कोणत्याही पदापेक्षा काही लोक मोठे असतात त्यापैकीच दादा एक. दादा भावकीच्या नात्याने मामा, मी शिक्षण आणि नोकरी निमित्त बाहेर असल्याने आणि त्यांचेही गावाकडे जास्त येणेंजाणे नसल्याने माझा त्यांच्यासोबत किंवा कुटुंबासोबत कधी संबंध आला नव्हता. माझे माधुरीशी लग्न झाल्यावर मामा-भाच्याच्या नात्याचे सासरे-जावयाच्या नात्यात रुपांतर झाले पण त्यांना सासरे किंवा मामा म्हणायला कधी माझी जीभ रेटली नाही. स्वतःच्या मुलांप्रमाणे किंबहुना जास्तच प्रेम त्यांनी माझ्यावर केले. आमची कसलीही अपेक्षा नव्हती त्यामुळे लग्नाच्यावेळी देण्याघेण्याबद्दल कसलीही बैठक झाली नाही तरी दादांनी सगळे आम्ही बघतो म्हणून सांगितले. इतर ठिकाणी पगार आणि प्रॉपर्टीचा पहिला प्रश्न विचारला जायचा मात्र दादांनी लग्नापूर्वी वा नंतरही ना माझ्या पगाराची ना प्रॉपर्टीची चौकशी केली. त्यावेळेसच मला त्यांचे वेगळेपण जाणवले.
कशाचीही अपेक्षा नसताना आणि काहीही न मागता दादांनी सारं काही दिले पण त्यांनी जे प्रेम,आपुलकी आणि मानपान दिला त्याला तोडच नाही. घरी चिकन,मटण काहीही जेवण बनवले की जेवायला घरी या म्हणून फोन येणार. मला एकवेळ दुष्मनाच्या घरी जेवायला काही वाटणार नाही पण नातेवाईकाच्या घरी जेवायचं म्हणजे दडपणच यायचं कारण नातेवाईक कधी काय उकरून काढतील त्याचा नेम नसतो. त्यामुळे सुरुवातीला माझा नकारच असायचा. मी काहीतरी कारण सांगून नाही म्हणलं की सनी, श्रीकांत आणि ते नसतील तर कोणीतरी पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत माझ्यासाठी डबा घेऊन हजर असायचे आणि हे नेहमीच होऊ लागले शेवटी आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून मी स्वतःच जेवायला जाऊ लागलो, त्याच प्रमाण इतकं होते की बाकीच्या लोकांना मी घरजावई झालो की काय असा संशय यावा. जावयाची नेहमीची उठबस राहिली की दशमग्रह होतो असे म्हणतात पण मी रोज जरी घरी गेलो तरी माझी सर्व पद्धतशीरपणे उठबस व्हावी हा त्यांचा हट्टहास असे.
लग्नाच्या दीड वर्षांनंतर वरदराजचा जन्म झाला. त्याच्यावर तर त्यांचा खूप जीव होता आणि त्यांना त्याचे खूप कौतूक होते. थोरल्या मेहुण्यांचे(श्रीकांत) लग्न झाले त्यावेळेस ठरवलं की आता जाणे येणे कमी करायचे. नव्या पाहुण्यारावळ्यात हे सततचे येणेजाणे बरं दिसणार नाही शिवाय त्यांच्या नवीन सूनबाई कशा असतील याची कल्पना नाही. पण सर्व काही जसं आहे तसेच चालू राहिले. पुढे राजवीरचा जन्म झाला, धाकट्या मेहुण्यांचे(सनी)लग्न झाले पण त्यांच्या प्रेमात तसूभरही फरक पडला नाही उलट ते वाढत गेले. सुदैवाने त्यांच्या दोन्ही सुनबाई आणि त्यांच्या माहेरची मंडळी अतिशय सुसंस्कृत आणि माणुसकी असणारी आहेत त्यामुळे त्यांच्यात वावरताना मला कधी अवघडल्यासारखे झाले नाही.
दादा एक निस्वार्थ, सामाजिक भान असलेले एक मनमिळावू व्यक्तिमत्त्व. ह्याच सामाजिक भानातून आणि निस्वार्थ भावनेतून दादांनी कित्येक गरजू तरुणांना नोकरी मिळवून देण्यास हातभार लावला, कित्येकांना निस्वार्थीपणे कसलीही अपेक्षा न करता सढळ हस्ते मदत केलीच शिवाय त्या मदतीचा कधी हिशोब ठेवला नाही. दादांची सामाजिक श्रीमंतीची ना तुलना होऊ शकते ना ती मोजता येऊ शकते. ह्या सामाजिक श्रीमंतीचा अनुभव मात्र वेळोवेळी आपण घेऊ शकतो. सिरम इन्स्टिट्यूटसारख्या जागतिक दर्जाच्या आणि आशियातील एक नंबर असलेल्या फार्मा कंपनीत कर्मचारी, अधिकारी ते अगदी मालकापर्यंत सर्वांशी घनिष्ट संबंध असताना आणि अनेक अधिकार असताना गैरफायदा सोडाच पण फायदा घ्यायचाही विचार कधी दादांनी केला नाही. कर्म हाच त्यांचा धर्म होता, कंपनी हे त्यांचे दुसरे घरचं होते. स्वतः किती आजारी असले तरी विचार मात्र कंपनीचाच असायचा. शेवटच्या क्षणापर्यंत कंपनीच्या भरभराटीसाठी मोलाचा हातभार लावला.
गेल्या काही दिवसांपासून दादांची प्रकृती बरी नव्हती. जवळपास आठवडाभर सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, दादांनीही आठवडाभर जिद्दीने लढा दिला पण दुर्दैवाने काल १९-०९-१९ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दादा भौतिक रूपाने आपल्याला सोडून गेले. दादांसारखा बापमाणसाचे छत्र हरवल्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही. एखाद्याच्या जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला, जीवनात पोकळी निर्माण झाली म्हणजे नक्की काय याची जाणीव आता व्हायला लागली आहे. दादा शरीररूपाने जरी आपल्यात नसतील तरी त्यांचे संस्कार, तत्व, विचार हे आम्हांस कायम प्रेरणा देत राहतील. दादां नेहमीच प्रेमळ आठवणी रूपाने आपल्या हृदयात अजरामर असतील.
1 प्रतिक्रिया:
chan
Post a Comment