेणारे पालक दिसणार नाहीत. फारतर ते अबोला धरतील पण बळी वैगरे घेणार नाहीत. मुलाने केलेला आंतरजातीय नाकं मुरडून का होईना चालतो, मात्र मुलीने केलेला आंतरजातीय विवाह जास्त जिव्हारी लागतो. कारण स्रियांना समाजाच्या स्त्रीबाबतच्या इज्जत, पवित्र-अपवित्र अशा खुळचट संकल्पनेच्या जळमटांनी गुरफटले आहे.
            आपण स्त्रीचा पावित्र्याशी संबंध जोडून तिला कायमस्वरूपी बंधनात जखडले आहे. दुर्दैव म्हणजे त्या पावित्र्याचा संबंध स्त्रीच्या शरीराशी जोडला आहे. हा संबंध आणि समज इतका खोलवर रुजला आहे की त्या समजाने विकृत विक्राळ रूप धारण केले आहे. समाज वैचारिक दृष्ट्या  इतका मागास आहे की स्रियांना केवळ एक उपभोग्य वस्तू समजले जाते. तिच्यावर मालकी हक्क गाजवला जातो. स्रियांची असली दयनीय सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक महापुरुषांनी स्त्री उद्धाराचे कार्य केले आहे, त्या कार्याचा परिपाक म्हणून अनेक वाईट रूढी परंपरा नष्ट झाल्या व काहीप्रमाणात सुधारणा झाल्यात तरीसुद्धा अजूनही अनेक ठिकाणी मुली हुंडाबळी जातात, मुलगी आहे म्हणून गर्भपात केला जातो. मासिकपाळीसारख्या नैसर्गिक गोष्टीचा विटाळ होतो. काही समाजात अजूनही कौमार्य चाचणी समाजमान्य आहे. कर्तृत्ववान स्रियांना नामोहरम करण्यासाठी बदनामीचे ब्रह्मास्त्र सर्रास उगारले जाते, तर कुठे बदला म्हणून बलात्कार केला जातो. विधवा विवाह सहजमान्य होत नाही, वैधव्य आले म्हणून आयुष्यभर सौभाग्याचे लेणे म्हणून मिरवलेल्या अलंकारांचा त्याग करावा लागतो शिवाय अनेक कार्यक्रमात अघोषित बंदी असते.
                आपण स्रियांना देवीस्वरूप मानून, उदोउदो करून त्यांचे उदात्तीकरण करतो. खरंतर स्रियांना देवीस्वरूप, पूज्य मानणे ही सगळी ढोंगं आहेत कारण प्रत्यक्षात आपण तसे वागत नाही. या अशा ढोंगी उदात्तीकरणाने स्रियांचा बळी घेतला आहे. उदात्तीकरणाचा फार मोठा तोटा असा आहे की ज्याचे उदात्तीकरण केले आहे त्यांस तक्रार करता येत नाही.एक आई म्हणून, मुलगी म्हणून, बायको म्हणून स्रियांना त्याग, सोशिकता अशा अनेक विशेषणांची लेबलं लावून त्यांचे उदात्तीकरण केले आहे. कितीही अन्याय झाला तरी स्त्री म्हणजे त्याग,सोशिकतेचे मूर्तिमंत उदाहरण अशी समाजासह तिची स्वतःचीही धारणा झाल्यामुळे तिला सर्वकाही निमूटपणे सहन करावे लागते. बऱ्याचदा बापाची अब्रू, नवऱ्याचा तोरा, मुलाच्या उचापती सांभाळण्याची जबाबदारी आपसूकच तिच्याकडे येते. हे करत असताना स्वतःच्या इच्छा आकांक्षाना तिला नेहमीच आवर घालावा लागतो शिवाय या त्यागाची जाण सुद्धा कोणाला नसते, ते तिचे कर्तव्य म्हणून गृहीत धरले जाते. जिथे कमी तिथे तुम्ही या उक्तीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पडती बाजू सावरण्याची बाजू स्रियांच्या वाटयाला येते.
             शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन हा यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. चूल-मुलं, परक्या घरच धन या पारंपारिक समजातून मुलींना चाकोरीबद्द शिक्षण दिले जाते, ज्याचा कोणत्याही क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. मुलगी जास्त शिकली, स्वतःच्या पायावर उभी राहिली किंवा तिला स्वातंत्र्य दिले तर ती बिघडते असा अपप्रचार केला जातो. कधी आजूबाजूचे एखादे उदाहरण दिले जाते. अपवादात्मक अशा गोष्टी घडतही असतील जे मुलांच्या बाबतीतही घडतेच. कारण जे गुण-अवगुण पुरुषांच्या ठायी आहे तेच कमी अधिक प्रमाणात स्रियांमध्ये पण आहेच. त्याचा शिक्षणाशी,स्वातंत्र्याशी, स्वालबंनाशी काही संबंध नाही. शिक्षणाने बऱ्या वाईटाची जाण येते, स्वावलंबनाने कुणाचे मिंधे म्हणून राहावे लागत नाही आणि तेच पुरुषप्रधान समाजाला खटकते. स्रियांना स्त्रीत्वाचे भोग संपवून त्यांना मानवाचे आयुष्य उपभोगायचे असेल तर अर्थार्जनाची संधी निर्माण करणारे शिक्षण तसेच आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणे हे दोन्हीकडील कुटुंबाचे कर्तव्य आहे, केवळ संपत्तीत वाटेकरी करून फारसा उपयोग होणार नाही.
              न्याय आणि हक्क हे सर्व मानवजातीसाठी एकसमान असायला हवेत त्यात स्त्री पुरुष असा भेदभाव करता येणार नाही. शिवाय आई,बहीण,मुलगी अशी नात्यांची लेबलं ही लावता येणार नाहीत कारण त्याला सोशिकता, त्याग असल्या फसव्या विशेषणांचा होऊ शकणारा प्रादुर्भाव दुर्लक्षित करता येणार नाही. अर्थात स्त्री पुरुष म्हणून त्यांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या निश्चित भिन्न असू शकतात पण ज्यावेळी हक्काचा, न्यायाचा विषय येतो त्यावेळी त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा. केवळ कायद्याच्या आधारे बदल होईल अशीही शक्यता नाही शिवाय जे कायदे एका ठिकाणी न्याय्य ठरतील तेच कदाचित दुसऱ्या ठिकाणी अन्याय्यही ठरू शकतील. कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी तडजोडी या अपरिहार्य आहेत मात्र त्यासाठी सामाजिक अथवा कायदेशीर दबावाखाली कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाचा बळी दिला जाता कामा नये. प्रत्येक वेळी कायद्याद्वारे न्याय भेटलेच असे नाही त्यासाठी कायद्यासोबतच सामाजिक सुधारणा तसेच स्त्रीशिक्षण, आर्थिक स्वावलंबन अत्यावश्यक आहेत. त्यासाठी आपल्याला एका पुरोगामी, निकोप समाजाची निर्मिती करावी लागेल.ज्यादिवशी स्त्री पुरुषी वर्चस्ववादातून, जाचक रूढी परंपरांच्या जोखडातून, विकृत नजरेतून, असुरक्षिततेच्या भावनेतून, नात्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून मुक्त होईल त्याला खरा महिला मुक्तीदिन म्हणता येईल.
                                                      संतोबा...

0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!