माझ्या इतकी सुंदर तरुणी मी अद्याप पाहिलेली नाही, तरी त्यावेळेसची गोष्ट काही औरच होती पहिल्यांदा नव्या
ऑफीसमध्ये पाऊल टाकताच सर्वांच्या नजरा माझ्यावरच खिळल्या आहेत याची मला जाणीव
झाली, अर्थात ही बाब माझ्यासाठी काही नवीन नव्हती. शाळा,कॉलेज,कॉलनीच कुठेही असू दे असाच अनुभव. काही वेळा
ते आवडायचे सुध्दा पण बर्याचदा त्या विखारी, वासनांध नजरा पाठी
टोचत राहायच्या. माझ्या येण्याने सर्वांना जो अवर्णनीय आनंद झाला होता तो लपता लपत
नव्हता.
यथावकाश तास-दोन तासांत वातावरण पूर्ववत झाले, आम्हां सर्वांचे दुपारचे जेवण झाल्यावर पुन्हा कामास सुरूवात केली. सर्व
आपआपल्या कामात मग्न होते ते नाइलाजानेच म्हणा. तेवढ्यात एक जण आत आला तो
आल्याबरोबर सर्व वातावरणच बदलून गेले सकाळी मी आले त्यावेळी ते ठीक होते पण एक
नेहमीचा येणारा तरुण त्याला पाहून सर्वानी एवढे खुष व्हावे याचे मला आश्यर्य वाटले, त्याही पेक्षा जास्त आश्चर्य त्याने सर्वांशी हाय-हॅलो केले पण माझ्याकडे
एक साधा कटाक्षही नाही टाकल्यामुळे झाले हे मला अपेक्षितही नव्हते अन् मान्यही
नव्हते. एखाद्या तरुणाने माझ्याकडे दुर्लक्ष करावे ही
बाब मला खटकलीच.
असेच दोन-तीन दिवस गेले पण आमच्या दोघात काही
बोलणे झालेच नाही, एका दिवशी रिपोर्ट्स तयार करताना मला त्यात
मला काही अडचण आली म्हणून त्याला ती विचारली. तो कसा प्रतिसाद देतोय याची थोडी
भिती वाटली पण नाईलाज होता त्यावेळी दुसरे कोणीच जवळ नव्हते. पण माझा अंदाज चुकला, त्याने त्याचे हातातील काम बाजूला ठेवले व मंदस्मित करत, नजरेला नजर भिडवत समजावुन सांगू लागला. माझ्या तर काळजाचा ठोका चुकला.
त्याच्या डोळ्यात,बोलण्यात काही तरी जादू नक्की होती. आता मला
त्याचे वेगळेपण जाणवू लागले.प्रत्येक मुलगा स्वत:ला डॅशिंग,डायनामिक,हॅंडसम समजत असतो पण त्याला पाहून खरोखर मला
तो तसा आहे असे वाटले. त्याचे एका शब्दात वर्णन करायचे तर राजबिंडा असेच करता
येईल. त्याचा आचार-विचारच नव्हे तर इतरांकडून होणारा त्याचा प्रचार सुध्दा त्याचे
राजेशाहीपण अधोरेखित करत होते ते उगीच नाही.
आता मात्र तो माझ्याशी दिलखुलास बोलू लागला.
मलाही त्याच्याशी बोलणे आवडू लागले. आतापर्यंत प्रत्येक जण माझ्याशी बोलण्याचा,हाय-हॅलो करण्याचा प्रयत्न करत पण पहिल्यांदाच मला दुसर्या कोणाशी
स्वत:हून बोलावासे वाटत होते, तो आल्याबरोबर आता माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटू लागले.
प्रत्येक दिवशी आमची जवळीक वाढत होती. आणि न राहवून एकेदिवशी मी तो आल्यावर
शेकहॅण्ड केले अर्थात ही गोष्ट कोणाच्याच नजरेतून सुटली नव्हती. पुरुषाच्या
स्पर्शात काय जादू असु शकते याचा पहिल्यांदाच मी अनुभव घेत होते. क्षणात माझ्या
सर्वांगावर सरसरुन रोमांच उभे राहीले.त्याच्या हातात माझा दिल्यावर किती आश्वस्त
वाटत होते. आजपर्यंत कित्येकांनी माझ्याशी सहेतुक शेकहॅण्ड वा स्पर्श केला होता पण
असे कधीच झाले नव्हते उलट काही वेळा झुरळ अंगावर पडल्यावर जशी शिसारी येते तशी माझी
अवस्था व्हायची.
दिवसेंदिवस मी त्याच्याकडे आकर्षित होतेय याची
त्याला जाणीव नसेल अशी शक्यता नव्हती. पण एका मर्यादेबाहेर जाण्याचा वाहयातपणा
त्याने कधी केला नाही. त्याने मला प्रपोज केले असते तर मी होकार दिलाच असता असे
नाही, पण त्याने मला प्रपोज करावे असे नेहमी वाटायचे. त्याच्या
मिठीत बेधुंद विसावावे असे वाटायचे. मनी वसे ते स्वप्नी दिसे या उक्तीप्रमाणे सतत
त्याचा विचार केल्यामुळे तो नेहमी माझ्या स्वप्नात यायचा, पण स्वप्नातसुध्दा त्याने मर्यादा सोडली नाही मी मात्र बेशलाक त्याचा
मिठीत बेधुंद विसावयाची. पण प्रत्यक्षात हा योग कधीच जुळून नाही आला.
आज मी दोन मुलांची आई आहे आणि आजही तो माझ्या
मनात आहे, कधी तो माझ्या स्वप्नातही येतो पण तो अजूनही
तसाच आहे पण मला मात्र का कोणास ठाऊक माझी दोन्ही मुले हुबेहुब अगदी
त्याच्यासारखीच आहेत असे नेहमी वाटत राहते.
0 प्रतिक्रिया:
Post a Comment