Ads 468x60px

Saturday, July 9, 2022

मी उपमुख्यमंत्री.

                    साधारणपणे १९९३ ची घटना असेल, त्यावेळेस मी इयत्ता चौथीमध्ये शिकत होतो. आज पारगांवमध्ये ज्याठिकाणी तलाठी ऑफिस आहे त्याठिकाणी आमचा चौथीचा वर्ग भरत असे. आम्हांला शिकवायला भोसले गुरुजी होते, भोसले गुरुजींनी पवार सगळ्यात हुशार म्हणून मुख्यमंत्री, मनोज सहलमंत्री, काळूराम सफाईमंत्री अशी बहुतेक हुशारीवर आणि काहीअंशी आगाऊपणावर आधारित खातेवाटप केले होते. रोज सकाळी मुख्यमंत्री तुकाराम पवार सर्वांचा गृहपाठ तपासतील, वर्ग आणि व्हारांड्याच्या साफसफाईची जबाबदारी सफाईमंत्री काळूरामची. मडकी कशी बनवतात हे प्रत्यक्ष जाऊन पाहण्यासाठी चालत पाच मिनिटांच्या अंतरावर ठरलेल्या सहलीचे नेतृत्व सहलमंत्री मनोजकडे. अर्थात मला कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. मला तशी अपेक्षाही नव्हती, किंबहुना ती तशी कोणालाच नव्हती.  हे असे मंत्रिमंडळ बनवण्याची संकल्पना अचानक ठरली व तात्काळ त्यांस मूर्तरूप दिले गेले, त्यामुळे कोणाच्या नाराजीचा प्रश्नच नव्हता. 

               अशाप्रकारे खातेवाटप सुरळीत पार पडले असे वाटत असताना मुलींच्या बाजूने गलका चालू झाला, माझ्या मैत्रिणींनी हट्टच धरला की संतोषला काही ना काही पद द्या.    ३५-४० पटसंख्या असलेल्या वर्गात काय आणि किती पदे देणार, गुरुजींनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्या  ऐकायलाच तयार नव्हत्या.  शेवटी नारीशक्तीपुढे गुरुजी हतबल झाले व थोडा विचार करून भोसले गुरुजींनी माझ्यासाठी उपमुख्यमंत्रीपद निर्माण केले व ज्यादिवशी तुकाराम सुट्टीवर असेल त्यादिवशी त्याची मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडायची असे ठरले. तुकाराम बहुदा कधीच गैरहजर नसायचा आणि माझे उपमुख्यमंत्रीपद हे कायमच नामधारी राहिले.गेल्या काही काळापासून उपमुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्रीपदाला वरचढ ठरत असताना थोडाफार आनंद वाटतोय तो केवळ ह्याच एका नामधारीपणाच्या टोचणीमुळे.राज्याचा विचार करता उपमुख्यमंत्री पद घटनात्मक नाही आणि अनिवार्यही नाही,  केवळ खातेवाटपात समतोल राखण्यासाठी, मुख्यमंत्रीपदाची दावेदारी करणाऱ्याची नाराजी दूर करण्यासाठी आणि राजकीय स्थैर्य आणण्यासाठी त्याचा साधारणपणे उपयोग केला जातो.

              आजकाल लोकं पद मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात, बहुदा सामजिक प्रतिष्ठा,प्रसिद्धी, इतरांवर वर्चस्व गाजवण्याची संधी ह्यासाठी सगळा खटाटोप असतो आणि पदाचा मूळ उद्देश बाजूला पडतो. प्रतिष्ठा ही पदाला असते त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला तो त्या पदावर बसलेला आहे तोपर्यंतच ती प्रतिष्ठा, मानसन्मान मिळतो. प्रत्येक पदाचे काही अधिकार आणि कर्तव्ये असतात,  त्याला योग्य न्याय दिला तर त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला मानसन्मान मिळतो. अगदी ती व्यक्ती त्या पदावरून पायउतार झाल्यानंतर देखील आयुष्यभरासाठी त्यांस आदर मिळतो. पण ज्या व्यक्तीच्या कर्तुत्व आणि वर्तणुकीमुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते अशा व्यक्तींबद्दलचा आदर आणि सन्मान पिढ्यानपिढ्या टिकतो. पण एखादी कुवत नसलेली व तडजोड किंवा अपरिहार्यता म्हणून पदावर बसवलेली व्यक्ती तिच्या वर्तणुकीने चेष्टेचा विषय होतो, अशा व्यक्तीची खिल्ली उडवली जाते मग तो मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो वा राष्ट्रपती. कोणाच्या तरी मर्जीने, मिंधे होऊन पद मिळवले तर त्या व्यक्तीच्या हातचे बाहुलं बनून राहावे लागते, सर्व काही दुसऱ्याचा इशाऱ्यावर करावे लागते. अशा व्यक्तीची नामधारी म्हणून केवळ रबर स्टॅम्प सारखी गत होते.अशावेळी ना त्या पदाचा उपभोग घेता येतो ना त्या पदाला योग्य न्याय देता येतो. 

          मला नक्की आठवत नाही कोणत्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात तो धडा होता पण त्या धड्याने मला आयुष्यभरासाठी जमिनीवर राहण्याचा धडा मात्र दिला. बहुधा तो पाठ एखाद्या सरकारी अधिकाऱ्यावर असावा, तो ज्यावेळी अधिकारीपदावर होता तेव्हा त्याच्या हाताखाली असलेला कर्मचारी त्याला रोज आदबीने सलाम करायचा, चहापाणी काही हवं नको ते सर्व पहायचा. एकेदिवशी तो अधिकारी निवृत झाल्यानंतर रस्त्यात त्याची गाठ समोरून सायकलवर येणाऱ्या त्या कर्मचाऱ्यासोबत होते, नेहमी अधिकारी समोर दिसल्यावर मोठया आदबीने सायकलवरून उतरून सलाम करणारा तोच कर्मचारी त्यादिवशी मोठ्या गुर्मीत सायकलवर उतरून त्याच्या समोर सिगारेट सुलगावीत मोठ्या तोऱ्यात निघून जातो याचे त्या अधिकाऱ्यास आश्चर्य व वाईट वाटते. या जिव्हारी लागलेल्या घटनेचे पुनरावलोकन करता त्यांच्या कार्यकाळात त्या कर्मचाऱ्याशी अधिकारी म्हणून केलेली वर्तणुक चुकीची असल्याची उपरती होते. ते अधिकारी आणि कर्मचारी असे नाते होते अधिकरपद जाताच ते संपुष्टात आले. व्यक्ती-व्यक्तींमध्ये कोणत्याही पदाच्या , आर्थिक,सामजिक स्तराच्या आधारे भेदभाव करू नये. मी आजही माझ्या कार्यालयीन मेल मध्ये माझ्या पदाचा उल्लेख कधीच करत नाही.

              आजकाल जिथेतिथे केवळ राजकारणच नाही तर प्रत्येक क्षेत्रात पदासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच खेळले जाते. ज्या गोष्टी साध्य करण्यासाठी त्या पदाचे प्रयोजन केलेले असते त्यालाच हरताळ फासला जातो. पदाची लालसा असणे वाईट नाही, पण त्यासाठी आपली त्या पदासाठी असलेली योग्यता - अयोग्यता विचारात न घेता घोडेबाजार, साठमारी, विश्वासघात करून या ना त्याप्रकारे पद हस्तगत केले जाते.  पदाचा गैरवापर करून आपला आणि समर्थकांचा फायदा करून घेतला जातो, प्रतिस्पर्धकांना नेस्तनाबूत केले जाते. काळाच्या परिपेक्षात पाचदहा वर्षे फार नाहीत आणि कोणतेही पद सार्वभौम नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट नीतीनियमाने, नैतिक अधिष्ठान असलेले डावपेच खेळून मिळवावे. कावेबाजपणे, पाताळयंत्रीपणे, कुटील डावपेच खेळून काही मिळवले आणि आपण कितीही नीतिमत्तेने वागल्याची भलामण केली तरी आपण कसे वागलो त्याचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर, वर्तणुकीवर उमटत असते.आपण कितीही लपवाछपवी, सारवासारव केली तरी कधी ना कधी सत्य समोर येतेच. सर्व काही हस्तगत करून इतरांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत होत नसेल, चारचौघांत उजळ माथ्याने फिरता येत नसेल आणि आपल्या विजयापेक्षा प्रतिस्पर्ध्याच्या पराभवाची चर्चा होत असेल तर तो आपला पराभवच नाही का?.

                 संतोबा...

Thursday, July 7, 2022

लोकशाही

                    लोकशाही ही एक चांगली शासन व्यवस्था आहे पण ती सर्वोत्तम नाही. ज्ञात,प्रचलित शासनव्यवस्थेत निश्चित ती वरचढ आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हवे ते मिळण्याची संधी असते पण ते मिळेलच याची खात्री नसते. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते त्यामुळे या आकड्यांच्या खेळांमुळे सर्वांना समान संधी द्यायची म्हणले तरी ती संधी अल्पसंख्याकातील बहुसंख्याला, गरीबातील श्रीमंताला मिळते. भारतासारख्या खंडप्राय देशात साक्षात लोकशाही अस्तित्वात येणे कठीण आहे, आता भारतात जी लोकशाही अस्तित्वात आहे तिला आपण प्रातिनिधिक लोकशाही असे म्हणू शकतो. सर्वसामान्य जनतेचा लोकशाही व्यवस्थेतील सहभाग हा मतदानापुरताच अर्थात लोकप्रतिनिधी निवडून देण्याइतपतच मर्यादित असतो. एकदा निवडून आलेला प्रतिनिधी काय काय उपद्व्याप करतो, सत्तेसाठी, स्वार्थासाठी कोणाच्या वळचणीला जातो ते हतबलपणे पाहण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात काहीही राहत नाही. थोडक्यात जनतेला मतदानाचा हक्क असला तरी एकदा निवडून दिलेल्या प्रतिनिधीने कर्तव्यात कसूर केली तर वचक ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन नाही.

            निवडून दिलेला लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेल्यानंतर तो त्याची लोकप्रतिनिधी म्हणून असलेली कर्तव्ये पार पाडेल याची खात्री देता येत नाही. बऱ्याचदा जनतेला व अगदी लोकप्रतिनिधीलाही त्याच्या कर्तव्याची जाण नसते. त्यामुळे दूरदृष्टीने लोकोपयोगी निर्णय घेण्यापेक्षा जनमतावर प्रभाव पाडणाऱ्या लोकप्रिय घोषणा करण्याकडे त्यांचा कल असतो. लोकप्रिय घोषणाव्यतिरिक्त जनमतावर प्रभाव पाडणाऱ्या अनेक गोष्टी असतात. धार्मिक,वांशिक,प्रादेशिक, भाषिक अस्मितांचा बाजार मांडून जनमताचे केंद्रीकरण केले जाते. विरोधकांवर खोटेनाटे आरोप करून त्यांची प्रतिमा बदनाम केली जाते. सत्ता हाती असेल तर प्रसारमाध्यमे, सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधीपक्षाविरोधी नरेटिव्ह तयार केले जाते. तथाकथित सेलिब्रिटिंना हाताशी धरून जनमत इन्फ्लूअन्स् करण्याचा प्रयत्न केला जातो अशाने सर्वसामान्य मतदार भावनेचा भरात मतदान करतो आणि चुकीचे लोकप्रतिनधी विधानसभेत, लोकसभेत पाठवले जातात. कोणा एका पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आणि विरोधी पक्ष कमजोर झाला तर अनेक निर्णय घेताना मनमानी केली जाते, हे निर्णय लोकहितापेक्षा सत्ताधारी पक्षाच्या विचारसरणीला पूरक ठरतील असे, आणि ठराविक व्यक्ती, संस्थाच्या हिताचे असतात. ही एकाधिकारशाही एक प्रकारची हुकूशाहीच म्हणता येईल आणि म्हणूनच अशा प्रचंड बहुमताला बऱ्याचदा पाशवी बहुमत असेही म्हणतात.

            आज खूप साऱ्या लोकांना लोकशाही नकोशी वाटते त्यापेक्षा त्यांना हुकूमशाही आणि लष्करशाहीचे सुप्त आकर्षण आहे. लोकशाही शासनव्यवथेत  राज्य कारभार  लालफितीत अडकल्यामुळे, स्पष्ट बहुमताअभावी आघाडी,युती करण्याची अपरिहार्यता आणि कोणताही निर्णय घेण्यासाठी लागणारा विलंब, घटक पक्षात एकवाक्यता नसणे यामुळे देशाच्या प्रगतीस खीळ बसते अशी सर्वसामान्य जनतेची धारणा बनलेली असते. फॅसिस्ट विचारसरणीचे पक्ष प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या त्याची भलामण करत असतात. आत्यंतिक राष्ट्रवाद, काल्पनिक सोनेरी भूतकाळाचे गुणगान आणि तो प्रत्यक्षात उतरवण्याचे स्वप्न, मूठभर भांडवलदारांच्या हाती सर्व आर्थिक प्रगतीच्या चाव्या आणि त्यातून जीवघेणी विषमता,  विचारवंतांचे वावडे आणि सर्व प्रश्न सोडवणारा, बाह्य शक्तिपासून संरक्षण करणारा एकमेव सर्वशक्तीशाली नेता अशी फॅसिस्ट पक्षाची मांडणी असते आणि म्हणून ते लोकशाहीला दोष देत हुकूमशाही आणि लष्करशाहीसाठी आग्रही असतात. हुकूमशाही आणि लष्करशाहीत पहिला बळी सर्वसामन्य जनतेच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा जातो हे सर्वसामन्य लोकांच्या खिजगणीत नसते, एककल्ली  आणि अनियंत्रित कारभारामुळे सर्व स्तरांवर देशाची आर्थिक घडी इतकी बिघडते की जनतेला हुकुमशहाच्या मेहेरबानी वर जगल्या सारखे जगावे लागते. खरंतर प्रत्येक व्यवस्थेत काही ना काही गुण दोष असतातच एखादी व्यवस्था, संस्था, व्यक्ती कितीही चांगल्याप्रकारे कार्यरत असली तरी कालांतराने तिला विरोधाचा सामना करावा लागतो. अगदी तिच्या समर्थकांमध्येदेखील कुरबुरी वाढू लागतात. जगात अनेक शासनव्यवस्था, राज्ये, संस्कृती उदयास आल्या आणि लोप पावल्या. इतर शासनव्यवस्थेच्या मानाने लोकशाही शासनव्यवस्था लोकांच्या भावनांचा उद्रेक न होता दीर्घकाळ टिकून आहे.

      खरंतर लोकशाही स्वातंत्र्य,समतेची आई आहे असे म्हणता येईल. अर्थात परिपूर्ण स्वातंत्र्य आणि समता कदापी प्रस्तापित होऊ शकत नाही, एका छोट्या कुटुंबातही ते शक्य होत नाही पण लोकशाही मार्गाने विषमतेची दरी बुजवण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहते. लोकशाही आहे म्हणून समाजातील शेवटच्या घटकाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि प्रगती करण्याचे सप्न पाहण्याची आणि आर्थिक सामजिक उद्धार करण्याची संधी तरी मिळते. एखाद्या गोष्टीत काही त्रुटी असतील तर त्या आपण दुरुस्त करतो, तिला उध्वस्त करत नाही. घरात ढेकूण झाले तर आपण त्यांचा बंदोबस्त करतो ना की घर जाळतो. लोकशाहीचेही तसेच आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बदल हा लोकशाहीचा आत्मा आहे. सध्या तरी लोकशाहीला पर्याय नाही. जनता प्रगल्भ झाली तर लोकशाही आपोआप प्रगल्भ होत जाईल. लोकशाहीचे महत्व आणि उपयुक्तता प्रत्येक व्यक्तीने समजून घ्यायला हवी. कोणतही योजना, निर्णयाबाबत प्रत्येक जण खुश राहू शकत नाही पण हुकुमशाहीचे गुणागण गाणे घर जाळून कोळशाचा व्यापार करण्यासारखे आहे.

                     व्यक्ती, समाज व संस्कृती या जर लोकशाहीभिमुख नसतील, तर लोकशाही पद्धतीचे संविधान स्वीकारूनही त्या देशात लोकशाही रूजणे व टिकणे अवघड असते.लोकशाही ही केवळ शासनव्यवस्था न राहता ती एक जीवनपद्धती व्हायला हवी.  वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनात प्रत्येक नागरिकाने तिचा अवलंब केला पाहिजे. गुलाम, मालक या संकल्पना कालबाह्य व्हायला हव्यात. प्रत्येक नागरिकाने स्वतः मध्ये असलेल्या सरंजामी, वर्चस्ववादी प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. एखादी गोष्ट योग्य-अयोग्य, चांगली-वाईट असणे हे व्यक्ती सापेक्ष आहे. स्वतःला जे योग्य वाटतेय, चांगले वाटतेय त्याची जबरदस्ती इतर व्यक्तींवर करू नये अगदी त्या आपल्या कुटुंबाचा भाग असतील आणि सर्वांगीण दृष्ट्या आपल्यावर अवलंबून असतील तरी आपण त्या व्यक्तीच्या मतांचा आदर करणे हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. लोकशाहीची अशी प्रगल्भता समाजाच्या प्रत्येक व्यक्तींच्या विचारांमध्ये भिनली तर एक सुदृढ समाज निर्माण होऊ शकतो व परिपूर्ण लोकशाही अस्तित्वात येऊ शकते. प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी मिळण्यासाठी लोकशाही टिकली पाहिजे आणि दिवसेंदिवस ती जास्त निकोप व्हायला हवी.  सुजाण नागरिक म्हणून ती आपल्या सर्वांची गरज आणि जबादारी आहे.

                                                   संतोबा...

Wednesday, July 6, 2022

मानसिक आरोग्य

                आजकालच्या धक्काधक्कीच्या, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य ही ढासळत चालले आहे. शारीरिक आरोग्याबाबत आपण फार सजग नसलो तरी एका ठराविक मर्यादेनंतर आपण शारीरिक आरोग्याची काळजी घेतो. पण मानसिक आरोग्याबाबत आपले नेहमीच दुर्लक्ष होते, किंबहुना मानसिक आरोग्य बिघडवणारी परिस्थिती कशी हाताळायची हेच कळत नाही. कौटुंबिक कलह, वडिलोपार्जित संपत्तीतील वाद नात्यातील क्लिष्टता, नोकरी धंद्यातील कामाचा दबाव, सामाजिक प्रतिष्ठेचा दबाव आपले मानसिक आरोग्य बिघडवत असतात आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर देखील पडत असतो. आपल्याला मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे मात्र बऱ्याचदा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे बाह्य घटक/व्यक्ती असतात जे आपल्या नियंत्रणात नसतात. अशावेळी आपल्याला त्यांना व्यवस्थित हाताळायला आले पाहिजे. 

               कौटुंबिक कलह आणि नात्यातील क्लिष्टता हे मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे सगळ्यात प्रमुख घटक आहेत. त्यात प्रामुख्याने दोन पिढ्यांमधील विसंवाद.वडिलोपार्जित संपत्तीचे वाद, नात्यामधील कर्तव्ये आणि हक्क यांचा असमतोल,  बदलत्या परिस्थितीत दोन कुटुंबांमधील आर्थिक, सामाजिक स्थर रुंदावणारी दरी. स्वतःच्या व इतरांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे. जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग, विश्वासघात.  नात्यांमधील मानपान, गैरसमज या गोष्टींचा समावेश होतो. हे सगळं मिटवण्यासाठी आपण कितीही सामोपचाराची समजूतदारपणाची भूमिका घेतली तरी त्याला फारसं यश येत नाही. बहुतेकांना हक्काची जाण असते पण जबाबदारीचे भान नसते, त्यांना कर्तव्यामध्ये वाटा नको असतो पण हक्कांमध्ये दुसऱ्याचा वाटा असू शकतो याची समज नसते आणि त्याच गैरसमजापोटी बऱ्याचदा आडमुठेपणाची भूमिका घेतली जाते. काही वेळा कोर्टकचेऱ्या करण्याची वेळ येते, त्यामधून काहीच साध्य होत नाही याउलट वेळ, पैसा आणि मानसिक स्वास्थ्य धुळीस  मिळते. अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात.

             नात्यांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे सोपे नसते, अशावेळी आपण नात्यांमध्ये दुजाभाव करायचा नाही, सगळ्यांना आपले समजायचे, त्यांनी आपल्याला आपले समजायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, त्यासाठी आपण आपले मानसिक आरोग्य खराब करायचे नाही. त्यांनी आपल्याला आपले समजावे हा अट्टहास आपण सोडून द्यायचा. कारण स्वभावाला औषध नसते. जेव्हा दोन पिढ्यांमध्ये विसंवाद होतो त्यावेळी आपण त्यांच्याजागी आपल्याला ठेऊन विचार करावा, त्यांचा संघर्ष, अनुभव हा वेगळ्या पातळीवरचा असतो. वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस जनरेशन गॅपची समस्या जटील बनत चालली आहे. आपण आयुष्यभर फक्त बेरीज करत राहायची आणि केवळ त्या बेरजेत अडथळा आणणाऱ्यांची वजाबाकी करायची.  आपले आचारविचार कोणावरही लादायचे नाही, नात्यांना बंधनात बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना योग्य ती मोकळी दिली तर ती जास्त निरोगी राहतील. आपण कुटुंबाचा आधार बनून इतरांना परावलंबी बनवण्यापेक्षा, कुटुंबाचा पाया बनण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वाँना स्वकर्तृत्वावर भरारी घेता येईल. महत्वाचे म्हणजे जसे आहात तसे रहा, आदर्शवादाचा झेंडा मिरवत कोणाचा गॉडफादर बनण्याचा प्रयत्न करू नका. कोणालाही सदा सर्वकाळ खुश ठेवता येत नाही, कोणासाठी कितीही केलं तरी पलटायचे असते त्यावेळी ते पलटतातच शिवाय त्यासाठी बिनबुडाची कारणे देत सगळा दोष आपल्यालाच माथी मारून, यथेच्छ बदनामी करून नामानिराळे होतात. त्यामुळे लोकांच्या मनातून उतरण्याची चिंता करू नका, स्वतःच्या मनातून उतरणार नाही याची दक्षता तेवढी घ्या.

              आजकाल पैसा, संपत्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. पैसा, संपत्ती नसेल तर आपल्यालाही समाजात काही किंमत राहत नाही. पैसा कमावण्यासाठी त्यासाठी लोकं वाट्टेल त्या थराला जातात. पैसा मिळवणे गरजेचेच आहे पण त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायची वा काही धूर्त डावपेच खेळायची गरज नाही. पैशासाठी कोणाची लाचारी पत्करण्याची वा कोणाचे मिंधे होण्याचीही गरज नाही. कोणाच्या हातचे बाहुले बनण्यापेक्षा नितीनियमाने जेवढा कमवता येईल तेवढा पैसा कमवा व सुखासमाधानाने रहा. फुकट मिळणारी झोपही पैशाने विकत घेता येत नाही म्हणून असे कोणते कृत्य करू नका ज्याने तुमची झोप उडेल. आयुष्यात अनेक प्रसंग येतात जिथे वादातील आपल्याच हक्काच्या गोष्टी आपले जिवलग लांड्यालबाड्या करून लुबाडू पाहतात. अशावेळी जेवढे सामोपचाराने मिटवता येईल तेवढे मिटवण्याचा प्रयत्न करा नसेल मिटत तर इतर कायदेशीर मार्गाने मिटवण्याचा प्रयत्न करा. एवढं सगळं करून पदरी काही पडण्याची शक्यता नसेल किंवा हे लढण्यात जे मिळणार आहे त्यापेक्षा जास्त  वेळ आणि पैसा खर्च होणार असेल तर  जे तर तो नाद सोडून द्यावा. तो वेळ आणि पैसा इतर ठिकाणी गुंतवा त्याचा परतावा निश्चित जास्त आणि समाधन देणारा असेल.पानगळ झाल्याशिवाय नवी पालवी फुटत नाही. कधी कधी काही गोष्टी निर्व्याजपणे सोडता आल्या पाहिजेत, मग ती संपत्ती असो वा नाती. हे जमलं तर मानसिक ताणतणाव आश्चर्यकाकरीत्या गायब होतो शिवाय तुम्ही त्यागले ते कोणत्या न कोणत्या रूपात सव्याज परत मिळेल.  आपण मानपान करायचा आणि त्यांनी मनमानी करायची हे जास्त काळ सहन करून चालत नाही, योग्यवेळी अशांना आपल्या आयुष्यातून बाद करणे जास्त योग्य असते, अशावेळी जास्त फायद्यातोट्याचा विचार करून चालत नाही. आपल्याशी वाईट वागणाऱ्यांबद्दल कुठलीही बदल्याची भावना मनात ठेऊ नये. बदल्याची भावना समोरच्यापेक्षा आपल्या स्वतःला जास्त त्रास देते इतरांना त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना क्षमा करायचे नाही तर आपल्याला त्रास नको म्हणून त्यांच्या चुकांना माफ करायचे. माफ करून ते जर सुधारण्यासारखे नसतील तर त्यांना आयुष्यातून कायमस्वरूपी बाजूला करणे श्रेयस्कर समजायचे.

          समाजात वावरताना, नोकरी धंद्यात अनेकदा आपण अडचणीत सापडतो, काही गोष्टीबद्दल आपल्या मनात एकप्रकारची भिती बसलेली असते. भित्या पाठी ब्रह्मराक्षस असे म्हणतात, त्याप्रमाणे त्या भितीमुळे आपला आत्मविश्वास डळमळीत होऊ लागतो, तो मानसिक ताण आपल्या पेलवत नाही ना कोणाला सांगताही येत नाही. त्यावेळी आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव असे ठरवून ज्या गोष्टींची भिती वाटतेय त्यांना सरळ भिडायचे. जी गोष्ट घडण्याची भिती वाटते ती घडली असे समजायचे. कसलेही ओझे घेऊन जगायचे नाही मग ती भिती असो कोणाचे उपकार तात्काळ त्यातून बाहेर पडायचे.  कधीही कोणाची बरोबरी करण्याच्या भानगडीत पडू नये कधीही कोणाशी तुलना करू नये. तुमच्याकडे काय नाही हे पाहताना तुमच्याकडे जे काही आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण तुमच्याकडे जे काय आहे ते मिळावं अशी ही कित्येक जणांची स्वप्न असतील. जे नाही ते मिळवण्याच्या नादात जे आहे त्याचा उपभोग घेण्यास विसरू नका. या जगात कोणीच सार्वभौम नाही प्रत्येक जण कोणाला न कोणाला बांधील आहे. प्रत्येकाला कोणती ना कोणती नियमावली पाळावीच लागते. या जगी सर्व सुखी असा कोणीही नाही, प्रत्येकाला तो ज्या पायरीवर आहे त्या प्रकारची सुख आणि दुःख त्याच्या आयुष्यात असतात त्यामुळे कोणाच्या सुखदुःखाचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नये.  शेवटी कितीही मिळवले तरी कमीच आहे आपण कोण आहोत हे पाहण्यापेक्षा आणि इतर कोणाशी आपली तुलना करण्यापेक्षा या ब्रम्हांडात ही आपली अखंड पृथ्वी एक धुलिकणा एवढी आहे हे लक्षात घ्या. कधी हे मिळवायचे ते मिळवायचे असा विचार करताना  "ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?" असं म्हणणारा प्यासा मधील गुरुदत्त डोळ्यांसमोरून तरळून जातो.


                                                संतोबा...

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!