Ads 468x60px

Saturday, October 28, 2023

भांडवलशाहीचे ठेकेदार

              तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करावे असे परवा एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणाले. पाश्चिमात्य कार्यसंस्कृतीला दोष देत आम्ही तरुणांनी पाश्चिमात्य देशांकडून वाईट सवयी स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नेहमीप्रमाणे अनेक उद्योगपतींसारखे आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी त्या वक्तव्याला देशभक्तीचा तडका दिला आहे. एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या माध्यमातून त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक साम्राज्य निर्माण केले आहे आणि त्यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करू दिला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक आहेच. पण तरुणांना आठवड्याचे ७० तास काम करायला सांगून भांडवलशाहीसाठी कामगारांचे शोषण करणारी पोषक व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून ते वातावरणनिर्मिती करत आहेत का हे बघायला हवे कारण त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक उद्योगपतींनी त्यांचीच री ओढली आहे. तसेही आजकाल सर्व कामगार कायदे धाब्यावर बसवून लोकांची पिळवणूक केलीच जात आहे पण देशभक्तीच्या नावाखाली कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे आठवड्याचे तास वाढवले की भांडवलदारांना कामगारांची पिळवणूक करण्याला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल.

               आजकाल सर्वसामान्य जनतेने स्वयंभू देशभक्त आणि देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणाऱ्या लोकांचा धसका घेतला आहे. अनेक उद्योगपती त्यांची उत्पादने गुणवत्तेच्या तराजूत न तोलता देशभक्तीच्या तराजूत तोलून आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करत असतात. ज्याप्रमाणे राजकारणी नेते आपली समाजविघातक विचारसरणी, निर्णय सर्वसामान्य जनतेवर लादताना त्याला देशभक्तीचा, देशप्रेमाचा मुलामा देत असतात व कोणी विरोध केला की त्याला देशद्रोही ठरवत असतात अगदी तीच पद्धत आजकाल भांडवलदारांनी आणि तथाकथित सेलिब्रिटींनी अवलंबली आहे. देशभक्ती कोणी सिद्ध करायची तर ज्यांच्या शेकडो पिढ्या भारतात जन्मल्या इथेच राहिल्या, राबल्या आणि याच मातीत मिसळल्या त्यांनी आणि देशभक्ती कोणासाठी सिद्ध करायची तर ज्यांची जगभरात अनेक देशात संपत्ती आहे, ज्यांची मुले परदेशात शिकली आहेत, स्थायिक झाली आहेत त्यांच्यासाठी. उद्या देशात काही विपरीत घडण्याची शक्यता निर्माण झाली तर हे तथाकथित देशप्रेमी लोक पहिल्यांदा परदेशात पलायन करतील आणि येथील शोषित, कष्टकरी लोक देश वाचवण्यासाठी लढा देतील. स्वातंत्र्याचे, मानवी मूलभूत नैसर्गिक हक्कांचे महत्व या सर्वसामान्य जनतेशिवाय जास्त कोणाला कळणार आहे?. हीच सर्वसामान्य जनता कोणत्याही विपरीत परिस्थितीत जीवाची बाजी लावून देशासाठी लढतील मग शत्रू परकीय असो वा अंतर्गत कोणाला विकलेला दलाल असो ते सर्वांना पराभूत करुन स्वतंत्र देशासह स्वतंत्र राहतील.  

                शोषित, कष्टकऱ्यांनी मूलभूत हक्काची मागणी केली तर ते देशद्रोही ठरत असतील तर त्या हिशोबाने आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी लढा देऊन १० जून १८९० पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर करावयास भाग पाडणारे रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे, ४ एप्रिल १९४६ रोजी दुस-या कारखाना कायदा दुरुस्तीने मजुरांसाठी दैनंदिन आणि साप्ताहिक तास मर्यादित करण्यास भाग पाडणारे आणि १९४८ पासून लागू झालेला किमान वेतन कायदा करण्यास पुढाकार घेणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नाविन्यपूर्ण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापरातून देशाच्या सामाजिक, आर्थिक विकासास उत्तेजन मिळेल यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक योजना आखून भारतात माहिती तंत्रज्ञानक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणारे व पाच दिवसांच्या आठवड्याची संकल्पना मांडणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अथवा सुट्टीच्या दिवशी अधिकचे काम, फोन कॉल्स नाकारण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना मिळावा म्हणून राईट टू डिस्कनेक्ट बिल लोकसभेत मांडणाऱ्या व ते मंजूर करून घेण्यास आग्रही असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही देशद्रोही म्हणावे लागेल. 

               माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वदेशी टेक्नॉलॉजी कंपनी स्थापन व्हाव्यात, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या सामाजिक आर्थिक विकासास उत्तेजना मिळावी यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक योजना आखून भारतात माहिती तंत्रज्ञानक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यासाठी १९८८ मध्ये टायफेक(Technology Information, Forecasting and Assessment Council (TIFAC) स्थापनेत योगदान दिले आणि त्यास आर्थिक मदतीसाठी सिडबी (Small Industries Development Bank of India) बँकेची स्थापना केली. प्रसंगी नुकसान सहन करून १९९० मध्ये Exim policy (Export Import Policy) मध्ये सुधारणा करून तिच्यामध्ये लवचिकता आणली आणि त्याची फळे आपल्याला १९९२ पासून दिसू लागली आहेत. पण आज भारतीय आयटी कंपन्यांची काय अवस्था आहे त्या नवीन उत्पादन निर्मितीसाठी किती निधी राखीव ठेवतात, नवीन संशोधनावर किती खर्च करतात. अमाप पैसा, प्रचंड उच्चशिक्षित मनुष्यबळ असताना त्यांनी काय नवीन संशोधन करून जागतिक दर्जाचे उत्पादन निर्माण केले आहे. त्यांनी केवळ उच्चशिक्षित माहिती तंत्रज्ञान अभियंते स्वस्तदरात घेऊन जगभरातील इतर कंपन्यांच्या कामांसाठी जास्तदराने पुरवठा केला आहे. सकाळी कामावर जाताना हडपसर गाडीतळ, चंदननगर येथे अनेक रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या मजुरांचा घोळखा दिसत असतो. तसेच तिथे वेगवेगळ्या बिल्डर आणि इतर उद्योजकांना रोजंदारीवर मजूर पुरवणारे दलाल(labour contractor) असतात. या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांकाकडून त्यांना कसल्याही सुरक्षेच्या सुविधा न पुरवता, कमीत कमी मोबदल्यात जास्तीत जास्त काम करून घेतले जाते. आपल्या आयटी कंपन्या काय त्यापेक्षा वेगळ्या आहेत काय?. जास्त तास काम म्हणजे जास्त कार्यक्षमता हा रुढीवादी विचार त्याचेच द्योतक आहे. 

          प्रश्न आठवड्याला ७० तास काम करण्याचा नाही, कामात जर काही उदात्त हेतू असेल, नाविन्य असेल, सृजशीलतेला वाव असेल तर ७० काय तरुण त्यापेक्षाही जास्तवेळ काम करतील पण रोज केवळ पाट्या टाकायचे काम असेल आणि त्याचा काही यथायोग्य मोबदला मिळणार नसेल तर कोण स्वतःचे शोषण होऊ देईल. आठवड्यातून पाच दिवस काम असेल तर रोजचे १४ तास अधिक ऑफिसला जाण्या-येण्याचे २-३ वैतागवाण्या ट्रॅफिकमधले तास असे १६-१७ तास आणि सहा दिवस काम असेल तर रोजचे १२ तास अधिक ऑफिसला जाण्या-येण्याचे २-३ तास असे १४-१५ तास काम करावे लागेल. राहिलेल्या सात-आठ तासांत झोपण्याव्यतिरिक्त काय करता येईल. वैयक्तिक आवडीनिवडी, घरदार, बायको-मुलंबाळं यावर तुळशीपत्र ठेवल्यासारखे होईल. आजकाल माहिती-तंत्रज्ञान अभियंत्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या वरचेवर येऊ लागल्या आहेत हा वैयक्तिक आणि व्यावसयिक जीवनातील समतोल बिघडल्याचे द्योतक नव्हे काय?. अनेक पिढ्या संघर्ष करून आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्य मिळाले आहे, हजारो वर्ष अन्याय सहन करून आता कुठे मानवाचे नैसर्गिक मूलभूत हक्क मिळू लागले आहेत. शालेय शिक्षण घेणारी ही माझी पहिली पिढी आहे. आता कुठे ताठ मानेने समाजात उभे राहता येऊ लागले आहे. आम्हाला साध्या रहाणीमानाचे उपदेश देऊन, देशप्रेमाचे उमाळे काढून आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आणि नैसर्गिक मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करू नका. देशप्रेम वैगरे शिकवण्याच्या भानगडीत तर अजिबात पडू नका, देशप्रेम आमच्या रक्तातच आहे त्यासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज अजिबात नाही!.   

                                                               संतोबा...

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!