Ads 468x60px

Sunday, October 14, 2018

छगन भुजबळ आणि मी

   श्री. छगन भुजबळ आणि माझा कसलाही संबंध नाही. एकमात्र खरं आहे की ते ज्यावेळी उपमुख्यमंत्री झाले होते त्यावेळी आमच्या नातेवाईकांच्यात भुजबळ आमच्या अमुक अमुकचे,  तमुक तमुक आहेत अशी चर्चा ऐकायला मिळायची एवढंच. एखादी व्यक्ती मोठी झाली की तिला असणाऱ्या नातेवाईंकामध्ये शेकडो पटीने वाढ होते. सत्ता गेल्यानंतर, भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतरच्या जेलवारीनंतर त्या सगळ्या नातेवाईकांचाही भुजबळांशी काही संबंध राहिला नाही. आता बऱ्याच नातेवाईकांचा दुसऱ्या आमदारांशी नातेसंबंध जुळू लागेलत. उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात. मग असे असताना एका मावळतीला निघालेल्या सुर्याबद्दल मी का लिहीत असावं?  खरंतर मी कधीही ना कोणत्या नेत्याचे कौतुक केले ना कोणावर कसले कौतुकाचे लेख लिहिले. अगदीच अती झाले तर टिकाच केली. उलटपक्षी सतत दिल्ली ते गल्ली-बोळातील नेत्यांची कायम तळी उचलणारी फ्लेक्सवाली, दुसऱ्याची हांजी हांजी करण्याव्यतिरिक्त काहीही न करणारी  तरुण पिढी बघितली तरी तळपायांची आग मस्तकात जाते. कोणतेही समव्यवसायिक एकमेकांचे कौतुक करत नाहीत. त्यामुळे कोणाची बाजू घेण्याचा, कोणाचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. हे सारे द्वेषाच्या,सूडाच्या  राजकारणाला विरोध म्ह्णून आहे. माझी राजकीय महत्वकांक्षा काही लपून राहिलेली नाही. उगीच ताकाला जायचं आणि भांडे लपवायचे असले प्रकार मला जमत नाहीत.
                   गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भुजबळांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांच्या कारकिर्दीचा वरवरचा आढावा घेणारे एक खुले पत्र लिहिले होते. त्यानंतर  याविषयावर बऱ्याच वेळा अनेकांशी चर्चा झाली त्या प्रत्येकवेळी भुजबळ जूनच्या आत बाहेर येणार असे मी सांगितले होते. खरं तर ते बाहेर येतील याचीच शाश्वती कोणाला नव्हती, त्यामुळे केव्हा येणार हा प्रश्नच नव्हता. मे महिन्यात छगन भुजबळांना जामिन मिळाला आणि सोशल मिडियावर समर्थन आणि विरोधाच्या पोष्टींचा महापूर आला.पुढे जून मध्ये समीर भुजबळांनादेखील जामीन मिळाला आणि ते सुद्धा जामिनावर बाहेर आले. भुजबळांना अटक झाली म्हणून ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या त्यांचा आता जळफळाट होऊ लागला होता. जी व्यक्ती सर्वार्थाने निष्कांचन झालीये, ज्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा सूर्य  अस्तंगत झाल्यात जमा आहे. सर्व समाज भ्रष्टाचारी म्हणून त्या व्यक्तीला शिव्या शाप देतोय. सगळीकडे त्या व्यक्तीची छिथू होतेय, त्या व्यक्तीची, तिच्याशी काही घेणेदेणे नसताना तिची बाजू घेणे म्हणजे स्वतःची नाहक बदनामी करण्यासारखं नाही का? पण तरीसुद्धा मी त्या मावळत्या सूर्याची बाजू घेतोय कारण न झालेल्या "महाराष्ट्र सदन घोटाळ्यात" भुजबळांचा राजकीय बळी दिला जात आहे हे जाणवत होते. हे सारे जाणीवपूर्वक आणि बदल्याच्या राजकारणातून होत आहे हे स्पष्ट होते.
                  भुजबळांसारखा लढवय्या नेत्याचा बळी दिला म्हणजे आपल्या मार्गातील मोठा अडथळा दूर होईल, अर्थात हा बळी भुजबळांचाच का ? यासाठी इतरही बरीच कारणे आहेत. भुजबळांसारख्या ताकदवान व्यक्तीला आवाज दाबला तर बाकीचे आवाज आपोआप बंद होतील, आपल्याला विरोध करण्याची हिंमत कोणी करणार नाही अशी सत्ताधाऱयांची समजूत झाली असावी. त्याच समजुतीतून हे द्वेषाचे , सुडाचे राजकारण खेळले असावे. असे हे द्वेषाचे, सुडाचे राजकारण फार काळ टिकत नाही. नेत्यांचा आवाज दाबला तरी जनतेचा आवाज आणि रोष कोणी दाबू शकत नाही म्ह्णूनच ज्या सत्ताधाऱयांना आता पुढील पन्नास वर्षे आपलीच सत्ता राहणार याची खात्री होती त्यांना पहिली पंचवार्षिक पूर्ण व्हायच्या आतच आपले सिंहासन ढळमळीत झाल्याचा साक्षात्कार होऊ लागलाय. ज्या तथाकथित सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या लोकांनी सुपारी घेऊन भुजबळांचा राजकीय खून करायचा प्रयत्न केला, त्यांच्या आजारपणाची खिल्ली उडवली, चांगले उपचार न मिळण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे सामाजिक कार्य भुजबळांना संपवण्याइतकेच होते कि काय असा प्रश्न पडतो कारण नंतर त्यांनी कोणाविरुद्ध आवाज उठवला नाही. त्यांनाही त्यांच्या या कामाची पोचपावती मिळेल. ज्या व्यक्तीला जनतेने निवडून दिले आहे तो फक्त भुजबळांवर सूड उगवण्यापुरता बोंब  ठोकत होता व इतरवेळी गोट्या आणि दांडिया खेळत होता  त्यालाही त्याच्या कामाची पोचपावती मिळेल. ढोंगी लोकांचे ढोंग फार काळ  टिकणार नाही. वेळ लागेल पण अंतिम विजय सत्याचाच होईल.
               शेवटी पुन्हा एकदा तेच सांगतोय भुजबळ चुकले असतील, कदाचित एखादा गुन्हा त्यांच्याकडून घडला असेल पण त्यासाठी न्यायालय पुराव्याच्या आधारे त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवेल. जोपर्यंत न्यायालय त्यांना दोषी ठरवत नाही  तोपर्यंत कोणत्याही भूलथापांना बळी  पडून साप साप करत  भुई धोपटत बसू नये.  हे तेच भुजबळ आहेत ज्यांनी जनतेसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एकहाती लढा दिलाय, तुरुंगवास भोगलाय , राजकीय कारकीर्द पणाला लावली आहे. महाराष्ट्रावर वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाय. संधी मिळाली तेव्हा उदाहरण म्हणून दाखवता येतील अशी  कामे केली आहेत. अगदी महाराष्ट्र सरकारचा एकही पैसा , एकही गुंठा न वापरता महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे महाराष्ट्र सदन निर्माण केले. ज्याचे कौतुक त्यांच्या विरोधकांनाही करावे लागतेय, त्याच महाराष्ट्र सदनात घोटाळ्याचा आरोप केला जातोय ही  फार मोठी शोकांतिका आहे. भुजबळ चुकले असतील, त्यांच्याकडून एखादा गुन्हाही घडला असेल पण त्यांनी केलेला संघर्ष अतुलनीय आहे. त्यांची रोमांचकारी कारकीर्द इतरांना निश्चित मार्गदर्शक ठरेल, त्यांची जीवनाच्या धड्यातुन कोणी काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे. 
           मा. श्री. छगन भुजबळ यांस  एकाहत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (उगीचच गैरसमज होऊ नये म्हणून लक्ष,कोटी,अनंत असे शब्द वापरले नाहीत).                                                                                                   
                  माझे राजकीय  गुरू, पॉलिटिक्सचे  प्राध्यापक. श्री. दशरथ सावंत सरांना शिरसाष्टांग दंडवत.
                                                                                  संतोबा (संतोष गांजुरे).

आगलाव्या निरुपम

         मागच्या आठवड्यात संजय निरुपमने नेहमीप्रमाणे जाणीवपूर्वक आगलावे वक्तव्य केले कि,  "मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केलं नाही ना, तर महाराष्ट्र, मुंबई ठप्प होईल. मुंबईकरांना जेवायला ( रोटी, सब्जी ) मिळणार नाही."  ही अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या निरुपमची अवस्था चालत्या बैलगाडीच्या सावलीत चालणाऱ्या कुत्र्यासारखी आहे. त्याला जर वाटत असेल की, बैलगाडी माझ्यामुळेच चालत आहे तर त्याने त्या बैलगाडीच्या सावलीतून आणि सुरक्षतेतून बाहेर येऊन पहावे. पण तो तसे करणार नाही कारण त्याला त्याच्या मर्यादा माहित आहेत आणि परिणाम देखील.
  उत्तर भारतीय उत्तरभारत, बिहार सुजलाम सुफलाम झालाय, उद्योगधंद्याची भरभराट झाली आहे, तिथे कायद्याचे राज्य आहे, सर्व जनतेला शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी उपलब्ध आहेत. ही राज्य आर्थिक, सामाजिक दृष्टया प्रगत आहेत आणि अशी प्रगती इतरांची व्हावी या उदात्त हेतूने उत्तरभारतीय इतरत्र स्थलांतरित होत नसून, पोटापाण्यासाठी आणि सामाजिक असमतेला कंटाळून ते इतर राज्यात विस्थापित होत आहेत. खरेतर उत्तरभारताचे राजकीय आणि भौगोलिक महत्व पाहता ही राज्ये मागास न राहता प्रगत व्हायला हवी होती. पण पराकोटीचा जातीयवाद, त्यातून उदभवणारी गुन्हेगारी आणी त्याला खतपाणी घालणारे, दूरदृष्टीचा अभाव असणारे राजकारणी यामुळे ही राज्ये मागास राहिली.  
           आपल्या कुटुंबापासून दूर, दुसऱ्या राज्यात गुलामांप्रमाणे पडेल ते काम करताना. जनावरांच्या पेक्षा जास्त हालाखीचे जीवन जगत असताना तिथे उगवलेले तथाकथित संजय निरुपम सारखे संधीसाधू राजकारणी त्यांचे जीवन अजूनच खडतर बनवत असतात. कारण त्यांना खरंच उत्तर भारतीयांचा कळवळा असता तर गुजरातमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर असे आगीत तेल ओतणारे वक्तव्य केले नसते. गुजरात मध्ये एका दुर्दैवी घटनेमुळे हजारों उत्तरभारतीयांना परागंदा व्हावं लागतं असताना, निरुपम महाराष्ट्रात दोन समाजमध्ये तेढ निर्माण वक्तव्य करून तशी परिस्थिती निर्माण करत नाही का? हे सर्व उत्तरभारतीय जनतेने जाणून अशा वक्तव्यावर टाळया वाजवण्यापेक्षा, अशी भाषा करणाऱ्याला वाजवायला हवी. तरच निरुपमसारखे संधीसाधू मतांचे केंद्रकिकरण करण्यासाठी असली वादग्रस्त वक्तव्ये करण्यास धजवणार नाही.
            खरंतर परप्रांतीय ही संकल्पनाच चुकीची आहे कारण आपण प्रत्येक जण कधी न कधी, कोठून ना कोठून स्थलांतरित,विस्थापित झालेले आहोत. ज्यावेळी मी कोल्हापूरला शिक्षणांसाठी गेलो त्यावेळी  कदाचित कोल्हापूरकारांसाठी मी उपरा असेल आणि आता तेच पुण्यात नोकरीसाठी आलेत तेव्हा ते पुणेकरांसाठी उपरे आहेत  असे म्हणता येईल. असे म्हणतात कि जिथे पिकते तिथे विकत नाही आणि म्हणूनच स्थलांतरण  हे अपरिहार्य आहे. ते विश्वाच्या सुरुवातीपासून सुरु आहे ते शेवटपर्यंत चालूच राहील. त्याच्यावर निर्बंध घालता येणार नाहीत. मात्र असे असले तरी स्थलांतर केलेल्यांनी स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेणे अपेक्षित असते पण ज्यावेळेस स्थलांतरितांमध्ये वर्चस्ववादाची भावना निर्माण होते त्यावेळेस संघर्ष अटळ असतो.  हा संघर्ष टाळण्यासाठी  परप्रांतीयांनी स्थानिकांशी जुळवून घ्यायला हवे व स्थानिकांनी आपल्या प्रादेशिक, भाषिक ,वांशिक अस्मिता एका मर्यादेत ठेवायला हव्यात. स्थानिक माणूस काबाडकष्ट करत नाही हा जाणीवपूर्वक पसरवलेला गैरसमज आहे, स्थानिक व्यक्ती कष्ट करतो पण त्याला त्याच्या हक्काची जाणीव असते. तो सोळासोळा तास गुलामासारखे पडेल ते काम करत नाही. कायद्याने प्रत्येकाला कामाचे तास, किमान वेतन आणि इतर लाभ दिलेले आहेत.  या कायद्याचा फायदा सर्वाना व्हायला पाहिजे कि नको?. कारखानदार, ठेकेदारांना अशा जागृत कामगारांपेक्षा कमी पैशात, सांगेल ते काम करणारा गुलाम पाहिजे असतो. म्ह्णून हे लोक स्थानिक व्यक्ती कष्ट करत नाहीत, असे गैरसमज पसरवत असतात.
              संजय निरुपमने महाराष्ट्र, मुंबईची काळजी करण्यापेक्षा उत्तरभारत आणि उत्तरभारतीयांच्या प्रगतीसाठी काहीतरी सकारात्मक कार्य करावे जेणेकरून उत्तरभारतीयांना उपरे म्हणून इतर राज्यात जगण्यापेक्षा स्वतःच्या राज्यात स्वतःच्या कुटुंबासमवेत मानसन्मानाने जगता येईल. हे असे घडले तर या गोष्टीचा भारतीय म्हणून आम्हाला अभिमानच वाटेल. या चांगल्या बदलाबद्दल आम्ही निरुपमचे कौतुकदेखील करू. पण सध्यस्थितीत काँग्रेसने अशी बाष्कळ बडबड करणाऱ्या निरुपमला तात्काळ पदमुक्त करून त्याला पूर्णवेळ समाजसेवा करण्याची संधी द्यावी कारण सकारात्मक राजकारण त्याला इथे मुंबईत जमणार नाही. विरोधीपक्षांपेक्षा जास्त जबाबदारपणे आणि कणखरपणे विरोधीपक्षाची भुमिका जनता बजावत असल्यामुळेच संपूर्ण भारतात सुफडासाफ झालेल्या काँग्रेसला परत उभारी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे त्या संधीची माती अशा बाष्कळ बडबड करणाऱ्या लोकांमुळे मातीमोल करू नये.
                                                                            संतोबा (संतोष गांजुरे).


Tuesday, October 2, 2018

मी आणि माझी अहंकारीक वचने - १३

तो फेकतो आणि बरेचजण लागोलाग कामधंदा सोडून फेकलेले कसे फसवं आहे 
हे सिद्ध करू लागतात! हीच त्याची खरी ताकद आहे.
#आभाळ_फाटलंय_मुद्द्याचे_बोला

*********************************************************************************
अभ्यास किती केला ते सांगू नको,
मार्क्स किती मिळाले ते सांग.

*********************************************************************************
भावड्या, दुसऱ्याची उणी-धुणी काढून, बदनामी करून त्याची जागा तू पटकावू शकणार नाहीस,
त्यापेक्षा त्याच्या दहा टक्के चांगली कामे केली असती तरी तुझी स्वतःची जागा निर्माण झाली असती!
#धोबी_का_कुत्ता_न_घरका_न_घाट_का

*********************************************************************************
ज्यांचा तुम्ही ते वाईट समजून द्वेष करता व स्वतःच्या चुका झाकण्यासाठी त्यांच्याशी तुलना करता,
त्यावेळी ते वाईट असतील वा नसतील पण तुम्ही मात्र त्यांना आदर्श मानून त्यांच्या मार्गावर 
चालत आहात असा त्याचा अर्थ होतो.
त्याचबरोबर तुम्ही स्वतःकडे अक्कल हुशारीची कमतरता आहे याचेही प्रदर्शन करता !!!

*********************************************************************************
भावड्या, एक लक्षात येतंय का तुझ्या, त्याला झाकता झाकता तू उघडा पडत आहेस!!!

*********************************************************************************
भावड्या मी तुझ्याशी वाद घालतो म्हणून मी पप्याच्या बाजूने आहे असं समजू नको. 
तुमची कपडे संभाळण्याव्यतिरिक्त इतर देखील महत्वाची कामे असतात एवढे लक्षात ठेव.

*********************************************************************************
                                                                                                       संतोबा (संतोष गांजुरे).

मी आणि माझी अहंकारीक वचने - १२


राजकारण्यांचे वांझोटे समाजकार्य म्हणजे स्वतःचे राजकीय अज्ञान आणि कर्तव्याची 
नसलेली जाण लपवण्यासाठी शोधलेली पळवाट.

*********************************************************************************
त्या दोघांची रोज ऑफिसात कडाक्याची भांडणे होतात, याचा अर्थ  
त्यांचा घटस्फोट होईल या भ्रमात राहू नका! ऑफिसबाहेर त्यांचा संसार सुखनैव चालू आहे.
थोडावेळ आहे अजून 'हात'मिळवणी करून नीट "काम" करा नाहीतर 
पंचवार्षिकपितृपक्षात मुहूर्ताअभावी पाचवर्षे ताटकळत रहावे लागेल.

*********************************************************************************
चिन्या तू त्या बाळ्याशी तुझी तुलना करायची सोडून दे. 
बाळ्या आयटीआय करून चांगल्या नोकरीला लागलाय, घरदार संसार थाटलाय 
आणि तुला लका लय हुशार समजून इंजिनीअरिंगला पाठवलं 
अन तू अजून चाळीशीत आला तरी प्रबंधच लिहितोय.

*********************************************************************************
मी कोणाला काही म्हणलं, कोणावर टीका केली, अगदी चेष्टेत एखाद्याला 
जोकर म्हणलं तरी ते मी भावड्यालाच उद्देशून बोललो असे तुला का वाटते?
एवढेच काय तर मी सोन्याचं कौतुक केले तरी त्याआडून भावड्यावरच 
टीका केली असे तुला वाटते, खरेच भावड्या एवढा वाईट आहे का रे?.

*********************************************************************************
आमच्या लहानपणी खिरीत शेवया आणि तळ्यात कमळ कधी मिळालंच नाही.
आमच्या नशिबात तांदळाची खीर अन जलपर्णीची फुलंच होती.
#गावाकडचे_ग्रेट_स्ट्रगलर्स!!!

*********************************************************************************
                                                                                                 (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने - ११

माझी "यशस्वी उद्योगपती व्हा" ही व्याख्यानमाला यशस्वी झाली नसती तर मलाही
 कुठे तरी रोजंदारीच करावी लागली असती.

*********************************************************************************
लाखों रुपयांची बिदागी घेणारे कीर्तनकार, मला "स्टँडअप कॉमेडीयन" पेक्षा वेगळे वाटत नाहीत.

*********************************************************************************
जर माझ्या आयुष्यात शनाया आली तर तू राधिका होशील का?
३०० कोटींची कंपनी हस्तगत करशील का?
#तुझ्या_सवतीचा_नवरा

*********************************************************************************
काही लोक्स आयुष्यभर कष्ट करून मोठं होण्याचा प्रयत्न करतात आणि काही
क्षणभरात लग्न करून मोठे होतात🙂.

*********************************************************************************
विराट एकटाच संपूर्ण संघाच्या अर्धे रन्स काढणार असेल तर
किमान नॉन प्लेइंग कॅप्टन म्हणून अनुष्काला खेळवायला हरकत का असावी???

*********************************************************************************
लग्नपत्रिका, फ्लेक्सवरील तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांची भली मोठी यादी पाहून, 
शेतमजुरांच्या कमतरतेच्या समस्येवर उतारा सापडल्यासारखे वाटतं.

*********************************************************************************
शेलार- चला गणपती बुडवायला.
वाळिंबे-आमच्यात विसर्जन करतात.
(शेलार-वाळिंबे जोरदार वाद)
वाळिंबे- काय रे संतोबा,बरोबर ना! 
संतोबा- दोघेही बरोबर आहात. वाळिंबे प्राणप्रतिष्ठापणा करतात म्हणून विसर्जित करतात, 
शेलार बसवतात म्हणून बुडवतात.

*********************************************************************************
                                                                                       (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने - १०


तुमचे गैरसमज, रुसवे-फुगवे, मानापमान हे सगळं पाहण्यात माझे अर्धे आयुष्य गेलंय. 
आता तुम्ही ते सगळं आयुष्यभर जपून ठेवा. माझ्या जगण्याच्या संघर्षात आता त्यासाठी वेळ नाही.
#सख्खे_सोयरे_पक्के_वैरी# 

*********************************************************************************
तुम्ही मला सोडून गेल्याच्या दुःखापेक्षा, तुम्ही सगळे एकटे पडल्याचे दुःख अधिक आहे.
तुम्ही रक्ताची नाती तोडलीत, 
मी माणुसकीची नाती गुंफत चाललोय.

*********************************************************************************
पूर्वी भाऊ म्हणजे आधार आणि बहिण म्हणजे प्रेम असे काहीसं ते नाते होते,
आता भाऊ म्हणजे आरोपी आणि बहीण म्हणजे दहशत असे ते झालंय.
#पाशवी_स्त्री-पुरुष_समानता_विजय

****************************************************************************************

पैशांमुळे लोकांना जमिनींचे मोल कळले आणि मला जमिनीमुळे पैशांचे!

*********************************************************************************
मी केलेल्या सर्व्हेमधून जे लोक उधारी, उसनवारी करतात त्यांना स्मृतिभ्रंशाचा विकार जडला असल्याचे दिसून आले आहे!!!

*********************************************************************************
लोकं जर आपली विनाकारण बदनामी करत असतील तर आपणच आपली एवढी बदनामी करायची की,
 त्या लोकांनाच आपल्याबद्दल सहानुभूती वाटायला हवी!!!

*********************************************************************************
ज्याची सावलीच पडत नाही तो कितीही मोठा झाला तरी वांझोटाच ठरणार!!!
#आधारस्तंभाच्या_छत्रछायेत

*********************************************************************************
                                                                                           (संतोबा)संतोष गांजुरे.

मी आणि माझी अहंकारीक वचने - ९

बदल घडत नसतो, तो घडवायला लागतो.
नुसत्या शिळोप्याच्या गप्पा मारून काहीही साध्य होत नाही.

*********************************************************************************
स्वतःला स्वतःची ओळख नसली की जीवन जगणे अवघड होऊन बसते.

*********************************************************************************
भावड्या, समोर खड्डा आहे हे मी तुला सांगून सुद्धा तू तसाच पुढे जाणार असशील तर,
तू त्या खड्डयात पडल्यानंतर मी तुझ्या मदतीला यावे अशी अपेक्षा करू नको.

*********************************************************************************
बदल्याची भावना मनात ठेवून सर्वांगीण बदल(चांगला) घडवता येत नाही.

*********************************************************************************
ज्या कायद्याला तुम्ही वाकवू शकता तोच कायदा एखाद्या दिवशी तुम्हाला सरळ करू शकतो, 
हे कायदा वाकवण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

*********************************************************************************
तुम्हाला दिलेल्या सेवेचा मोबदला तुमच्या खिशात पैसे असताना, 
आदरयुक्त प्रेमाने समोरचा नाकारतो ती तुमची श्रीमंती.
आणि तरीही तुम्ही कोणाचा एक रुपयाही देणे बाकी ठेवत नाही हा तुमचा मोठेपणा.

*********************************************************************************
पुण्याला देशातील जगण्यासाठी सर्वांत चांगले शहर घोषित करण्यापूर्वी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या जबाबदार अधिकाऱ्याने हडपसर ते हिंजवडी प्रवास करून पहिला असेल का?

*********************************************************************************
उत्पादने देशभक्तीच्या तराजूत मोजण्याऐवजी गुणवत्तेच्या तराजूत मोजली तर.....

*********************************************************************************
तुम्ही प्रशासकीय अधिकारी झालात ! अभिनंदन!!!
आता आपले कर्तव्य नेकीने पार पाडा.
बोल बच्चनगिरीच्या फंदात पडू नका, त्यासाठी स्वयंघोषित तज्ञ आहेत.

*********************************************************************************
एमपीएससी, युपीएससी चा अभ्यासक्रम थोडा सोपा करायला काय हरकत आहे? उमेदीच्या काळातील चारदोन वर्षे अभ्यास करण्यात खर्ची घालवून चमकणारे भावी अधिकारी प्रत्यक्ष कर्तृत्व दाखवायची वेळ येते त्यावेळेस खच खात असतील का? कारण काही सन्माननीय अपवाद वगळता कोणी काही रचनात्मक, सृजनशील, आवाक्याबाहेरचे काम केल्याचे दिसून येत नाही. यांची सारी शक्ती, बुद्धी अभ्यास करण्यात तर खर्च होत नसेल?

*********************************************************************************
                                                                                                (संतोबा)संतोष गांजुरे.
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!