Ads 468x60px

Sunday, October 15, 2017

एक पत्र भुजबळसाहेबांना....

          बऱ्याच दिवसांपासून आपल्याबद्दल लिहायचे मनात होते, पण आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहितोय. हो वाढदिवसाचे निमित्तच, कारण मी कोणाला कधी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही. शिवाय सध्याची आपली अवस्था पहाता कोणी आपणांस शुभेच्छा देण्याचा धोका पत्करेल असे वाटत नाही. तुमच्याबद्दल लिहितोय म्ह्णून काही लोकांना माझा विटाळ होऊ शकतो पण म्हणून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकीय त्यापेक्षाही सामाजिक क्षेत्रातील आपल्या योगदानाकडे कानाडोळा करणे करंटेपणाचे ठरेल.
        आपण सामान्य शिवसैनिकांपासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा महापौर व इतरही महत्वाची पदे शिवसेनेतील २५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भूषवली. आपण १९८५ मध्ये शिवसेनेचे एकमेव आमदार व दोनच महिन्यांनी सेनेचे मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर झालात. शिवसेनेने  आपल्याला भरभरून दिले एवढंच काय तर सत्ता आली तर आपणच मुख्यमंत्री होणार अशी सर्वानाच खात्री होती. तरीही आपण सेनेला जय महाराष्ट केलंत. अजाणत्या वयात बाळासाहेब आणि शिवसेनेबद्दल आम्हालाही सुप्त आकर्षण होते, त्यामुळे आमच्या लेखी तुम्ही गद्दारचं होता, ज्यांनी शिवसेना सोडणे फक्त राजकीय दृष्टिकोनातून पाहिले त्यांना त्यामागची सामाजिक कारणे, प्रेरणा तर ज्यांनी सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले त्यांना त्यामागची राजकीय कारणे व प्रेरणा लक्षात आपल्या नाहीत. ज्या काळात सेना सोडणे म्हणजे मोठ्या संकटाला प्रसंगी मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे होते. त्याकाळात फक्त सामाजिक वा फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिवसेना सोडली नसून सामाजिक आणि राजकीय या दोन्हींच्या घुसमटीतून सोडली असण्याची शक्यता जास्त वाटते.
          आपण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालात कारण त्यांचे आणि आपले विचार जुळत होते. मराठीचा मुद्दा-बॉम्बे चे मुंबई नामकरण आपल्याच महापौर पदाच्या काळात व आपल्या पुढाकाराने झाले, सुंदर मुंबई मराठी मुंबई अभियान चालवून त्याची सुरूवात म्हणून हुतात्मा स्मारकाजवळ उद्यान शिल्प उभारले.  कर्नाटक-महाराष्ट्र्र सीमावाद- वेष बदलून नेतृत्व केलं प्रसंगी तुरुंगवास भोगला. हिंदुत्ववाद- रिडल्स प्रकरणात दलितांच्या मोर्च्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भव्य मोर्च्याचे आयोजन केले. त्याला प्रतिउत्तर म्हणून दलितांनी अतिभव्य मोर्चा काढला व मोर्चाचा संयम सुटून आपण उभारलेल्या  हुतात्मा स्मारकाची मोडतोड  करण्यात आली. आपणही हुतात्मा स्मारकाचे शुद्धीकरण करून आगीत तेलच ओतले. अनेक प्रस्थापित नेत्यांना मागे सारून आपण शिवसेनेत अगदी वरचे भक्कम स्थान निर्माण केले. एखादी व्यक्ती लोकप्रिय झाली कि त्याचे पंख छाटले जातात याचा आपण पहिल्यांदा अनुभव १९८९ मध्ये घेतलात. १९८९ च्या शिवसेनेच्या पुणे अधिवेशनात ग्रामीण भागात काम करण्यासाठी शेतकरी सेना नावाची संस्था स्थापन करण्याची घोषणा केली व त्या संघटनेची सूत्रे आपल्याच हातात दिली जातील याबाबत कोणाच्याही मनात तिळमात्र शंका नव्हती. खुद्द बाळासाहेबांनीच तसे सूचित केले होते, मात्र ऐनवेळी अनपेक्षितपणे नंदू घाटे यांना शेतकरी आघाडीचे प्रमुख केले. आपण शिवसेनेचा मुंबईबाहेर विस्तार करण्यात मोठा हातभार लावला याबाबत कोणाचेही दुमत नाही, त्याच आशेवर १९९० मध्ये शिवसेना सत्तेवर येईल असा आशावाद होता पण सत्ता मिळाली नाही मात्र ५२ आमदारांच्या बळावर शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले पण तुम्हाला डावलून मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद तर आपली दुसऱयांदा मुंबई महापौर पदावर बोळवण करण्यात आली. बहुदा सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री पदाची अशीच हुलकावणी मिळेल अशी शंका आपल्या मनात निश्चित आली असेल. अर्थात आपण मुख्यमंत्री झाला असता तरी आपणास रिमोट कंट्रोलवरच काम करायला लागले असते हे उघडच होते.
       इंदिरा गांधीजींनी बासनात गुंडाळलेला मंडल आयोग  व्ही. पी. सिंग सरकारने १९९० मध्ये लागून करण्याची घोषणा केली. बाळासाहेबांनी आयोगाला कडाडून विरोध केला. बाळासाहेबांनी आपली भूमिका मांडण्याआधीच  आपण मात्र मंडल आयोगाच्या बाजूने असल्याचे जाहीर केले. यावर आपली व बाळासाहेबांची खडाजंगी देखील झाली. अखेर आपल्या राजकीय, सामाजिक घुसमटीवर फुंकर घालून पवारसाहेबांनी आपल्याला काँग्रेस मध्ये खेचले. पुढे आपण महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली व त्यामाध्यमातून देखिल मंडल आयोग लागू करण्याबाबत दबाव निर्माण केला.  मंडल आयोगाच्या शिफारशी २३ मार्च १९९४ पासून सरकारी नोकऱ्या व शिक्षण क्षेत्रात लागू झालया. मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र्र हे देशातील पहिले राज्य होते. तत्कालीन मुख्यमंत्री पवारसाहेबांसोबतच याचे श्रेय आपणांस ही जाते. आपले हे योगदान बहुजन वर्ग कायम स्मरणात ठेवील. आपण कट्टर हिंदुत्ववादी, गोडसेंचे गुणगान गाणारे, पुरोगाम्यांवर आगपाखड करणारे, काहीशी दलित विरोधी भूमिका असणारे आपण उपरतीने म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा बदललात. धार्मिक, जातीयवादी विचार बहुजनाना मारक आहेत व फुले-शाहू-आंबेडकर विचार समाजात रुजवल्याशिवाय प्रगती होणार नाही हे जाणले.  समता परिषदेच्या माध्यमातून आपण दलित- ओबीसी सामाजिक एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रतिगामित्वाकडून पुरोगामीत्वाकडेचा प्रवास आपल्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष होती. 
                        लहानपणासूनच आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागला ,  लहानपणीच आपण आई-वडिलांच्या मायेचं छत्र हरवले. आईचा फोटो पाहण्याचे भाग्य देखील आपणास लाभले नाही. पुढे विविध  पक्षात आपले  सामर्थ्य वाढले कि पंख छाटण्याचे काम करण्यात आले. तेलगी घोटाळ्यात आपले नाव आले, आपण सहीसलामत बाहेर पडलात पण बदनामी व्हायची ती झालीच. पक्षात पीछेहाट झालीच. आताही  महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणात एक वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात आहात. आपण जी कामे केली मग ते फ्लाय ओव्हर असोत वा महाराष्ट्र्र सदन अगदी विरोधी पक्षांनी देखील आपल्या कामाचे कौतुक केले.  अगदी कधी काळी आपल्या जीवावर उठलेल्या शिवसेनेने देखील महाराष्ट्र सदनाचे कौतुक केले.  बाळासाहेबांना तांत्रिक का होईना अटक करण्याची हिम्मत आपण दाखवलीत असं महाराष्ट्रात कोणी करू शकले नसते. बाळासाहेबांवर आपल्या इतकी टीका कोणीच केली नसेल पण तरीही शेवटी आपल्या मनात शिवसेनेबद्दल व बाळासाहेबांबद्दल तसेच शिवसैनिकांना व बाळासाहेबांना  ही आपल्याबद्ल कायम एक सॉफ्ट कॉर्नर होता. त्यामुळेच शेवटी आपली व बाळासाहेबांची मातोश्रीवर भेट होऊ शकली.  शिवसेना सोडल्यानंतर आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा खटला आपण मागे घेतला तेव्हा अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी आले. ही आपल्या कामाची पोच होती. आपण गुन्हेगार असाल किंवा नसाल पण आपल्याला बळीचा बकरा बनवला आहे असे साऱ्या महाराष्ट्राला वाटते आहे. घोटाळे करणारे आपण पहिले नाही किंवा शेवटचे ही नाहीत ना आपला  घोटाळा सगळ्यात मोठा आहे. असे असताना फक्त आपणच तुरुंगात आहात. चौकशी टाळावी म्हणून लोक देश सोडून पलायन करतात आपण मात्र चौकशीसाठी परदेशातून भारतात आलात व चौकशीला पूर्ण सहकार्य केलं पण तरी चौकशी करायला येऊन थेट आपणांस अटकच केली. आपण जर दोषी असाल तर आपणास योग्य ती शिक्षा निश्चित होवो. मात्र तसे नसेल तर सध्या सूडबुद्धीने चालवलेली आपली अवहेलना थांबावी एवढीच इच्छा. कुजबुज अशीही ही ऐकायला येतेय कि महाराष्ट्र्र सदनात फक्त शिवाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले, शाहू महाराज, भारतरत्न आंबेडकरांचेच पुतळे बसवले इतरांचे नाही तसेच दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नारपार या दोन नदीजोड प्रकल्पांद्वारे गुजरातला महाराष्ट्राचे पाणी देण्यास आपण विरोध केला होता. आपण एकटे असले तरी आपला विरोध किती जोरदार असतो हे १९८५ ला आपण शिवसेनेचे एकमेव आमदार असताना साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. 
                      आपल्यासारख्या झुंझार नेत्यावर वयाच्या सत्तरीत अशी वेळ येणे आणि आपले असे इतके हतबल होणे आपल्या विरोधकांना देखील पहावत नाही. आज महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झालेली असताना आपले तुरुंगात खितपत पडणे दुर्दैवी आहे. आपले जी बदनामी झाली, जे हाल झाले ते व्हायला नको होते. ज्याप्रमाणे पवारसाहेबांच्या अनुभवाचा फायदा अगदी विरोधकांना होतोय तसाच आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना झाला तर त्यात गैर ते काय? आपण चुकला असाल, आपल्याकडून काही गुन्हा घडलाही असेल पण आपण केलेला संघर्ष,  अतुलनीय आहे. आपली ही रोमांचकारी कारकीर्द इतरांना निश्चित मार्गदर्शक ठरेल, आपल्या जीवनाच्या धड्यातुन  काय घ्यायचं आणि काय नाही हे ज्याचे त्यांनी ठरवायचे.    
    आपणांस सत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (उगीचच गैरसमज होऊ नये म्हणून लक्ष,कोटी,अनंत असे शब्द वापरले नाहीत). 
                                                          ....संतोबा (संतोष गांजुरे)
   

Wednesday, July 19, 2017

राजाची कर्जमाफी- १

     राजाची कर्जमाफी म्हणजे साधंसोपे काम नव्हे, आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप अभ्यास करून कर्जमाफीच्या मागणीला सरसकट तत्वतः एवढ्या गाठी मारून ठेवल्या आहेत व रोज नवनवीन अटी शर्ती घालून त्या इतक्या घट्ट केल्या आहेत कि आपण कर्जमाफीसाठी पात्र होऊ कि नाही याचा तिढा सर्वसामान्य व्यक्तीला सुटणे शक्य नाही. त्यातच परवा शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं सांगून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरसकट कर्जमाफीला तत्वतः पाचर मारली आहे. सरकार नेहमीच कर्जमाफीच्या विरोधात होते. कर्जमुक्ती वैगेरेचे शब्दच्छल करून कर्जमाफीला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचाच सरकारचा प्रयत्न होता. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या संपामुळे जनतेचा उद्रेक होईल, सरकारविरोधात जनमत तयार होईल केवळ यामुळेच अनेक मागण्यांपैकी केवळ कर्जमाफीच्या मागणीला प्रकाशझोतात आणले व इतर मागण्यांना बरोबर कात्रजचा घाट दाखवला. कर्जमाफीला तत्वतः का होईना मान्यता देऊन सरकारने आपल्या विरोधातील जनतेचा रोष तात्पुरता शांत केला व नंतर अनेक अटीशर्ती टाकून व अपमानास्पद वक्तव्य करून भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था केली आहे.
         सरकारने आपले राजकीय कसब पणाला लावून पद्धतशीरपणे जनतेचा असंतोष तात्पुरता दाबण्यात यश मिळवले आहे. कर्जमाफीच्या घोळात स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची मागणी शेतकरी-शेतमजूर , ग्रामीण-शहरी, शेतकरी-नोकरदार, थकबाकीदार-नियमित कर्ज भरणारे असे निरर्थक वाद, वक्तव्य करून तूर्तास मागे पाडण्यास सरकारला यश आलेले आहे. समाजातील एका घटकाला कर्जमाफी मिळत असताना दुसरा घटक नाराज होणार हे स्वाभाविकच आहे शेतकरी व इतर कष्टकरी यांची आर्थिक परिस्थिती फार काही वेगळी आहे असे नाही. श्रमप्रतिष्ठा आणि  श्रममुल्यांचे अवमुल्यन यामुळे कष्टकरी समाजाची होरपळ होतेय. शेतकऱ्यांना आस्मानी-सुल्तानी  संकटाबरोबर पायाभूत सुविधांचा अभावाचा सामना करावा लागतो. तृतीय-चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना देखिल पायाभूत सुविधांचा अभावाचा सामना करावा लागतो. स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने नीट पुरवली जात नाही. उघड्या अंगाने मॅनहोल मध्ये उतरणारे कर्मचारी आपण पहिले असतील. सुरक्षासाधनांच्या अभावी बऱ्याच कर्मचाऱ्यांचा विविध आजारांनी चाळीशी-पन्नाशीत मृत्यू ओढवतो.  सरकार या सर्वांचे गुन्हेगार आहे. सगळी सत्ताधारी थोड्याबहुत फरकाने एकाच माळेचे मणी असतात पण सध्याच्या मंत्र्याची बेताल वक्तव्ये आणि चुकीची धोरणे आणि त्यांची निर्ल्लज भलामण आणि त्यांचे उत्सवी कार्यक्रम, सर्वसामान्य जनतेपर्यंत न पोहचलेल्या विकासाच्या जाहिरातींचा भडीमार. या सर्वांचा परिपाक म्हणून जनतेच्या असंतोषाचा उद्रेक होत आहे.  
     मूठभर लोकांकडे ढीगभर संपत्ती आणि मूठभर लोकांकडेच ढीगभर कर्ज आहे हे सर्वज्ञात असताना कर्जवसुली अथवा बेहिशोबी संपत्तीचा विषय निघतो त्यावेळी या मूठभर लोकांकडे दुर्लक्ष करून ढीगभर लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. डिजिटल इंडियामध्ये मूठभर ब्लॅकमनीवाल्यांना शोधण्यापेक्षा सरसकट नोटाबंदी करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्यात आले. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांनाच बसला.  शेती मालाचे भाव प्रचंड पडले. मला स्वतःला २०१५ च्या  नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पावट्याला ६०० रुपये ते शेवटी ३५० रुपये प्रती दहाकिलो भाव मिळाला तर पिवळा मूग सरासरी ७५ रुपये किलोने विकला गेला. तर २०१६ च्या नोटाबंदीनंतरच्या  नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पावटा  २४० रुपये ते १२० रुपये प्रती दहाकिलो भावाने तर पिवळा मूग ४० रुपये किलोने विकावा लागला. शंभर रुपयांत आठवड्याचा भाजीपाला येऊ लागला म्हणून अच्छे दिन आल्याचा जयघोष करणारे बौद्धिक दिवाळखोर शेतकऱयांची क्रूर चेष्टाच करत होते. गोहत्याबंदीचेही तसेच एकीकडे गोहत्याबंदी करायची तर दुसरीकडे चारा छावण्या बंद करायच्या, सुपीक जमिनी उद्योगधंदे, अनावश्यक विमानतळ, महामार्ग यासाठी उद्योगपतींच्या, भांडवलदारांच्या घशात घालायच्या. अहो महोदय  तुम्ही ज्या गायीला आई म्हणता ती आमचीच. आम्ही तिला पिढ्यानपिढ्या सांभाळतो आहे, आम्ही फक्त गायीचीच नव्हे तर अगदी बैलांची देखिल पूजा करतो. गायींचे पालन-पोषण करणाऱ्या काळ्या जमिनीला आम्ही आमची काळी आई मानतो, आणि तुम्ही त्याच आमच्या काळ्या आईला उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागला आहात. ज्यांचे गायींशी घेणेदेणे नाही ते बोगस गोरक्षक बिनधक्तपणे गोरक्षणाच्या नावाखाली दिवसाढवळ्या खून करत आहे. अनेक अडचणी आणि चाऱ्याअभावी  शेतकर्याना कवडीमोल दराने गायी विकाव्या लागल्या आहेत..  
         आताही सरकारने नाईलाजाने केलेली हि कर्जमाफी निव्वळ धूळफेक आहे, या मृगजळाच्या मागे लागून काहीही प्राप्त होणार नाही. सरकारने जे कष्टकरी वर्गाचे शोषण केले आहे त्याबदल्यात सरसकट गोरगरीब जनतेस आर्थिक परिस्थितीनुसार  तीन ते पाच लाख तात्काळ देऊन आपले आणि पूर्वीच्या सरकारचे पापक्षालन करावे. इथून पुढे तात्काळ सर्वांना पायभूत सुविधा पुरवाव्यात. शेतीमाल, दूध यांना योग्य भाव द्यावा आणि त्याचबरोबर नियमित वीज-पाणी पुरवठा केला तर आम्हाला तुमच्या कर्जमाफीची कुबड्यांची आम्हाला गरज पडणार नाही. येथून पुढे आंदोलन,संप केला तर शेतकऱयांबरोबर इतर सर्व कष्टकरी वर्ग त्यात सामील होतील व सर्वांच्या वतीने एकत्रित मागण्या करण्यात येतील.  सरकारला ना फूट पाडता येईल ना पळ काढता येईल.  
         राजकारण फक्त निवडणुकीपुरते मर्यादित नाही. राजकारण म्हणजे सत्ता,पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचे साधन नव्हे किंवा गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे नव्हे वा आंदोलनांना पाठिंबा देऊन नंतर मांडवली करणे नव्हे तर राजकारण म्हणजे दैवीकार्य. आपल्याला लाभलेल्या दूरदृष्टीच्या आणि लोकशाहीतील अधिकाराच्या जोरावर बहुसंख्य गोरगरीब रंजल्या-गांजल्या जनतेला सुखासमाधानाने, मानाने जगात यावे अशी व्यवस्था निर्माण करणं. राजकीय पक्ष काही तत्व,निष्ठा, ध्येय धोरणाच्या आधारवर स्थापित होत असतात त्याचा नेत्यांनी विसर न पडू नये व त्यांनी शह-काट शहाचे, घोडेबाजाराचे राजकारण न करता, कसलाही भेदभाव न समाजकल्याणाची कामे करणे अपेक्षित आहे. ज्यावेळी शेतकरी, कष्टकरी वर्ग सधन होईल तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना ज्यावेळी याची जाणीव होईल व त्यानुसार त्याचे कार्य केलं जाईल तो समस्त जनतेसाठी सुदिनच म्हणावा लागेल.
                                                   संतोबा (संतोष गांजुरे)

Sunday, June 11, 2017

दाता

तो एक हुशार, बाकी साधीभोळी.
देता तयानेे, पारदर्शकतेची हाळी.
शब्दास तयाच्या, भुलली मंडळी.
राजमुकुट ठेविला, त्याच्या भाळी.
करनी-कथनी असे तयाची वेगळी.
सत्ता येता तया हाती, खुलली कळी.
आपल्याच दात्याची,काढली कुंडली.
असे तो अनपेक्षित, डाव सदा खेळी.
रोज जाती, कित्येक बळीबाचे बळी.
अन्नदात्याची बायको पांढऱ्या कपाळी.
अन् पोरं उपाशी, खाती भाकरी शिळी.
धनंदांडग्यास देई, पुरणाची पोळी.
गोरगरीबांस मिळे, बंदुकीची गोळी.
फायदा उचलती, दलालांची टोळी.
बळीराजाच्या हाती, रिकामी झोळी.
नजरा लागल्या, आता वर आभाळी.
वरुणराजा, भरून दे नदी,नाले,तळी.
धान्य पिकवू, असे सोन्याहूनी पिवळी.
देण्याची आमुची, रीतच ही आगळी.
खाऊनी-पिऊनी, तृप्त होती सगळी.
             संतोबा(संतोष गांजुरे)

Wednesday, June 7, 2017

बळीराजाचा बळी- ऐतिहासिक संप.

                 शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप केला, संपादरम्यान थोडीफार माळव्याची, दुधाची नासधूस झाली आणि अनेकांच्या पोटात पोटशूळ उठला. सोशल मीडियावर शेतकऱ्यांवर आगपाखड केली गेली. शेतकरी कसा माजोरडा आहे, असंवेदनशील आहे, याचे दाखले देण्यात आले. शेती हा व्यवसाय आहे आणि शेती करणे कर्तव्यच आहे मग शेतकरी आमचा पोशिंदा कसा? अशा शंका उपस्थित केल्या. खरेतर काही लोकांना मुळातच शेतकऱ्यांबद्दल आकस आहे. शेतकऱ्यांबद्दल काही जरी बोललं तरी त्यांचा तिळपापड होतो. खरं तर शेतकऱ्यांना सहानुभूतीपेक्षा जास्त काही मिळत नाही. छटाक-पावशेर माळवं घेणाऱ्यांना, पोतीच्या पोती माळवं रस्त्यावर फेकलं जास्त असताना वाईट वाटणं सहाजिकच आहे. असे नासधूस करण्यापेक्षा आश्रमात, गोरगरिबांना दान करण्याचा सल्ला सुद्धा दिला गेला.असं नासधूस करणे चुकीचेच आहे अगदी स्वतःच्या कष्टाने पिकवले असले तरी.पण असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी, समस्त कष्टकरी वर्गाबद्दल असलेल्या दुजाभावाबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी असं करणे गरजेचे होते. रोज डझनावारी होणाऱ्या आत्महत्या होत असताना जेवढी हळहळ वाटली नाही तेवढी हे नुकसान पाहून वाटलं हे ही काही कमी नाही. तसे तर ही नासधूस रोजच होत असते अगदी मोटारभाडे निघणार नाही म्हणून घाम गाळून पिकवलेलं उभं पीक जमिनीत गाडत असताना शेतकऱ्याला काय वाटत असेल याचा कोणी संवेदनशीलपणे विचार केलाय का?. त्यावेळेस कवडीमोल भावाने का होईना भाजीपाला खरेदी करुन कोणी आश्रमात वाटून पुण्य पदरात पाडून का घेत नाही?. शे-दिडशे रुपयांत आठवड्याचा भाजीपाला मिळतो म्हणून अच्छे दिन साजरे करणाऱ्यांना शेती करणाऱ्यांचे किती वाईट दिवस आले असतील याचा संवेदनशीलपणे विचार करावा वाटतो का?
                आंदोलनात नेहमीप्रमाणे सरकारकडून फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. जातीय, पक्षीय राजकारण केलं गेले. संप उत्स्फूर्त होता कोणाचं असं एकहाती नेतृत्व नव्हते, त्यामुळे सरकारला फूट पाडता आली पण संप पूर्ण संपवता आला नाही. जातीय, पक्षीयवादा बरोबरच ग्रामीण-शहरी या निरर्थक वादाला विनाकारण फोडणी देण्यात आली. शहरातील बहुतांश मुले ही ग्रामीण भागातूनच आलेली आहेत जी सुट्टीच्या दिवशी गावी जाऊन शेती कामाला थोडा फार हातभार लावत असतात. पाच-पंचवीस टक्के लोक असतील ज्यांना शेतीतील काही कळत नाहीच शिवाय त्यांच्या व्यथासुद्धा कळत नाहीत. अशीच लोकं सोशल मीडियावर मुक्ताफळे उधळत होती. त्यांना याची कल्पनादेखील नाही की ते जे अन्न खातात , जे पाणी पितात ,जी वीज वापरतात त्याचा स्रोत एवढंच काय हे सगळं वापरून जो कचरा केला जातो त्यासाठी ह्याच शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातात. ते जिथे राहतात, काम करतात, ज्या रस्त्यांनी जातात तिथे कधीतरी शेती होती जी सरकारने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून घेतली. आता जे पुरंदरचे विमानतळ वा समृद्धी महामार्गाचा प्रकल्प आहे त्याची शेतकऱ्यांना गरज नसताना, कोणाची मागणी नसताना सरकार जबरदस्तीने जमिनी बळकावायचा प्रयत्न करतच आहे ना? हे सगळं उद्योगपतींच्या, भांडवलंदारच्या फायद्यासाठी आणि पांढरपेशांच्या सुखसोईंसाठीच की शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे ?
                शेतकऱ्याला असंवेदनशील, माजोरडा म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच आहे. जमिनीला आई मानणारा, स्वतःच्या मुलांसारखी पिकांची काळजी घेणारा, पाच-पंचवीस हजारांच्या कर्जापायी आत्महत्या करणारा पण शेती न विकणारा कसा असंवेदनशील, माजोरडा असू शकतो. २६ डिसेंबर २०१६ ला सासवडला पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.दिवसभर हटायचे नाही, शासन-प्रशासनाला विरोधाची दखल घ्यायला भाग पाडायचे हा निर्धार होता. दीड-दोन तासांत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या एक एक किलोमीटर रांगा लागल्या. काही नेत्यांनी रास्ता रोको मागे घेण्याचे आवाहन केलं पण लोकं ऐकायला तयार नव्हते कारण प्रश्न अस्तित्वाचा आणि अस्मितेचा होता.तेवढ्यात कोणीतरी ऍम्ब्युलन्स अडकलीय म्हणून सांगितले आणि लोकं पटापट बाजूला झाली. शेतकरी संवेदनशील आहे, साधा भोळा आहे त्याला कोणीही फसवंतय पण तो कोणाला नाही फसवत. गाडीने कधी रस्त्याने जाताना शेतात कशाची काढणी चालू असेल तर जे काही असेल ते मागून बघा तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल नक्कीच.
               बळीराजा फक्त नावापुरता राजा नाही तर राजसत्ता स्थापण्याची व अनिर्बंध सत्ता उलथवून टाकण्याची ताकद त्याच्यात आहे, म्हणूनच यावेळी जुनाट बैलजोड बदलून नवी खोंडं निवडली पण ही खोंडं औताला चालणं दूरची गोष्ट साधी शिवळाटीत यायला तयार नाहीत. आता यापुढे घरचीच माहितीतील खोंडे तयार करायची, कुठल्याही दिखाऊ खोंडांना भुलायचे नाही. आता शेतकऱ्यांबद्दल तळमळ असणारे नेते नकोत. आता शेतकरीच नेते व्हायला हवेत किती दिवस इतरांना मोठे करायचे व मोठे होऊन त्यांनी फक्त मांडवली करायची. किती दिवस, किती वेळा हा विश्वासघात सहन करायचा. खऱ्या अर्थाने बळीराजा राजा व्हायला हवा. फक्त कृषिच नव्हे तर शासन, प्रशासन व इतर क्षेत्रातही आपले वर्चस्व निर्माण करायला हवे तरच काहीतरी चांगला बदल होईल. .
          बदल घडवायचा असेल तर सुरवात आपल्यापासून करायला हवी. आपल्यालाही काही नियम पाळावे लागतील.शक्यतो जमिनीचे तुकडे पाडायचे नाही, विकायची तर अजिबात नाही. बांध कोरायचे नाहीत, एकच पीक घेण्यापेक्षा बहुपीक पद्धत अवलंबवायची, बांधावर जागेनुसार जांभुळ,शेवगा,हादगा अशी विविध झाडे लावायची. झाडांच्या ओलसावटीने पिकांच्या वाढीवर थोडाफार दुष्परिणाम होईल पण तेवढा सहन करावा कारण झाडांचे फायदे पण खूप जास्त आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईलच शिवाय अडीअडचणीत आर्थिक हातभार पण लागेल. पाण्याचा सुयोग्य वापर आणि रासायनिक खतांचा, औषधांचा कमीत कमी गरजेनुसार वापर. उत्पादनखर्च जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा. जे मोठे बागायतदार शेतकरी आहेत त्यांनी फक्त निर्यातक्षम मालाचे उत्पादन घ्यायचे. अनावश्यक वाद,भाऊबंदकी तसेच कोर्ट-कचेरीपासून दूर रहावे. कालचक्र सतत फिरत असते. विश्वास ठेवा लवकरच एक दिवस असा येईल डॉक्टर,वकील,इंजिनिअर यापेक्षा शेतकऱ्याला आणि शेतीला जास्त ग्लॅमर येईल. आज शोभेची झाडे लावणाऱ्यांना गॅलरीत,टेरेसवर भाजीपाला लावावा लागेल आणि आज शेतकऱ्यांच्या कर्तृत्वावर, त्यागावर शंका घेणारे शेतकऱ्याला बळीराजा, पोशिंदा म्हणत गुणगाण गातील.
                                                                                                       संतोबा (संतोष गांजुरे)

Monday, May 29, 2017

जीवनतत्व

भिरकावून द्यावं ओझं अपेक्षांचे, जगावं मनमुराद.
तोडावे पाशबंद स्वार्थी स्वकीयांचे, विसरावे वाद.
भेटतील मित्र मंडळी खास, त्यांस घालावी साद.
उपभोगावे सारं नितीने, आवडलं तर द्यावी दाद.
देईल जो आनंद, असा करावा दिलखुलास नाद.

         कोणीही जाणे, संपेल कधी आयुष्याची रेष.
         वागावे सर्वांशी प्रेमाने, करावा कोणाचा द्वेष.
         पाप-पुण्याचा करता हिशोब, राहती काही शेष.
         कर्म करावे नेटके, भले आपले लोक देतील दोष.
          सोडावा मार्ग सत्याचा, प्रसंगी पत्करावा रोष.

जपावी सारी नाती निरपेक्ष, मनी नसावी कसली भिती.
पण काठावरच्या नात्यापायी, दुर्लक्षू नये निरालस नाती.
स्वार्थाचे इंधन असल्यावीण, रक्ताची नाती घेती गती
निरपेक्ष प्रेमाच्या बदल्यात, विश्वासघाताचे घावच मिळती.
परी मन राखावे निर्मळ, द्वेष-लोभास वरचढ ठरेल प्रीती

     दुजाभाव करावा कोणाशी, जगू आनंदे सारे मिळुनी.
     सारं काही क्षणभंगुर, रावाचा रंक होत असे एका क्षणी.
     मान-अपमान खेळ हा मनाचा, राग-लोभ धरावा मनी.
     शब्दे घायाळ करिती रे, जपुनी वापरावी आपुली वाणी.
     समजुनी-जुळवूनी घ्यावे सर्वांशी, नाराज व्हावे कोणी.

कधी व्हावं निराश, उलटून जाते नेहमी अंधारी रात्र.
आयुष्य आहे सुंदर चित्रपट, आणि त्यातील सर्व पात्रं.
सगळ्यांचीच गरज आहे, असो तो शत्रू वा असो मित्र.
चांगल्याची धरावी नेहमी आस, कधी व्हावं गलीगात्र.
जिंकायचं तर प्रेमाने, तरच होईल जयजयकार सर्वत्र.
                                                 
                                           .... संतोबा   (संतोष गांजुरे)

Wednesday, May 3, 2017

हमीभाव

       दुष्काळ, शेतीमालाचे पडलेले भाव, नापिकी यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. आत्महत्येच्या घटना वाढू लागल्या आहेत आता शेतकऱ्यांसोबत आता कुटुंबातील व्यक्तींवरसुद्धा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. विरोधकांनी एसी गाड्यातून प्रवास केला म्हणून शेतकऱ्यांच्या दुष्काळाची दाहकता कमी झाली का? उलट विरोधकांच्या कर्ज माफीची मागणीला बरोबर महिन्याभरापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी "कर्जमाफी केली तर आत्महत्या होणार नाहीत याची हमी देणार का?" असा उलट असंवेदनशील  प्रश्न विरोधकांना केला होता. एखादा दुर्धर आजाराला शस्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसेल तर आपण इतर उपचार करत नाहीत का? शस्रक्रिया केल्यावर देखील आजार बरा होईल याची  हमी काय?  मुख्यमंत्री महोदय हमी कशाचीच देता येत नाही पण म्हणून काय प्रयत्नच करायचा नाही का?

आयपीएल सुरू झाली की बरेच खेळाडू दुखापतीमधून बरे होतात तर काहींचा गेलेला फॉर्म परत येतो, पण म्हणून त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळेलच याची हमी देता येत नाही.
#हमी #हमीभाव

विरोधात असताना शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्याबद्दल सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा म्हणणारे सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांबद्दल तेवढेच संवेदनशील असतील याची हमी देता येत नाही!
#हमी #हमीभाव

महापुरुषांच्या जयंत्या उत्सवाप्रमाणे डिजेवर शांताबाई लावून साजऱ्या करणाऱ्या आणि फेसबुक, व्हाट्स अँपवर शुभेच्छा व गुणगान गाणाऱ्यांकडून त्या महापुरुषांचे विचार त्यांच्या दैनंदिन जीवनात आचरणात येतीलच याची हमी देता येत नाही.
#हमी #हमीभाव

जात-पात आणि कुंडल्या पाहून , अगदी छत्तीस गुण जुळवून लग्न केले तरी संसार टिकेल किंवा संसार सुखाचा होईलच याची हमी देता येत नाही.
#हमी #हमीभाव

कांदा २५-३० रुपये प्रतीकिलो झाल्यावर ज्यांच्या डोळ्यांत पाणी येते, त्यांच्या डोळ्यांत तोच कांदा २५-३० रुपये प्रती १० किलो झाल्यावर येईलच याची हमी देता येत नाही.
#हमी #हमीभाव

 तूरडाळीचे भाव २०० रुपये किलो झाल्यावर प्रसार माध्यमात आणि पांढरपेशी समाजात जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा भाव ६०-७०₹ किलो झाल्यावर होईलच याची हमी देता येत नाही.
#हमी #हमीभाव

भ्रष्टाचाराचे , घोटाळ्यांचे अनेक आरोप करून आणि सोबत गाडीभर पुरावे असल्याचा दावा करणाऱ्यांची एकहाती सत्ता आली तरी आरोपींना शिक्षा होईलच याची हमी देता येत नाही.
#हमी #हमीभाव

शेतकऱ्याला सर्वसुखी समजणारे व त्यांना टॅक्स भरावा लागत नाही, तसेच कर्जमाफीच्या नुसत्या चर्चांमुळे जळफळाट होणारे, शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगी देईल याची हमी देता येत नाही.
#हमी #हमीभाव

निवडणुकांच्या तोंडावर एखादे खळबळजनक वक्तव्य, जोशपूर्ण भाषणे आणि एखादं- दुसरे आंदोलन केले म्हणून लोक एकहाती सत्ता देतीलच याची हमी देता येत नाही.
#हमी #हमीभाव

#हमीभाव हॅशटॅग चालवून सरकारला हमीभाव देण्याची सुबुद्धी सुचली तर चांगलंच आहे मी सुरुवात केलीय आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच प्रयत्न करूया👍
संतोबा ( संतोष गांजुरे )

Sunday, March 19, 2017

ती

     कधी ती जन्मदाती, कधी भगिनी,
     कधी ती जन्मभराची सहचारिणी.
     असता ती सहज सोबती, अंगणी,
      निघती सारे तिच्या प्रेमात न्हाऊनी.
      परी जाणीव ना ती असण्याची मनी.

                                         कष्टाचे तिच्या न होई काही मोल,
                                         घालवती शीण, प्रेमाचे दोन बोल. 
                                         तिच्यासाठी ठेव, थोडी प्रेमाची ओल,
                                         उतूमातू नको, नको जाऊ देऊ तोल.
                                         तीजविण सुवर्णक्षणही ठरतील फोल.

   तिचं असणं, नसणं न तिच्या हाती,
   तरी घरोघरी संसारवेली ती फुलवती.
   तिच जपते भाऊबंदकी, नातीगोती.
   जगणं तिचं जणू दिव्यातील वाती,
   जळूनी सर्वांसाठी उजळवती ज्योती.

                                      नको गाजवू  ढोंगी पुरुषी वर्चस्व,
                                      तुझंसाठी तिने अर्पिले सर्वस्व. 
                                      तू, तू आणि तू हेच तिचं विश्व.
                                      जिंकण्याची क्षुल्लक ठरतील तत्व,
                                      जर येतील तिच्या डोळ्यांत आसवं. 

  देह आत्म्याचे मंदिर, ती घराचे सार.
  तीजविण घर, जणू आत्म्याविण शरीर.
  असूनी सर्वकाही,निस्तेज, निर्विकार.
   म्हणे संतोबा, आहे नरदेह नश्वर,
   माणूस म्हणोनि जगुनी घे क्षणभर.
                                                  .... संतोबा   (संतोष गांजुरे)

Friday, February 3, 2017

शिक्षण - सर्वांगीण विकासाचा पाया-२

हृषीकेश शिंदे २००१ साली कोल्हापूरला पदवीकेसाठी(डिप्लोमा) प्रवेश घेतला त्यावेळेपासूनचा माझा जिवलग मित्र. कालच त्याचा कॉल आला होता. यावर्षी डिग्रीला(बी. .) प्रवेश घेता आल्याची खंत होती त्याबरोबरच पुढील वर्षी तरी प्रवेश घेता येईल की नाही या विवंचनेत होता. त्याचे पदविकेचे (डिप्लोमाचे) चार-एक पेपर बाकी आहेत त्यापैकी एम-१ चा पेपर देण्यासाठी कोल्हापूरला चालला होता. गेल्या पंधरा वर्षात साधारणपणे दहा-पंधरा वेळा तरी  त्याने एम१ चा पेपर दिला असेल पण अजूनही पेपरला जाताना तोच उत्साह आहे. एवढ्यावेळा अपयश आले असताना,पास होण्याची खात्री नसताना, पुण्यावरून कोल्हापूरला जाण्यासाठी त्याला कोठून उर्जा मिळत असेल काय माहीत. त्याचा आदर्श ठेऊन मी सुद्धा जवळपास दहा वर्षानंतर बीसीए ला प्रवेश घेतला आहे, कॉलेज घराजवळ असूनसुद्धा मागच्या तीन परिक्षांपैकी एकच देता आली आहे, अर्थात इतरही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.
हृषीकेशला पहिल्यांदा भेटलो ते त्याच्या भल्या-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी भरलेल्या ट्रंकेसोबत. कुतुहलापोटी नेहमी चार-दोन मुले त्याच्या भोवती असायची. मी माहिती- तंत्रज्ञान तर तो विद्युत अभियांत्रिकी शाखेत पण केवळ पुण्याचा म्हणून त्याच्याशी मैत्री झाली. पुण्याचे दहा-पंधरा जण असल्याने आमचा एक ग्रुप झाला होता. ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यावर्षी सगळे विषय सुटले असा कोणीच नव्हता. एवढेच काय आम्हाला जे सिनियर होते ते अजूनही हृषीकेश बरोबर परीक्षेसाठी जात असतात. एकीकडे जिवलग मित्र म्हणून दुसरीकडे असा अपमान करतोय असा गैरसमज होऊ शकतो पण तसे काही नाही. मी स्वत: मला आठवतंय तेव्हापासून मी गणितात नापास होत आलोय, मला डिप्लोमाला तर कित्येकदा भोपळाही फोडता आला नाही. नापास होणे आम्हाला कधीच अपमानास्पद वाटले नाही. प्रत्येकाचे काही ना काही वेड होते आणि कोणाच्या तरी जबरदस्तीने डिप्लोमाची वाट धरावी लागली होती.
हृषीकेशला मात्र इलेक्टरीकल, इलेक्ट्रॉनिक्सची प्रचंड  आवड होती आणि भरपूर माहिती ही होती. कोणतेही सर्किटबोर्ड , डायग्रॅम बनविण्यासाठी त्याला कुठल्या संदर्भाची गरज पडायची नाही. नेहमी काहीतरी भन्नाट कल्पना असायच्या त्याचा डोक्यात. कायम तो त्याची सोल्डरींग गन घेऊन सर्किट बोर्डशी काहीना काही करत बसलेला असायचा. जुन्या बाजारातून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणून त्यावर काही ना काही संशोधन चालू असायचे. कधी रेडिओ स्टेशन बनवायचे असे तर कधी दुसरे काहीतरी. त्यामुळेच अगदी टॉपर्स म्हणवणारेही प्रॉजेक्टसाठी त्याची मदत घ्यायचे. एवढ असूनही ह्या विषयात सुद्धा पास होण त्याला जड जायचे. जे सहज कळतंय ते पेपरात उतरावयाला अवघड जायचे त्याला नापास करणार्‍या शिक्षकांनाही हे माहीत होते. एवढेच नव्हे तर भविष्यात हा काहीतरी इतरांपेक्षा वेगळ काहीतरी करेल अशी खात्री होती.
              आजच्या धक्का-धक्कीच्या जीवनात बहुतेक मित्रांशी असलेला संपर्क कमी झाला असला तरी हृषीकेश सोबत महिन्यातून एखादा दुसरा फोन, महिन्या-दोन  महिन्यातून एखादी भेट होत असते. प्रत्येक वेळी तो मला न विश्वास बसणाऱ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगत असतो पण त्याचे लॉजिक ऐकून विश्वास ठेवावाच लागतो. पण असे असले तरी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रोजेक्टला मूर्त स्वरूप आलेली नाही. अजूनही पैसे कमवत नसल्याने लोकांच्या दृष्टीने तो अपयशीच आहे. पण एवढया हुशार, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला ओळखण्यात, संधी देण्यात आपली शिक्षण व्यवस्था, समाज कुठं तरी कमी पडतोय असे नेहमी वाटते अर्थात त्याचीही काही चुका आहेतच. पण असं हुशारी वाया घालवणे हे आपल्या सर्वांचेच अपयश आहे. शिक्षणाच्या बाजारात पैशात सहज उपलब्ध होणाऱ्या डिग्र्याच्या भेंडोळ्याना किती महत्व द्यायचे ह्याचा विचार करायला हवा. 
            दीर्घकाळ प्रयत्न करून देखील विशेष यश मिळत नसताना देखील तो कधी निराश झाला नाही किंवा त्याच्या उत्साहात कणभरही कमतरता आलेली नाही. अजूनही काहीतरी जगावेगळं करण्याची त्याची जिद्द तशीच आहे. निराश होऊन अजून त्याने त्याचा मार्ग बदलेला नाही. वेगवेगळ्या संकल्पना आणि स्वप्नांवर काम करणे चालूच आहे. कोणाला काहीही वाटो मला मात्र पूर्ण विश्वास आणि खात्री आहे एक ना एक दिवस हृषीकेश त्याच्या संघर्षात यशस्वी होईल. आज ना उद्या कोणासाठी का होईना तो आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही. आमच्या वांझोट्या शुभेच्छा सदैव त्याच्यासोबत असतील!!!  
                                                        ..... संतोबा   (संतोष गांजुरे)
 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!