Ads 468x60px

Wednesday, November 26, 2025

प्रवाहपतित सेलिब्रिटी.

               क्रिकेट, राजकारण आणि सिनेसृष्टीचे भारतीय समाजाला प्रचंड आकर्षण आहे. या क्षेत्रात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींचे भरपूर कट्टर अनुयायी तयार होत असतात विशेषतः सिनेसृष्टी आणि क्रिकेट. या सेलिब्रिटी सिनेकलावंत आणि क्रिकेटपटूंचे चाहते सेलिब्रिटींच्या अनेक बऱ्यावाईट गोष्टींचे समर्थन आणि अनुकरण करत असतात. आवडत्या सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी ते अनेक दिव्य पार करत असतात, त्यांच्यासाठी वेळ आणि पैसे खर्च करत असतात तर काहीजण त्यांच्यासाठी जीव द्यायला मागे पुढे पाहत नाही. त्यांना अगदी देवत्व बहाल करतात. अशा पाठीराख्यांमुळे सिनेमा किंवा क्रिकेटमध्ये यशस्वी होणाऱ्याला त्याच्या प्रतिभेच्या कित्येक पटीने मोबदला आणि नावलौकिक मिळत असतो. या सेलिब्रिटींच्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या चाहत्यांवर पडत असतो, ते त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते त्यांचे दिसणे असो, ते वापरत असलेली उत्पादने असो. प्रसिद्ध व्यक्तींनी अंगिकारलेल्या चांगल्या वाईट सवयींना, कृतींना सामाजिक प्रतिष्ठा मिळत असते. त्यांच्या कृतींचे सर्वसामान्य व्यक्तींकडून अनुकरण केले जाते. त्यामुळे सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा वापर करून उद्योजकाने आपली उत्पादनांची जाहिरात न केली तरच नवल. त्यामुळे पाण्यासारखा पैसा ओतून व्यावसायिक लोकं सेलिब्रिटी कडून आपल्या मालाची जाहिरात करत असतात. गडगंज श्रीमंत असलेला सेलिब्रिटी त्याच्यादृष्टीने क्षुल्लक असलेल्या रकमेपायी लोकांच्या आरोग्यास हानिकारक असलेल्या एखाद्या गोष्टीची जाहिरात करताना त्याच्या चाहत्यांचा, सामाजिक बांधिलकीचा विचार करत नाही. मग ती जाहिरात पान मसाल्याच्या नावाखाली गुटख्याची असो, सोड्याचा नावाखाली दारूची असो, खेळाच्या नावाखाली जुगाराची असो, श्रमपरिहार, उत्साहवर्धकपेयांच्या नावाखाली हानिकारक शीतपेयांची असो. आपल्या मुळे किती कुटुंबे उद्ध्वस्त होईल याचा सारासार विचार सेलिब्रिटी करत नाही. सर्वसामान्य लोकं आपला चरितार्थ चालवण्यासाठी नोकरीधंदा करतात, तो करताना काही तडजोडी करतात, प्रसंगी मानापमान सहन करतात पण एका मर्यादेपलीकडे आत्मसन्मान विकून पैसे कमवत नाही. पण या गडगंज सेलिब्रिटींची नेमकी काय अगतिकता असते की ती असली अनैतिक कामे करायला सहज तयार होतात.                    

                खरंतर कोणताही सिनेअभिनेता सिनेरसिकांशिवाय मोठा होऊ शकत नाही, कोणताही खेळाडू , क्रिकेटपटू क्रिडा चाहत्यांशिवाय, प्रेक्षकांशिवाय मोठा होऊ शकत नाही. कोणताही राजकीय नेता कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याशिवाय मोठा होऊ शकत नाही. आपण ह्या लोकांना देवत्व प्राप्त करून देतो.त्यांची लार्जर दॅन लाइफ अशी आभासी प्रतिमा निर्माण करतो. कधी ही व्यक्ती राजकीय नेता, प्रसिद्ध अभिनेता, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी किंवा तथाकथित सामाजिक कार्यकर्ता असू शकतो. कलेचा, कलाकाराचा सन्मान करता करता त्या कलाकारांमधील माणसाचा सन्मान करू लागतो पण आपण हा विचार करत नाही की तो माणूस सन्मान करण्याच्या योग्यतेचा आहे की नाही. पडद्यावर नायकाची भूमिका साकारणारा, भ्रष्ट, अन्याय व्यवस्थेला नडणारा, आपल्या चतुरस्त्र अभिनयाने भूमिका जिवंत करणारा चांगला कलाकार, चांगला माणूस असेलच असे नाही. आपल्या कौशल्याने आपल्या संघाला जिंकून देणारा चांगला खेळाडू माणूस म्हणून चांगला असेलच असे नाही. सातत्याने निवडून येणारा, लोकांना आपण त्यांचा तारणहार आहोत असा भासवणारा लोकप्रिय नेता चांगला माणूस असेल असे नाही. खरंतर नेत्यांनी धर्माचा, अभिनेत्यांनी नशेचा अन् खेळाडूंनी जुगाराचा बाजार मांडला आहे.अभिनय, खेळ, राजकारण हा त्या लोकांचा व्यवसाय, पेशा आहे. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायाला गरजेची असणाऱ्या कौशल्यात निपुण, निष्णात असणे ही त्या व्यवसायात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे आणि ती साध्य करण्यासाठी काही लोकं जीवतोड मेहनत करतात तर काही लोकांना ती कला अंगभूत जन्मजात स्वरूपात लाभते. ज्यावेळी कलेची देणगी अंगभूत, जन्मजात स्वरूपात लाभते त्यावेळी तिचा दर्जा(क्लास) हा वेगळाच असतो आणि अशा जन्मजात कलाकौशल्याची देणगी लाभलेल्या कलाकाराला, खेळाडूला सर्वसामान्य लोकं देवत्व बहाल करतात.

                 सिनेमाच्या माध्यमातून भ्रष्ट, अन्याय्य व्यवस्थेशी, सरकारशी दोन हात करणारा, सत्यासाठी, न्यायासाठी लढणारा, गुंडांशी दोन हात करणारा, निरपेक्षपणे दीन दुबळ्यांची बाजू घेणारा, त्यांना मदत करणारा, नैतिकची चाड असणारा आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या प्रियजनांशी उभा दावा मांडणारा (पंगा घेणारा) एखादा अभिनयसम्राट, अँग्री यंग मॅन प्रत्यक्ष जीवनात व्यवस्थेला शरण गेलेला, कुठल्यातरी प्रकरणात अडकलेला आणि त्यातून सुटका व्हावी म्हणून सत्ताधाऱ्यांची तळी उचलणारा एक कणाहीन, लाचार व्यक्ती असतो. दैवी प्रतिभा लाभलेला खेळाडू, गायक, गायिका, साहित्यिक कधीही आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी करत नाही मात्र स्वतःच्या फायद्यासाठी नैतिकता गुंडाळून अधिकचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधी टॅक्स भरण्यातून सूट मिळवण्यासाठी, कधी सरकारी भूखंड मिळवण्यासाठी, स्वतःच्या संस्थेसाठी निधी मिळवण्यासाठी, पुरस्कार मिळवण्यासाठी, तर कधी आपले अपराध लपविण्यासाठी करत असतो. सत्तेविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध बोलून अडचणीत येऊ नये, आपली रोजीरोटी संकटात येऊन नये म्हणून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर, अडचणीवर मूग गिळून गप्प बसणारे सेलिब्रिटी सरकार अडचणीत आल्यावर मात्र सरकारची वकिली आणि जनतेला उपदेशाचे डोस द्यायला तत्पर असतात. सेलिब्रिटींना जर देशातल्या अराजकतेवर एक चकार शब्द उच्चारणारता येत नसेल तर त्यांनी लोकांना उपदेशाचे डोस देऊ नये आणि शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीतही पडू नये. जनता त्यांचा लढा स्वतः लढेल.           

                    खरंतर जनमाणसावर प्रभाव पाडणाऱ्या क्षेत्रातील सेलिब्रिटींनी (प्रभावशाली लोकांनी),समाजात वावरताना किमान नैतिकता बाळगावी अशी अपेक्षा असते. जेणेकरून त्यांना आदर्श मानणारी लोकं त्यांच्या वागण्याचा आदर्श घेतील. सरसकट सर्वच सेलिब्रिटी नाही पण किमान ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे आणि त्यांच्या आणि इतरही क्षेत्रातील लोक त्यांना आपला आदर्श मानतात, त्यांची कोणाशी स्पर्धा नाही अशा अद्वितीय प्रतिभा असलेल्या सेलिब्रिटींकडून समाजहिताची भूमिका घेणे अपेक्षित असते. एवढेच काय सरकारचा एखादा चुकीचा निर्णय बदलण्याचा, सरकारची ध्येय-धोरणे सुधारण्याची ताकद अशा सेलिब्रिटींमध्ये असते कारण त्यांना मोठ्या जनसमुदायचे पाठबळ असते पण भारतातील बहुतांश सेलिब्रिटींनी आपआपल्याला क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेले असले तरी प्रत्यक्ष राजकीय- सामाजिक जीवनात हे सेलिब्रिटी भयंकर खुजे आहेत. सर्वसामान्य जनता स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आपापल्या परीने लढत असते पण हे सेलिब्रिटी जनतेसाठी सोडा स्वतःच्या आत्मसन्मासाठी देखील भूमिका घेत नाही एवढे हे लाचार आणि असहाय्य आहेत. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे, व्यवस्थेला गोत्यात आणू शकणारी आपली भूमिका, आपले विचार जाहिर केले तर होणाऱ्या परिणामाची जाण त्यांना आहे. व्यवस्थेच्या, सत्तेच्या विरोधात गेलो तर प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भीती आहे कारण सत्तेच्या अन् व्यवस्थेच्या अव्यवस्थेची भलामण करणाऱ्यालाच सत्ता, व्यवस्था पुरस्कृत करते. जे सत्तेची, व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना सत्ता अन् व्यवस्था बहिष्कृत करते. आपण प्रवाहाच्या बाहेर पडू, एकटे पडू अडचणीत येऊ, सगळी प्रतिष्ठा, प्रसिध्दी, पैसा धुळीस मिळू नये म्हणून कायम हा ही चांगला तो ही चांगला अशी सोईस्कर भूमिका घेण्याचा अभिनय ते लीलया पार पाडतात. अमाप पैसा, प्रसिद्धी, लोकांचे पाठबळ, नैतिकतेचे पाठबळ असताना चुकीला चूक म्हणता येत नसेल, अन्यायाला विरोध करता येत नसेल अन् न्यायाची बाजू घेता येत नसेल तर या सेलिब्रिटींची अलौकिक प्रतिभा व्यर्थ आहे. 

               चित्रपटातून, खेळामधून, गाण्यांमधून आपल्याला क्षणिक आनंददायी अनुभव(फिलगुड फॅक्टर) मिळतो, पण हा क्षणिक आनंददायी अनुभव आपल्या मूलभूत अडचणी सोडवत नाही. ज्या महापुरुषांमुळे आपल्या आयुष्यात चांगला बदल घडला आहे त्यांना आपण कवडीची किंमत देत नाही पण शेळपट सेलिब्रिटींना आपण देवत्व बहाल करतो. कायम चर्चेत, बातम्यात असणारे, चित्रपटगृहाच्या आणि टीव्हीच्या पडद्यावर कायम दिसणारे लोक हळूहळू सेलेब्रिटी बनतात. सध्या त्यात इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्यांची भर पडलेली आहे. ज्या लोकांच्या प्रेमामुळे आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी पैसा मिळाला आहे, ज्यांच्यामुळे सगळ्या सुख सुविधा असलेले विशेष जीवन उपभोगतोय त्या लोकांच्या गरजेपोटी ठाम भूमिका घेण्याएवढी हिंमत सेलिब्रिटींमध्ये नसेल आणि ते केवळ प्रवाहाबरोबर वाहवत जाणारे असतील तर अशा शेंदूर लावून देवत्व बहाल केलेल्या सेलिब्रिटी दगडांचा शेंदूर आपण खरवडून त्यांचे पाय मातीचेच आहेत हे सत्य स्विकारला हवे. हे सेलिब्रिटी म्हणजे कोणी दुसरे तिसरे कोणी परग्रहावरची लोकं नसून तुमच्या आमच्या सारखेच सर्वसामान्य लोकं आहेत. त्यांच्याशी आपण आपला संबंध हा त्यांच्या कलेपुरता मर्यादित ठेवावा. त्यांना खास वागणूक देऊन व्हीआयपी संस्कृती वाढू देऊ नये. त्यांच्यासाठी कायदे नियम धाब्यावर बसवून अतिरिक्त लाभ मिळू देऊ नका. या व्हीआयपी संस्कृतीचा आणि त्यांना मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा, अतिरिक्त लाभांचा त्रास आपल्यालाच होणार आहे, नुकसान आपलेच होणार आहे. या दिखाऊ, कचाकड्याच्या बाहुल्या आपल्यासाठी सेलेब्रिटी नाहीत. आपल्यासाठी लढणारा, अन्याय्य व्यवस्थेला नडणारा, स्वातंत्र्याची, समतेची, न्यायाची चाड असणारा, विवेकवादी समाज घडवणारा व्यक्तीच आपला खरा सेलेब्रिटी आहे.

                                                          संतोबा (संतोष गांजुरे).

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!