मानव हा टोळी करून राहणारा हिंसक प्राणी आहे. शेकडो वर्षापासून मानव जातीतील निवडक प्रगल्भ समाजधुरीणांनी रानटी मानवजातीचे नागरीकरण (civilization) करण्याचे प्रयत्न केले पण त्याला अद्याप पुरेसे यश आले नाही. मानवामध्ये जन्मजात वर्चस्ववादी गुण प्रबळ असतो, एखादा मनुष्य स्वतः अगदी शोषित असला तरी त्याच्यापेक्षा कमकुवत असणाऱ्यावर तो वर्चस्व गाजवण्याची मनीषा बाळगून असतो. मानवामध्ये हिंस्रपणाबरोबरच अनामिक भिती असते. मानवाला चमत्काराचे आकर्षण असते, काहीतरी चमत्कार होईल, कोणीतरी तारणहार येऊन आपला उद्धार करेल असा भाबडा पण ठाम विश्वास बहुतेक जणांना असतो. माणसाच्या या गोष्टींचा फायदा समाजातील भामटे लोकं उचलत असतात. बहुसंख्य लोक अशा भामट्या लोकांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्यामुळे आपले काहीतरी भले होईल म्हणून त्यांच्या नादी लागतात आणि त्यांच्या स्वतःकडे जे काही आहे तेही गमावून बसतात.
समाजात एका बाजूला असे भूलथापा देऊन दिशाभूल करणारे भामटे असतात तसेच समाजाला योग्य दिशा दाखवणारे, त्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करणारे, नवनवीन संशोधन करून, आपल्या दूरदृष्टीने नव्या योजना आखून, नव्या संकल्पना राबवून, लोकांना शहाणे करून, लोकांच्या जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न करणारे कुशाग्र बुद्धीमत्तेचे कर्मवीर असतात. त्यांच्या विद्वत्तेचा फायदा समाजाला व्हावा म्हणून ते सतत झटत असतात. अशा विद्वांनामुळे भामट्यांची दुकानदारी बंद पडण्याची शक्यता असते व त्यामुळे भामट्यांना विद्वांनाचा तिटकारा असतो, ते त्यांच्या द्वेष करतात, त्यांची बदनामी करतात, त्यांना देव,देश,धर्म विरोधी ठरवतात. त्यांची भाषा आक्रमक असते, सतत खोटं बोलतात पण रेटून बोलतात, ते कधीही मुद्द्यावर बोलत नाहीत. मुद्द्यावर बोलण्यासाठी लागणारी विद्वत्ता त्यांच्याकडे नसते त्यामुळे ते गुद्द्यावर येतात आणि गुद्द्यावर येणारे खरंतर खूप घाबरट असतात. ते कधीही आपल्या अनुयायांचे सुरक्षित कवच सोडून बाहेर पडत नाही. ते आपल्या अनुयायांना भडकावून विद्वांनांच्या विरोधात लढण्यास प्रोत्साहित करत असतात. या उलट विद्वांनाची भाषा मवाळ, प्रेमळ असते, ते वादविवाद, आरोपप्रत्यारोप अशा वांझोट्या गोष्टींपासून दूर असतात. आपल्या भल्यासाठी आपल्यालाच सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागणार आहेत याची शिकवण ते लोकांना देत असतात. अर्थात हे वास्तव लोकांच्या पचनी पडत नाही त्यामुळे जेवढे समर्थन भामट्यांना मिळते तेवढे विद्वानांना मिळत नाही. अशाच एका लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विद्वान, कर्मवीर डॉ. मनमोहन सिंह यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना ते सक्रिय असताना अनेकदा अपमान, अवेहलना भोगावी लागली पण मनमोहनजी आम्हांला आपल्या आमच्यावरच्या उपकाराची जाण आहे.
मनमोहनजी आपण देशातील कोट्यावधी लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवला. आपण आम्हाला केवळ गरिबीच्या जोखडातून मुक्त केले नाही तर आम्ही कधी न पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यास हातभार लावला. आपल्या कार्याची दखल केवळ इतिहास नव्हे तर वर्तमान आणि येणारा भविष्यकाळही घेईनच पण आम्ही आपण घेतलेल्या सुधारणावादी निर्णयामुळे देशाच्या आणि पर्यायाने आम्हां साऱ्या जनतेच्या जीवनात घडलेल्या आमूलाग्र बदलांसाठी आम्ही आपल्याबद्दल कायमच कृतज्ञ असू. फाळणीची झळ सोसत जन्मभूमीतून परागंदा व्हायला लागून, बिकट आर्थिक परिस्थितीशी झगडून देखील तुमच्यात इतरांबद्दल कडवटपणा आला नाही. आपण त्या दुःखद आठवणींचे कड काढत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. स्थितप्रज्ञपणे आपण आपले कार्य निरपेक्षपणे पार पाडत राहिलात.
तुम्ही सक्रिय असताना तुमच्यावर द्वेषाचा चिखल उडवणाऱ्या, अशाघ्य भाषेत टिकाटिपण्णी करणाऱ्यांचीही आपल्यामुळे भरभराट झाली, त्यांनी आपली कितीही मानहानी करण्याचा प्रयत्न केला तरी देशातच नव्हे तर जगात आपणांस मान आपल्या योगदानामुळे आहे त्याला कोणत्याही मेंदू गहाण ठेवलेल्या टोळधाडीमुळे बिल्कूल तडा जाणार नाही. सध्या सुमारांची सद्दी असल्यामुळे आणि वास्तवाची झळ बसू लागल्याने त्या टोळधाडीतील काहींची बुद्धी ताळ्यावर येऊ लागली आहे. त्यांना आता उथळ, बोगस, फेकाड तारणहारांच्या नादी लागून आपल्यावर केलेल्या टीकेची उपरती होऊन केलेल्या टिकेबद्दल निश्चित खंत वाटत असेल. कोणत्याही समाजहितासाठी निरपेक्ष कार्य केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात गरळ ओकण्याची प्रवृत्ती शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. आपल्या मृत्यूपश्चातही असा अनुभव आला, अशा विकृतांची कीव करावी तेवढी कमीच आहे, हे लोक माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे सुद्धा नाहीत. असो.
देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे भारतीय अर्थक्रांतीचे जनक, कुशल अर्थतज्ञ, कोणत्याही आर्थिक, राजकीय संकटाच्या काळात स्थितप्रज्ञ राहून मार्ग काढणारे. शांत, संयमी, मृदू तितकेच कर्तव्यकठोर. देशाला प्रगतीपथावर न्यायचे तर त्यात सर्व जनतेचा सहभाग आवश्यक आहे, सर्व जनतेची प्रगती झाली तरच देशाची खरी प्रगती होईल याची जाणीव असणारे आणि त्यामुळे चारदोन भांडवलदारांच्या हिताचा विचार न करता देशाच्या दूरगामी फायद्यासाठी तात्पुरत्या अप्रिय आणि राजकीय दृष्ट्याआत्मघातकी ठरू शकणाऱ्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, प्रधानमंत्री म्हणून कर्तव्यकठोर निर्णय घेणारे. ज्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी भूषविलेल्या विविध पदांचा मान, शोभा वाढली. अर्थशास्रासारख्या किचकट विषयावरचे ज्यांचे ग्रंथ, लेख मोठ्या आदराने जगभर अभ्यासले जातात त्या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे परवा २६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
संतोबा...