मित्रा, मी इतक्या दूरवरून फक्त तुझ्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. पण तुला तुझ्या यशापेक्षा माझ्या क्षणभंगूर अपयशाचा एवढा आनंद व्हावा याचे मला आश्चर्य वाटतेय? आणि मी अपयशी झालोय हे फक्त तुम्हाला वाटतेय, तुला माझी आणि मला तुझी काय स्वप्ने आहेत ती माहीत नाहीत का?. माझी स्वप्ने चार-चौघांसारखी नाहीत, खरेतर माझे स्वप्न एक वेडेपणाच आहे पण अजूनही मी त्या वेडेपणाला चिकटून बसलो आहे. तू मात्र तुझ्या स्वप्नांत गरजेप्रमाणे हवा तसा फेरफार करून जिंकल्याचा जल्लोष करतोय, अर्थात त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाहिये, फक्त काही करून तू खुष असावे एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. दु:ख याचेच वाटते की, तू माझा जिवलग मित्र आहेच शिवाय तुला माझे ध्येय व त्यासाठीचे माझे प्रयत्न त्याग याची पूर्ण जाणीव आहे तरीसुध्दा तू मला दोष देत आहेस. पण कधी-कधी असेही वाटते की मला एवढ्या भरभरून संधी मिळत असताना देखील मी माझ्या ध्येयाला चिकटून आहे म्हणून तर तुम्हा सर्वांचा जळफळाट होत नाहीये ना?.
चांगली नोकरी,सुंदर बायको, टू बीएचके फ्लॅट एवढी सामान्य स्वप्ने दोघांचीही नव्हतीच. याचा अर्थ या गोष्टी आपल्याला नको होत्या अशातला भाग नाहीये, तू त्या मोठ्या कष्टाने,स्वकर्तुत्वाने मिळवल्यात त्याचा मला खरेच खूप अभिमान आहे, पण आपली ध्येय गुंडाळून त्या पूर्ण कराव्यात असे मला वाटत नव्हते. मलाही या गोष्टी आज ना उद्या मिळतील मला कसलीच घाई नाहिये. कारण त्या मिळणारच आहेत,त्याबरोबरच मला ध्येयही गाठता येईल याची मला पूर्ण खात्री आहे म्हणून. पण मी त्या दृष्टीने काहीच हालचाल वा प्रयत्न करत नाही ह्या आरोपाशी मी बिल्कुल सहमत नाहीये, उलट ही एक कठोर तपश्चर्या आहे. कारण मी एक भोगी व्यक्ती आहे, तसेच बरेच काही उपभोगण्यासाठी सहजासहजी उपलब्ध असतानाही एखाद्या योग्याप्रमाणे सर्वाचा त्याग केला आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. हा माझा बचाव नाहीये. हे माझे स्पष्टीकरण फक्त सध्या व पुढे काही गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून आहेत बाकी काही नाही. एखाद्याने मला चांगले म्हणावे म्हणून काही करण्याची मला गरज नाहीये. मी कसा आहे ते मला चांगले माहीत आहे त्यासाठी कोणाच्या कसल्याही प्रमाणपत्राची मला गरज नाहीये.
शेवटी एकच सांगतो तुम्ही कोणीही असा, पण मी एक राजपुत्र आहे हे लक्षात ठेवा आणि एका राजपुत्राचे असते तेच माझे स्वप्न आहे त्यापासून मी तसूभरही ढळणार नाही भले त्याबदल्यात मला कसलीही किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर. "वर्षा" हेच एकमेव ध्येय,स्वप्न सर्व काही आहे माझ्यासाठी आणि मी ते प्राप्त करणारच ते सुद्धा स्वकर्तुत्वावर आणि नीतिमत्तेने. ज्यादिवशी मी हक्काने, मानाने वर्षावर जाईल त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत असल्यास मला आनंदच होईल. तुम्ही माझ्याशी कसेही वागलात तरी तुमच्याबद्दल माझ्या मनात कसलाही आकस असणार नाही. पण एक त्यादिवशी तुम्ही सर्वांनी माझे राजेपण खुल्यादिलाने मान्य करायचे आणि ते आपण धुमधडाक्यात साजरे करू!!!!