Ads 468x60px

Tuesday, August 18, 2015

शिक्षण - सर्वांगीण विकासाचा पाया.

             शिक्षण सोडून दहावर्षापेक्षा जास्त वर्ष उलटून गेलेली, भरीस भर म्हणजे बलदंड शरीरयष्टी त्यामुळे नियमीत प्रवेश घ्यायचा म्हणजे पोटात गोळा यायचा. हो नाही करता बायकोच्या पुढाकाराने(जबरदस्तीने म्हणा हवे तर!) राह्त्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात २२जून २०१५ रोजी प्रवेश घेतला खरा पण प्रत्यक्षात जाण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस ३१ जुलै उजाडावा लागला. तत्पूर्वी मनाची तयारी करण्यासाठी गदिमांच्या "एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख...." या गीताची शेकडो पारायणे करावी लागली. कारण एकतर माझ्या सोबतच्या मित्रामध्येच मी एवढा उठावदार दिसतो इथेतर माझ्यापेक्षा दहाएक वर्षानी लहान मुले म्हणजे आपला मुन्नाभाई होणार अशी धाकधूक होतीच आणि ती खरीही ठरली. विद्यार्थीच काय मला इतरही लोक प्राध्यापकच समजू लागले त्यामुळे मला अधिकच संकोचल्यासारखे व्हायचे. दूसरे असे की शाळा-कॉलेज असो वा ऑफिस माझी उपस्थिती जवळपास शंभर टक्के, त्यामुळे कॉलेजला आठवड्यातून एखाद-दुसरा दिवस जायचे अगदी जिवावर यायचे, त्यातही ऑफीस, घरगुती कामे, कोर्ट-कचेरी इत्यादीमुळे खंड पड़ायचा.
           असे सर्व असतानादेखिल शक्य असेल त्यावेळेस कॉलेजला जाऊ लागलो. खरं तर मी शिक्षणाचे महत्व जाणून असलो तरी माझ्या अशिक्षित असलेल्या आई इतपतदेखिल मला शिक्षणाची गोडी नव्हती . डिप्लोमानंतर आर्थिक कारणांमुळे शिक्षण सोडून नोकरीचा मार्ग धरावा लागला. मुंबईत आठ वर्षाच्या कालावधीत आईने तसेच अनेक मित्रांनी पदवीपर्यंतचे शिक्षण तरी पूर्ण करण्याचा अनेकदा सल्ला दिला मात्र आहे त्यात सर्व सुरळीत चालले होते त्यामुळे पुढील शिक्षण घ्यायची तसदी घ्यावी वाटली नाही आणि शिक्षण व्यवस्थेबद्दलही काहीशी नकारत्मक भावना होती.लग्न झाले आणि मुंबई सोडून पुण्यात परतावे लागले. जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्याचबरोबर नात्यागोत्यातील अनावश्यक वाद वाढले. कोर्ट-कचेरी इत्यादी चालू झालं आणि महिन्यातून एकदा येणाऱ्या पगाराला अनेक पाय फुटले. महिन्याचा खर्च भागवताना तारांबळ उडू लागली आणि उशिरा का होईना शिक्षणाशिवाय प्रगती होणं अवघड आहे हे ध्यानात आले.
           खरेतर पदवी मला नावापुरतीच हवी होती कारण जवळपास दहा वर्षांचा कामाचा अनुभव असल्याने शिकून दुसरे काही करायचे नव्हते व त्यामुळेच काहींनी पदवी विकत घेण्याचाही सल्ला दिला होता. पण एकवेळेस पदवी  नाही मिळाली  आणि नोकरीत प्रगती नाही झाली तरी चालेल मात्र  पदवी विकत घेण्याचे पाप माझ्याकडून घडणे शक्य नव्हते. शिकायचे , पदवी मिळवायची तर ती स्वतः शिकून अन्यथा नाही हे नक्की होते. असे असून देखील कॉलेजला जाण्यासाठी मनाची  तयारी होत नव्हती आणि चालढकल करत दहा वर्षे उलटून गेली होती. मात्र रयत शिक्षण संस्थेसारख्या नामांकित आणि ज्ञानदानाचा समृद्ध वारसा लाभेल्या संस्थेत शिक्षण घेता येणार होते आणि केवळ त्यामुळेच कॉलेजला जाणे सुरु झाले.
             कॉलेजला जायला सुरु केल्यापासून शिक्षणाबाबत नवा दृष्टीकोण निर्माण झाला. आपण नेहमी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींबद्दल बोलत असतो मात्र आपल्या शिक्षण घेण्याचा त्रुटी बद्दल काहीच बोलत नाही. पदव्या आणि गुणांच्या नंबर गेम मध्ये अभ्यास फक्त परीक्षेपुरता आणि मार्क्स मिळवण्यापुरताच केला जातो. अभ्यासक्रमात अशाही काही गोष्टी असतात त्या परीक्षेनंतरही आपल्याला उपयोगी पडू शकतात. आपणं त्या दृष्टीने अभ्यास करतच नाही. सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण गरजेचे आहे याची जाणीव आपणां सर्वांना आहे तशीच जाणीव त्यासाठी सर्वांगीण अभ्यास आणि अभ्यासक्रमातील पाठ,कलाकौशल्य, तंत्र आत्मसात गरजेचे आहे याबाबत असायला हवी. मार्क्स तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी उपयोगी पडतील पण ध्येय साध्य करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी घोकमपट्टी नव्हे तर आत्मसात केलेलं शिक्षण उपयोगी पडेल याचीही जाण आपणा सर्वांना असायला हवी.
            सध्याच्या या संघर्षाच्या काळात विद्येंच्या या पवित्र ज्ञानमंदिरात जेवढे आत्मिक समाधान लाभत आहे तेवढे अन्य कुठेही मिळत नाही. अनेकदा अनेक अडचणींमुळे शिक्षण पूर्ण होईल कि नाही याची नेहमीच धास्ती वाटते, कधी निराश व्हायला होते, मात्र कॉलेजमधील शिक्षकवृंद व सहकारी विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे उत्साह वाढण्यास नेहमीच मदत होत असते. एवढंच नव्हेतर बीसीएनंतर राज्यशास्रात पदवी करण्याची इच्छाही पुनः जागृत झाली आहे. माझ्यासारख्या शिक्षणाची  फारशी गोडी नसलेल्या इतर जबाबदाऱ्या पार पाडत असलेल्या विद्यार्थ्यास  सर्व शिक्षकवृंदाचे अमुल्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे. म्हणूनच स्वावलंबी शिक्षणाचे ब्रीद घेऊन समाजातील वंचित घटकांसाठी शिक्षणाचा वटवृक्ष  लावणाऱ्या कर्मवीरांस व त्यांचा वारसा जोपासणार्‍या शिक्षकवृंदास माझा मानाचा मुजरा!!!
                                                           ........ संतोबा  (संतोष गांजुरे)

Monday, May 4, 2015

बळी राजाचा बळी- ३) आत्याबाईंच्या मिशा

 एप्रिल महिना असूनही या महिन्यात तीन चार वेळा पाऊस पडला, अगदी गारांचाही, आम्ही पुरंदरमध्ये आहोत की उत्तरेकडील एखद्या ठिकाणी असा भास व्हावा इतका. ऋतूचक्र पूर्णत बदलत चालले आहे पण निसर्गाला तरी किती दोष द्यावा आम्ही तो शिल्लकच ठेवला नाही. हा सर्व दोष मानवाच्या मूर्ख आणि स्वार्थी प्रवृत्तीचा. पैसा आला, जीवनमान सुधारले, दूरवरुन विहिरीतून शेंदून पाणी आणायला लागायचे आता घरोघरी बोअरवेल आले, गॅससिलेंडर आल्यामुळे गोवर्‍या, सरपण हद्दपार झाले. बैलजोड्या गेल्या ट्रॅक्टर आले. सर्व काही असूनही हाव मात्र वाढतच चालली आहे. पुर्वी शेताला मोठे बांध असायचे त्यावर चिंचा-बोरे-जांभुळ,कडुलिंब इत्यादी अनेक प्रकारची झाडे असत, ही झाडे शेतात ओल धरून ठेवत. त्या बांधावार गाई-गुरे चरायची. आता ना बांध शिल्लक राहीले ना झाडे, ना रानात चरणारी गुरे राहिली.
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, पण एखादा चुकून विझला तर वंश बुडायला नको म्हणून दोघा-तिघांचा जन्म होऊ लागला त्या दरम्याने दोन-तीन मुलींचा नंबरही लागायचा म्हणजेच चार-पाच जणांची एक पिढी तयार व्हायची अर्थात त्यामुळे जमिनीच्या वाटण्या होऊन लहान-लहान तुकडे पडत गेले, पण आता "हम दो हमारे दो" चा काळ असल्यामुळे घरोघरी साधारण एकच वंशाचा दिवा असतो, पण म्हणून काही जमिनीचे तुकडे पडणे थांबले नाही. हा काळ स्री-पुरूष समानतेचाही आहे. ही समानता अस्तित्वात येण्यासाठी सर्वशक्तीमान न्यायदेवतेने आणि मायबाप सरकारने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने न्याय,हक्क मिळावे म्हणून काही कायदे केले आहेत. विवाहकायदा व पोटगी कायदा (घटस्फोट झाल्यास पोटगीची, पतीच्या स्थावर मालमत्तेतील वाटा), कौटुंबिक हिंसाचार कायदा, आरक्षण, समान वेतन कायदा , वारसाहक्क कायदा आणि त्यात वाढच होत चालली आहे, आधी ३३ टक्के आरक्षण मग ५० टक्के आरक्षण, आधी वाडिलोपार्जित संपत्तीत काही ठराविक हिस्सा आता समान हिस्सा, त्यामुळे  "आत्याबाईंना मिशा असत्या तर काका म्हटले असते" या म्हणीप्रमाणे आता आत्याबाईंना काका म्हणण्यासाठी मिशा असण्याची गरज नाही. कारण कायद्याने त्यांना काकाचा दर्जा आणि हक्क दिले आहेत.
जमिनीची किंमत जशी जशी वाढली तसतशी तिची इज्जत कमी होऊ लागली, जमिनीला काळी आई मानून तिची सेवा करणारा माणूस शुल्लक शौकांसाठी काळ्या आईला धनदांडग्याना विकू लागला. त्यांनी शेती कसण्यासाठी नाही तर गुंतवणूक म्हणून विकत घेऊन तिला काटेरी कुंपनात बंदिस्त केले. प्राणी-पशु-पक्षी,मानव यांना भरभरून अन्नधान्य देणारी काळी आई वांझ बनली. पैशापायी नाती संपली, नितिमत्ता, तत्वे कालबाह्य झाली. बहिणी आता हिस्सा मागू लागल्या. साधारणपणे पंचवीस-तीस किलोमीटर वर माहेर असलेल्या मुली जमिनी मिळाल्याबरोबर विकणारच सरंजामशाह निर्माण होऊ लागले.

Sunday, May 3, 2015

बळी राजाचा बळी- २) सरकारी धोरणे - सहानुभूतीचे नकाराश्रू


गाव तसे फार मोठे नाही, पण तरीही गावांतील बहुसंख्य लोक मला मी माझे नाव सांगितल्याशिवाय ओळखत नाहीत. अर्थात त्याला कारणेही बरीचशी आहेत. नाव विचारणारी व्यक्ती जर वयस्कर असेल तर तिचा पुढचा प्रश्न, तुमची बैलं आहेत का अजून हाच असतो. आजोबांना बैल पाळण्याचा शौक होता, त्यासाठी ते बाजारातून लहान गोर्‍हा आणून त्यास व्यवस्थित सांभाळून शेतीचे कामे शिकवत. त्यांचा हा उपक्रम सतत चालू असे त्यापैकी जो चांगला असेल तो घरच्या कामासाठी ठेऊन बाकीचे विकायचे. अर्थात त्यामुळे बैलपोळयाला सर्वात डौलदार बैलजोडी आमचीच असायची.पण आता तो इतिहास झाला आहे आणि ते वैभव पाहायचे भाग्य मात्र मला लाभले नाही, पंधरा-सोळा पेक्षा जास्त वर्ष झाली असतील आमच्या शेवटच्या बैलजोडीला, हिऱ्‍या आणि नाजुक्याला. ती जोड जेमतेमच होती. दिव्याला आत्याच्या शेतात आणि पारगावला मामाच्या व घरच्या शेतात मी साधारणपणे सातवी-आठवीत असताना नांगर हाकल्याची पुसटशी आठवण अजूनही आहे.
पुर्वी घरची श्रीमंती,प्रतिष्ठा ही गोठ्यातील गाई-गुरे व घरातील अन्न धान्यावर ठरली जायची. प्रत्येक घरी एक पांढरीशुभ्र, डौलदार वशिंड असलेली खिल्लारी बैलजोड असायचीच. त्याच बरोबर एखादी गाय असायची, घरातील दूध-दुभते भागेल एवढे दूध काढून बाकीचे दूध वासरासाठी ठेवले जायचे. दूध व्यवसाय हा फार तर रतीबापुरताच मर्यादित होता. त्यामुळे गाईकडून खोंडाचीच अपेक्षा असायची. गाई-बैलांचे घरातील सदस्यांइतकेच महत्वाचे स्थान होते. त्यांचा उपयोग संपला म्हणून त्यांना विकले जात नसे त्यांचा घरीच नैसर्गिक मृत्यू होणे ही समाधानाची बाब होती. त्यांना कसायाला विकणे पाप करण्यासारखेच होते. माणसाइतकेच किंबहुना काकणभर जास्तच प्रेम जनावरांवर केले जायचे. माणसात माणुसकी शिल्लक होती, सर्वजण एकमेकांच्या सुख-दुखात सहभागी व्हायचे, एकमेकांना मदत करायचे. त्यात फायद्या-तोट्याचा जास्त विचार नसे. त्यावेळची पार्टी म्हणजे उन्हाळयात केली जाणारी इरजिक असायची, नांगरणीसाठी सात-आठ बैल जोड्या एकत्र करून एक-एकाचे शेत नांगरले जायचे. ज्याचे शेत नांगरले जायचे त्याच्या घरी रात्री सर्वांसाठी मटनाचा फर्मास बेत असायचा. 
काळ बदलत गेला, तंत्रज्ञान आले, माणसाच्या गरजा वाढल्या, ईर्ष्या वाढली. माणूस व्यवहारी झाला तो फायद्या-तोट्याचा विचार करू लागला.बैल गेले काहींच्या दारात ट्रॅक्टर उभे राहिले, खिल्लारी, पंढरपुरी गाई जाऊन जास्त दूध देणार्या संकरित जर्शी,होल्स्टिन गाई आल्या.खिल्लारी बैल,गाई अदृश्य झाले. गावोगावी दूध संकलन केंद्रे उभी राहिली, जोडधंदा म्हणून दुग्धव्यसाय उदयास आला. आता खोंडाचा(बैलाचा) जन्म नकोसा झाला प्रत्येकाला आता कालवड(गाय) हवी आहे. बैल झाला तर चार-सहा महिन्यात विकावाच लागतो कारण आता शेतीसाठी बैलाची गरजच उरली नाहीये.
मात्र एवढे सगळे होऊन देखिल शेतकर्यांच्या जीवनमानात फार काही सुधारणा झाली आहे असे नाही सुखसंपन्नतेच्या शर्यतीत ते मागेच आहेत. ओला-सुखा दुष्काळ शेतकर्यांच्या पाचवीला पूजलेला आहेच. शेतकरीविरोधी कायद्यांचा गळफास आवळून सरकार त्यात भरच टाकत आहे. उत्पादन खर्च वाढला आहे आणि उत्पादित मालाला हमी भाव नाही, ज्यावेळी भरपूर उत्पन्न होते त्यावेळी ते कवडीमोलाने विकावे लागते तर कधी काही पिकत नाही त्यावेळी तेच विकत घेण्याची वेळ येते. बराचसा शेतमाल नाशवंत असल्याने तो साठवूनही ठेवता येत नाही आणि जो साठवून ठेवू शकतो त्यासाठी गोदामे नाहीत शिवाय बर्‍याच गोष्टींचा( कांदा, बटाटा, डाळी, साखर, खाद्यतेल इत्यादी) जीवनावश्यक गोष्टीत समावेश करण्यात आल्याने करण्यात आल्याने साठवणुकीवर मर्यादा आल्या आहेत शिवाय बाजारभाव वाढला की निर्यातबंदी आहेच. लोकसंख्यावाढी बरोबरच जमिनीचे लहान-लहान तुकडे पडत गेले त्यात आता भूमी अधिग्रहण कायद्याची भर पडली आहे.पाणी,वीज या मूलभूत गरजांबाबत शेतीपेक्षा उद्योग धंदयाना प्राधान्य दिले जात आहे.
त्यातच आता गोवंश हत्याबंदीच्या कायद्याची भर पडली आहे. का तर ह्याने शेतीचे अर्थकारण सुधारेल. दूध-दुभती जनावरे पाळणे सुद्धा आता अवघड झाले आहे. पूर्वी गाई चारण्यासाठी गायराने असायची आता त्या सगळ्या गायरानांवर अतिक्रमण झाले आहे.त्यामुळे आता भाकड जनावरे दावणीला ठेवून कसे परवडेल? आता शेतीसाठी बैलांची गरजही नाही. अनावश्यक जनावरे विकताना शेतकर्यांना काही आनंद होत नाही पण ती विकण्यावाचून पर्याय पण नसतो. सरकारला जर गोहत्या नको असेल तर सरकारने अशा जनावरांसाठी छावण्या, पांजरपोळ उभारावीत शेतकरी आपली भाकड जनावरे सरकारला खुषीने फुकटात देतील मग सरकारने त्यांच्या मलमुत्रापासून आयुर्वेदिक औषधे, खते बनवावीत व सरकारला परवडेल अशा किमतीत विकावीत.गाय ही माता आहे तर तिला वाचवणे सर्वांचेच कर्तव्य आहे मग ती वाचावी म्हणून लोक दुप्पट किमतीने दूध विकत घेतील का?

Monday, April 20, 2015

बळी राजाचा बळी-१) वामनाचे पहिले पाऊल-भूसंपादन

            आपल्या माता भगिनी  वर्षानुवर्षे " ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो"  अशी कामना निर्मिकाकडे करत आहेत पण बळीराजाचे राज्य सोडा त्याचे अस्तित्वच संपूष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण वामनरूपी आसमानी, सुल्तानी संकटांचा टांगता पाय सतत बळीराजाच्या डोक्यावर लोंबकळत आहे.   
        शेतकर्‍याने रात्रंदिवस काबाडकष्ट करुन हालाखीच्या परिस्थितीत जगण्यापेक्षा शेती विकून एखादा व्यवसाय-धंदा वा चाकोरीबध्द चाकरी करावी असा साधासरळ विचार पांढरपेशा व्यक्तिच्या मनात आला नाही तरच नवल. अशाच उदात्त हेतूने व विचाराने मायबाप सरकारने सुधारित भूसंपादन विधेयक आणले आहे. चारपट किंमत,सरकारी नोकरी अशा एक ना अनेक प्रलोभनांचा भरणा या विधयेकात आहे तरी पण सर्व प्रलोभने मृगजळाप्रमाणे आभासी तसेच अविश्वासार्ह वाटत आहेत. कारण शेतकर्‍याला बाजारभावाच्या चारपट किंमत मिळणार असली तरी किंमत कोण ठरवणार? कारण शेतकर्‍याला तर कशाचाच भाव ठरवायचा अधिकार नाही ना अन्नधान्यचा ना भाजीपाल्याचा ना दुध दुभत्याचा. सरकारी नोकरी कसली मिळणार, चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याची? कारण दुसरी उच्चपदाची नोकरी कशाच्या आधारे देणार?
       मुळात आम्ही शेती विकावीच का? कारण शेती करणे हे आमचे कर्म आणि  तोच आमचा धर्मही आहे. फायदया तोट्याचा विचार करुन आम्ही शेती करत नाही.  आम्ही शेतकरी बळीराजाचे वंशज आहोत, आमच्याकडे जी काही वारसाहक्काने चार-दोन एकर जमिन आली आहे तेच आमचे राज्य, आणि ते टिकवणे व पुढील पिढीकडे हस्तांतरित करणे हे आमचे आदय कर्तव्य होय. विधयेकाच्या पाठिंब्याकरिता विकासाच्या व देशहिताच्या गमजा केल्या जात आहेत, पण कसला विकास ? वाढते औद्योगिकरण, शहरीकरण म्हणजे विकास? त्याचे नियोजन काय ? शहरातील कचरा गावात टाकायचा, वारेमाप झाडे तोडायची, हिरव्या शालूने नटलेल्या आमच्या काळ्या आईला नागवे करुन तिथे सिमेंट कॉक्रीटची जंगले उभारायची म्हणजे विकास?
              बरे तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा, आतापर्यंत बर्याच प्रकल्पासाठी जमिनी हस्तगत केल्या पण ना प्रकल्प उभे राहीले ना प्रकल्पग्रतांचे पुनर्वसन केले. दुसरे सरकार होते हे कारण तर बिलकूल गैरलागू आहे कारण १७६० पक्ष जरी असले तरी मुख्य पक्ष दोनच सत्ताधारी आणि विरोधी, ज्यावेळी त्यांच्या भूमिका बदलतात त्यावेळी ते बेमालूमपणे गुणही बदलतात. आम्हालाही वाटते राज्याचा, देशाचा विकास आमच्या हातून व्हावा, आमच्या हातून समाजसुधारणेची कामे व्हावीत व त्यासाठी आपण मुख्यमंत्री वा पंतप्रधान असावे. त्याबदल्यात आम्ही त्या पदाचा चारपट मोबदला देण्यास तयार आहोत पण तुम्ही ठेवाल का आमच्यावर विश्वास?
          देशाच्या सर्वांगिण विकासासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार होणे गरजेचे आहे त्यासाठी जमिनीची गरज व ती देणे क्रमप्राप्तच आहे, पण औद्योगिकीकरणासाठी अविकसित भागात खूप जमिनी पडिक पडलेल्या आहेत त्या ठिकाणी उद्योग उभारावेत, जमिनी स्वस्त मिळतीलच शिवाय तेथील बेरोजगारांना रोजगार मिळेल, मागासभागात पायाभूत सुविधा अस्तित्वात येऊन देशाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. पण सरकार व उद्योगपतीनां सर्व काही लगेच हवे आहे, त्यांना मागास भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यास वेळ नाही. त्यामुळेच त्यांना रेल्वेमार्ग, महामार्ग याच्या दुतर्फा एक एक किलोमीटर क्षेत्र हस्तगत करायचे आहे. देशातील बहुसंख्य शेतकरी हे अल्पभुधारक आहेत अशाने बरेच शेतकरी भूमीहीन, उपरे होतील अर्थात तेही उद्योगपातींच्या फायद्याचेच आहे कारण गुलामासारखे काम करायला त्यांना मजूरही मिळतील. असे असले तरी शेतकरी अन्याय सहन करून किती दिवस गप्प बसतील, तुम्ही त्यांच्या हातातील नांगर हिसकावणार असाल तर प्रथम ते लेखणी हाती घेतील , त्यांच्या लेखणीची भाषा जर तुम्हाला समजणार नसेल तर मात्र त्या लेखणीची ठोकणी झाल्याशिवाय राहणार नाही….

Thursday, March 26, 2015

काळी आई

काळी आई मी लेकरांची,
बळीराजा लेक माझा गोजिरा.
हिरवे लेणं, साज माझा साजिरा.
अंगाखांद्यावर किलबिल पाखरांची,
जणू रुणझूण नववधूच्या पैंजणाची.

काळी आई मी लेकरांची, 
बळीराजा लेक माझा कष्टाळू .
घननिळ आभाळ, बाप जसा मायाळू.
माणिक मोत्यापरी फळे-फुले बहरती.
विठुमाऊली येतीसावत्याचा मळा पाहती.

काळी आई मी लेकरांची,
बळीराजा लेक माझा पोशिंदा,
अजाण पांढरपेशी करिती निंदा. 
चार पैशात खरेदती बहुमोल वाण ,
कशी होईल त्यांस कष्टाची जाण. 

काळी आई मी लेकरांची,
बळीराजा लेक माझा भोळा.
मजवर दलाल ठेविती डोळा,
भूल थापा देऊनी फसवती,
दीड-दमडी साठी सौदा करती.

काळी आई मी लेकरांची,
बळीराजा लेक माझा हतबल.
असहाय्य करुनी नाडती  खल.
जाहली कैसी भडव्यांची पैदास,
कुंपणात मज डांबूनी, घालती हैदोस.
                                   .... संतोबा   (संतोष गांजुरे)

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!