फार फार वर्षांपूर्वीची नव्हे तर कालपरवाची कदाचित उद्याचीही गोष्ट असू शकते.सुराष्ट्र नावाचं एक महानगर होतं. महानगराच्या जवळच एक भलामोठा तलाव होता. अनेकवर्षं जेमतेम पर्जन्यमान असल्याने बराचकाळ तलाव कोरडाठाण असायचा. चार दोन वर्षांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे तलाव पूर्ण भरला होता. जोरदार पावसामुळे भरपूर प्रमाणात माती वाहून आल्याने तलावात गाळही बराच गाळ भरला होता.
वार्षिक परिक्षा नुकत्याच संपल्यामुळे शाळकरी मुले घरचांच्या विरोधानंतर देखिल लपूनछपून दुपारी तलावावर पोहायला जाऊ लागली होती. सध्या पाणी फार खोल नसले तरी गाळ खूप होता. तळ्यात बरोबर मध्यभागी एक फुलांचा ताटवा फुलला होता.दुपारच्या उन्हात तो भलताच आकर्षक वाटत होता. या अशाच फुलांनी काही वर्षांपूर्वी एका शाळकरी मुलाचा बळी गेला होता. त्यामुळे शाळकरी मुलांना तलावावर पोहायला बंदीच घातली होती पण तरीही घरच्यांच्या अपरोक्ष दुपारी मुले पोहायला जाऊ लागली होती.
सुरवातीला तलावाच्या कडेला पोहणाऱ्या मुलांना मध्यभागी फुललेली आकर्षक फुले खुणावत होती.मात्र पाणी आटत आल्यामुळे गाळात अडकण्याची भितीसुद्धा होतीच. तरीसुद्धा काही मुलांनी ती फुले आणण्याचे धाडस करण्याचे ठरवले. दुर्दैवाने त्यापैकी एक मुलगा गाळात अडकलाच, बाकीच्या मुलांनी आरडाओरडा करून इतर गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले.
खरंतर मुले त्या फुलांना भुलून भलते धाडस करतील म्हणून गावातील लोक मुलांना पोहायला जाऊ देत नव्हते आणि ही घटना घडली त्यामुळे गावातील जुन्याजाणत्या ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन मुलांना पोहायला न जाण्याचे आवाहन केले ती फुले ना सुवासिक आहेत ना त्याचा काही उपयोग आहे असेही सांगण्यात आले. कारण परत मुले त्या फुलांकडे जातील याची शंका होती. मात्र एवढे सांगूनही दुसऱ्यादिवशी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. शेवटी त्याच रात्री गावातील जुन्याजाणत्या मंडळींनी बैठक बोलावली व या समस्येवर उपाय म्हणून तो फुलांचा ताटवा उखडून फेकायला ठरवले व दुसऱ्यादिवशी भल्यासकाळी दोघाचौघांनी तो फुलांचा ताटवा उखडून नाहीसा केला.
दुसऱ्यादिवशी दुपारी जेव्हा ती मुले पोहायला गेली त्यावेळी तो फुलांचा ताटवा गायब होता मात्र त्या फुलांबाबतचे मुलांचे कुतूहल कायम होते. कारण अशी फुले ना त्यांनी शेतात पाहिली होती ना कुठे बाजारात पहिली होती. त्यामुळे त्या मुलांच्या चौकस बालमनाला त्या फुलांबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती पण आता त्यासाठी किमान वर्षभर वाट पाहण्याची गरज होती.
गावातील कोणीच त्यांना त्या फुलांबद्दल माहिती दिली नाही पण तुम्हाला जर त्या जीवघेण्या फुलांबद्दल काही माहिती असेल तर ती माहिती त्या मुलांना सांगाल का?