गाव तसे फार मोठे नाही, पण तरीही गावांतील बहुसंख्य
लोक मला मी माझे नाव सांगितल्याशिवाय ओळखत नाहीत. अर्थात त्याला कारणेही बरीचशी आहेत.
नाव विचारणारी व्यक्ती जर वयस्कर असेल तर तिचा पुढचा प्रश्न, तुमची बैलं आहेत का अजून
हाच असतो. आजोबांना बैल पाळण्याचा शौक होता, त्यासाठी ते बाजारातून लहान गोर्हा
आणून त्यास व्यवस्थित सांभाळून शेतीचे कामे शिकवत. त्यांचा हा उपक्रम सतत चालू असे
त्यापैकी जो चांगला असेल तो घरच्या कामासाठी ठेऊन बाकीचे विकायचे. अर्थात त्यामुळे
बैलपोळयाला सर्वात डौलदार बैलजोडी आमचीच असायची.पण आता तो इतिहास झाला आहे आणि ते वैभव पाहायचे भाग्य मात्र मला लाभले नाही, पंधरा-सोळा पेक्षा जास्त वर्ष झाली असतील आमच्या शेवटच्या बैलजोडीला, हिऱ्या आणि नाजुक्याला. ती जोड जेमतेमच होती. दिव्याला आत्याच्या शेतात आणि पारगावला मामाच्या व घरच्या शेतात मी साधारणपणे सातवी-आठवीत असताना नांगर हाकल्याची पुसटशी आठवण अजूनही आहे.
पुर्वी घरची श्रीमंती,प्रतिष्ठा ही गोठ्यातील
गाई-गुरे व घरातील अन्न धान्यावर ठरली जायची. प्रत्येक घरी एक पांढरीशुभ्र, डौलदार
वशिंड असलेली खिल्लारी बैलजोड असायचीच. त्याच बरोबर एखादी गाय असायची, घरातील दूध-दुभते
भागेल एवढे दूध काढून बाकीचे दूध वासरासाठी ठेवले जायचे. दूध व्यवसाय हा फार तर रतीबापुरताच
मर्यादित होता. त्यामुळे गाईकडून खोंडाचीच अपेक्षा असायची. गाई-बैलांचे घरातील सदस्यांइतकेच
महत्वाचे स्थान होते. त्यांचा उपयोग संपला म्हणून त्यांना विकले जात नसे त्यांचा घरीच
नैसर्गिक मृत्यू होणे ही समाधानाची बाब होती. त्यांना कसायाला विकणे पाप करण्यासारखेच
होते. माणसाइतकेच किंबहुना काकणभर जास्तच प्रेम जनावरांवर केले जायचे. माणसात माणुसकी
शिल्लक होती, सर्वजण एकमेकांच्या सुख-दुखात सहभागी व्हायचे, एकमेकांना मदत करायचे.
त्यात फायद्या-तोट्याचा जास्त विचार नसे.
त्यावेळची पार्टी म्हणजे उन्हाळयात केली जाणारी इरजिक असायची, नांगरणीसाठी सात-आठ बैल
जोड्या एकत्र करून एक-एकाचे शेत नांगरले जायचे. ज्याचे शेत नांगरले जायचे त्याच्या
घरी रात्री सर्वांसाठी मटनाचा फर्मास बेत असायचा.
काळ बदलत गेला, तंत्रज्ञान आले, माणसाच्या गरजा
वाढल्या, ईर्ष्या वाढली. माणूस व्यवहारी झाला तो फायद्या-तोट्याचा विचार करू लागला.बैल
गेले काहींच्या दारात ट्रॅक्टर उभे राहिले, खिल्लारी, पंढरपुरी गाई जाऊन जास्त दूध
देणार्या संकरित जर्शी,होल्स्टिन गाई आल्या.खिल्लारी बैल,गाई अदृश्य झाले. गावोगावी
दूध संकलन केंद्रे उभी राहिली, जोडधंदा म्हणून दुग्धव्यसाय उदयास आला. आता खोंडाचा(बैलाचा)
जन्म नकोसा झाला प्रत्येकाला आता कालवड(गाय) हवी आहे. बैल झाला तर चार-सहा महिन्यात
विकावाच लागतो कारण आता शेतीसाठी बैलाची गरजच उरली नाहीये.
मात्र एवढे सगळे होऊन देखिल शेतकर्यांच्या जीवनमानात
फार काही सुधारणा झाली आहे असे नाही सुखसंपन्नतेच्या शर्यतीत ते मागेच आहेत. ओला-सुखा
दुष्काळ शेतकर्यांच्या पाचवीला पूजलेला आहेच. शेतकरीविरोधी कायद्यांचा गळफास आवळून
सरकार त्यात भरच टाकत आहे. उत्पादन खर्च वाढला आहे आणि उत्पादित मालाला हमी भाव नाही,
ज्यावेळी भरपूर उत्पन्न होते त्यावेळी ते कवडीमोलाने विकावे लागते तर कधी काही पिकत
नाही त्यावेळी तेच विकत घेण्याची वेळ येते. बराचसा शेतमाल नाशवंत असल्याने तो साठवूनही
ठेवता येत नाही आणि जो साठवून ठेवू शकतो त्यासाठी गोदामे नाहीत शिवाय बर्याच गोष्टींचा(
कांदा, बटाटा, डाळी, साखर, खाद्यतेल इत्यादी) जीवनावश्यक गोष्टीत समावेश करण्यात आल्याने
करण्यात आल्याने साठवणुकीवर मर्यादा आल्या आहेत शिवाय बाजारभाव वाढला की निर्यातबंदी आहेच. लोकसंख्यावाढी बरोबरच जमिनीचे लहान-लहान तुकडे पडत गेले त्यात आता भूमी अधिग्रहण कायद्याची भर पडली
आहे.पाणी,वीज या मूलभूत गरजांबाबत शेतीपेक्षा उद्योग धंदयाना प्राधान्य दिले जात आहे.
त्यातच आता गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची भर पडली आहे. का तर ह्याने शेतीचे अर्थकारण सुधारेल. दूध-दुभती जनावरे पाळणे सुद्धा आता
अवघड झाले आहे. पूर्वी गाई चारण्यासाठी गायराने असायची आता त्या सगळ्या गायरानांवर
अतिक्रमण झाले आहे.त्यामुळे आता भाकड जनावरे दावणीला ठेवून कसे परवडेल? आता शेतीसाठी
बैलांची गरजही नाही. अनावश्यक जनावरे विकताना शेतकर्यांना काही आनंद होत नाही पण ती
विकण्यावाचून पर्याय पण नसतो. सरकारला जर गोहत्या नको असेल तर सरकारने अशा जनावरांसाठी
छावण्या, पांजरपोळ उभारावीत शेतकरी आपली भाकड जनावरे सरकारला खुषीने फुकटात देतील मग
सरकारने त्यांच्या मलमुत्रापासून आयुर्वेदिक औषधे, खते बनवावीत व सरकारला परवडेल अशा
किमतीत विकावीत.गाय ही माता आहे तर तिला वाचवणे सर्वांचेच कर्तव्य आहे मग ती वाचावी
म्हणून लोक दुप्पट किमतीने दूध विकत घेतील का?
0 प्रतिक्रिया:
Post a Comment