राजसाहेब आपली वक्तृत्वशैली असो वा जीवनशैली त्याचे प्रचंड आकर्षण आजच्या तरुणाईला आहे, तर इतराना कौतूक.मग तो विरोधी पक्षातील असो वा अमराठी!!! अर्थात आम्हीही त्यास अपवाद नाही आहोत. पण ते वैचारिक साम्यतेमुळे. साहेब कोणत्याविषयावर काय बोलतील, कोणावर टीका करतील,कोणाचे कौतूक करतील याचे अचूक अंदाज आम्ही बांधत असू, ते इतके अचूक असत की काही मित्रांना मी भाषणे लिहून देतो की काय अशी शंका येत. पण आता साहेबांची मोहिनी ओसरत चालली आहे, आमचे अंदाज ही चुकू लागलेत. जसा पक्षाचा विकास वेगाने झाला तशाच लोकांच्या अपेक्षाही वाढल्या पण त्यांचा भ्रमनिरासच झाला.
समर्थकांसह विरोधकांचेही लक्ष नाशिकवर केंद्रित झालेय. होणारच कारण नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत आलाय, महापालिकेत सत्ता आहे. पण विकासाची कुठे सुरूवात आहे असे दिसत नाही. लोकांचा भ्रमनिरास होतोय आणि याची आपणास निश्चित जाणीव आहे. वेळोवेळी पुरेसा कालावधी पुर्ण झाला नाही, पूर्ण सत्ता नाही अशी कारणे आपण देत आहात. नाशिक शहरात आपले तीन आमदार आहेत ज्यांचा कालावधी संपत असताना, महापालिकेत सत्ता असताना आपण अशी कारणे देणे शोभत नाही. सत्तेत असल्याशिवाय कामे होत नाही हे पटत नाहीत कारण विरोधी पक्षातीलही काही आमदार-खासदार आहेत जे सत्तेत नसताना जोमाने काम करत आहेत मग इतराना का अडचण यावी. आपण एक-दोन वर्ष पाळणा नाही हलला तर अनेक शंका घ्यायला. अनाहूत सल्ले द्यायला सुरूवात करतो. मग एक वर्षानंतर काही कामांची अपेक्षा करणे निरर्थक नक्कीच नाही. लोकांसाठी स्वत:ची संस्कृती,अस्मिता टिकवण्याबरोबरच विकासही महत्वाचा आहे. बायको नुसती सुंदर असून चालत नाही तिला मुलंही व्हायला हवीत ना?
मोदींनी ठेका दिल्याप्रमाणे गुजरातेतून जशा विकासाच्या बातम्या येतात तशाच बातम्या नाशिकमधून येतील अशी आमची भोळी अशा होती, होती अशासाठी की आता वर्ष उलटून गेले पण तिकडे विशेष काही होतेय याची जराशीही कुणकुण लागत नाहीये. गुजरातेत काय,किती आणि खरच विकास झालाय हे आम्ही थोडेच पाहिलय? पण सगळेच उदोउदो करतायेत आणि आपण स्वत: गुजरातचा विकास पाहून आला आहात आणि तोंडभरून स्तुतीही केले आहे म्हणजे नक्कीच विकास होतोय असे मानायला हरकत नाही. पण आपल्या नाशिकमधून,महाराष्ट्रातून अशा बातम्या कधी येणार?
आमच्या पुरंदरमध्ये विजयबापू शिवतारे या शिवसेनेच्या वाघाने , नजरेत भरेल असा कामे करण्याचा सपाटा लावला आहे, ते ही विरोधी पक्षातच आहेत आणि राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात!! त्यांची कामे बघून बारामतीकराना घाम फुटलाय म्हणे. निवडणुकीच्यावेळी आमच्या मातोश्रींनी कोणाला मत देऊ असे विचारले तर आम्ही रेल्वे इंजिनवर शिक्का मार म्हणालो माझा पक्ष आहे. शेजारी-पाजारी, सगेसोयरे म्हणाले घड्याळावर शिक्का मार आपला पाहुणा आहे. आईने बेधडक धनुष्यबाणावर शिक्का मारला. तोपर्यंत धनुष्यबाणाचा पुरंदरशी संबंध फक्त अनामत रक्कम जप्त होण्याइतपतच होता यावेळी इतरांची अनामत रक्कम जप्त झाली!! आज आम्हाला आमच्या मातोश्रींचा अभिमान वाटतोय. ती अशिक्षित आहे पण अडाणी नाही.त्यामुळे आपल्याकडे सत्ता नाही, पुरेसा कालावधी मिळाला नाही, अशी कारणे आपल्यासारख्या डॅशिंग नेत्याकडून अपेक्षित नाहीत.
आता विधानसभा निवडणूका जवळच आल्यात काही दिवसात आपण सभा घ्यायला सुरवात कराल. पण खरे सांगतो साहेब सभा ऐकण्याची ती ओढ शिल्लक नाही राहिली. मान्य आहे बरेचशे वैचारिक दिवाळखोर नेते आहेत त्यांच्यावर आपण टीका-टिप्पणी करता त्यांची खिल्ली उडवता नक्कल करता. आम्ही ते शेकडो वेळा पाहिलेय पुन्हा पुन्हा, पण आता ते पाहून आम्हाला हसू येत नाही. त्या नेत्यानी सुद्धा आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काही ना काही कामे केलीत, काही तजवीज केलीये. याउलट आपल्या नेत्यांची- कार्यकर्त्यांची नावे खंडणी वसुली,खून,मारामारी, बलात्कार अशा अनेक गुन्हेगारी खटल्यात येतायेत. आणि आपण सभामधून एकहाती सत्तेची मागणी करताय. जनतेच राहू दे बाजूला पण कार्यकर्त्यांचे काय त्यांना अपेक्षित उर्जा मिळालीच नाही कसे काम करणार ते. सत्तेची पहिली पायरी म्हणून नाशिक कडून काही अपेक्षा होत्या पण सर्वांच्या पदरी निराशाच पडलीये. आपल्या टीकेचा, कारणांचा आम्हाला उबग आला आहे.
त्यामुळे उद्या कोणीही एखादा टग्या उठून साहेबांना रड्या म्हणेन , आम्हाला ते बिल्कूल आवडणार नाही पण त्याचा विरोध तरी आम्ही कसा करायचा?.....