Ads 468x60px

Tuesday, October 30, 2012

लाल डब्बा


             लाल डब्ब्याशी तसा महाविद्यालयीन काळापासूनच घनिष्ट संबंध त्याकाळी ४५१७ हा आमचा परवलीचा शब्द बनला होता. महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी याच क्रमांकाची सासवड-सुपा पारगाव मार्गे जाणारी एसटी बस प्लॅटफॉर्म क्र.८ ला लागायची, अन् ही चुकली तर किमान तासभर तरी वाट पाहण्याव्यतिरिक्त पर्याय नसायचा. अर्थात धावतपळत का होईना सर्वांचा ही एसटी बस पकडण्याचा प्रयत्न असे.

अर्थात सर्वांनाच अशी घाई असे अशातला भाग नाही,काहीजण महाविद्यालयातील हिरवळीवर एवढे लुब्ध असायचे की दुपार कधी सरुन जायची याचे त्यांना भानच नसायचे,आमचे कनिष्ठ महाविद्यालय असल्याने गणवेश सक्तीचा होता आणि तो आमच्या सोईचाही होता.आम्ही कला शाखेत असल्याने वर्गात भरपूर आकाशी निळ्या रंगाची हिरवळ असायची. आणि या हिरवळीचा पूर्णपणे निचरा होईपर्यंत बरेच जण महविद्यालयाच्या,आणि बसस्थानकाच्या परिसरात घुटमळायचे. आम्ही कधी नाही घुटमळलो. तेव्हा त्याचे काही नाही वाटले पण आता कधी-कधी एकांतात वैषम्यही वाटते. यदाकदाचित....बरं ते असो!!!!

यथावकाश आमचे अर्धवट शिक्षण संपवून नोकरी मिळवण्याच्या खटपटीस लागलो आणि तीही आम्हांस स्वप्ननगरीतच हवी होती.  त्यास आमच्या परममित्राच्या कृपेने दीड-दोन वर्षांनी का होईना अपेक्षित यश लाभले. मधल्या काळात लाल डब्याशी तुटलेला संबंध काही अंशी पुन्हा जोडला गेला,अर्थार्जन बेताचे असल्याने येणे-जाणे ही बेताचेच होते आणि लाल डब्याला पर्यायही नव्हता. रुळावरील आगगाडीचा पर्याय होता पण तो आमच्या प्रकृतीला मानवणारा नव्हता.
           
होता होता आमचीही गाडी व्यवस्थित रुळावर धावू लागली. त्यातच वातानुकुलित शिवनेरी बसची सेवा सुरू झाली.वातानुकुलित शिवनेरी बसचा  आरामदायी प्रवास सुरू झाला. पण दोन-तीन वर्षानंतर हा प्रवासही आम्हाला अस्वस्थ करू लागला. एकतर आमची इतर गोष्टीबरोबर शारीरिक प्रगतीही मजबूत झाल्यामुळे त्या आरामदायी सीटवरही अवघडल्या सारखे वाटू लागले. लाल डब्यात खिडकीशी बसून वार्‍याची फडफडणारी झुळुक अंगावर घेण्यात एक वेगळीच मजा यायची. विविध फुलांचा मिश्रित मंद सुगंध बाहेरच्या निसर्गाशी संवाद साधण्यास भाग पाडायचा. बंद डब्यामध्ये तो संवाद हरवला होता. बाहेरील प्रत्येक गोष्टीबद्दल दुरावा वाढू लागला होता,अगदी गुदमरायला व्हायचे. नीरव शांतता असल्याने फोन वर बोलायला नको वाटायचे, फोन ऑफीसमधून असेल तर नाईलाज व्हायचा पण एखाद्या जवळच्या मित्राचा असेल तर मात्र आम्ही बिलकुल घ्यायचो नाही कारण मित्र जेवढा जवळचा तेवढा आमचा आवाज वाढतो असा अनुभव. अश्या ह्या निर्जीव प्रवासाला जीव कंटाळला होता. त्यात सरकारनेही अनेकदा भाडेवाढ केल्याने आधीच महाग असलेला प्रवास अजूनच महाग झाला. त्यानंतर आम्ही खूपवेळा ठरवले बस्स झाला हा शिवनेरीचा प्रवास प्रत्येकवेळी आम्ही निघताना आज लाल डब्ब्यानेच जायचे असा पण करायचो पण तरी सुद्धा प्रत्यक्षात पुढे शिवनेरी पाहिली की आमचा हा पण नेहमीच बारगळायचा जवळपास वर्षभरतरी असेच चालू होते.



शेवटी नाइलाजानेच आमचा संकल्प सिध्दीस गेला. नाइलाजाने यासाठी की दरम्यानच्या काळात आता आमची पत वाढली आहे असा गैरसमज आमच्या मनात निर्माण झाला होता व या फसव्या प्रतिष्ठेला धक्का पोहाचेल अशी भीती वाटत होती पण ती फक्त बसमध्ये बसेपर्यंत. कारण आजपर्यंत अजून एका गोष्टीला मी मुकत होतो तो म्हणजे बसचा वाहक. बसचा वाहक म्हणले की त्याची प्रवाशांशी विविध कारणाने होणारे वाद हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर प्रथम उभे राहते पण तोही काही कमी मनोरंजक अनुभव नसतो.पण आता हे चित्र निश्चितच बदलले आहे. आता जास्तीत जास्त प्रवासी एसटी ने यावे यासाठी त्यांचा चांगला प्रयत्न असतो. मला राहून राहून त्यांच्या बदललेल्या या व्यावसायिक वृत्तीचे फार कौतुक वाटते.
  तेवढ्यात एक सुंदर तरुणी सहा वर्षाच्या प्रवासात प्रथमच आमच्या शेजारी येऊन बसली. आतापर्यंत लहान वाटणार्‍या त्या सीट्स अचानक मोठ्या वाटू लागल्या कारण तिच्या व आमच्यामध्ये एक माणूस सहज बसू शकेल एवढी जागा शिल्लक होती.

आता ठरवलय "वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन,'

' गाव तेथे एसटी' असे ब्रीद वाक्य मिरविणा-या एसटी महामंडळाला आणि त्यांच्या कर्मचारयांना मानाचा मुजरा!!!

---संतोष गांजुरे


0 प्रतिक्रिया:

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!