मान्य आहे सगळीकडे अराजकता माजली आहे पण अशी कोणती परिस्थिती आहे जी शाश्वत आहे?. परिवर्तन अटळ आहे. सत्य, प्रेम, न्याय शाश्वत आहे. द्वेषाची, विषमतेची भयाण काळरात्र सरून समतेची सोनेरी पहाट नक्कीच उजाडेल. सतत द्वेषाची गरळ ओकणाऱ्या वैशाख वणव्यासारख्या या काळात परस्पर सौहार्द्रयाची पालवी बहरेल. स्वतःच्या डोळ्यातील मुसळ न बघता दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधून झुंडीने येऊन निर्दयीपणे लचके तोडणाऱ्या हिंस्त्र श्वापदांचा निःपात होईल. दुसऱ्यांच्या आयुष्यात वांझोट्या अस्मितांची ठिणगी टाकून त्यांच्या आयुष्य-भविष्याची राखरांगोळी करणाऱ्या कारस्थानी लोकांना त्याच आगीच्या झळा सोसाव्या लागतील. आपल्या कुळातील व्यक्तीच्या राईएवढ्या कर्तुत्वाला पर्वताएवढे भासवून त्याचे उदात्तीकरण व दुसऱ्याच्या पर्वताएवढ्या कर्तुत्वात काहीना काही खुसपट काढून त्या व्यक्तीला बदनाम करणाऱ्या कपटी लोकांच्या वंशश्रेष्ठत्वाचा मुखवटा गळून पडेल.
जेव्हा प्रत्येकाला आपआपले अंगभूत कलाकौशल्य दाखवण्याची संधी मिळेल आणि सृजशीलता ही कोणाची मक्तेदारी नाही याचे भान येईल तेव्हा चांगल्या गोष्टींची उचलेगिरी करून, जे श्रेष्ठ ते आम्हीच निर्माण करू शकतो असा संकेत प्रस्तापित करून इतरांमध्ये न्यूनगंड निर्माण करणाऱ्या कावेबाजांचा कावा उघडा पडेल. कर्तृत्वाचे, संस्कृतीचे, वर्तणुकीचे आपल्याला सोईस्कर असे मापदंड ठरवून बहुजनांमध्ये न्यूनगंड निर्माण करून ठेवणाऱ्या अभिजनांचे पितळ उघडे पडेल. पांढरपेशी क्षेत्रात आपले वर्चस्व अबाधित रहावे म्हणून कंपूशाहीच्या माध्यमातून इतरांना संधी नाकारून, येणकेन प्रकारे सर्व क्षेत्रातील धोरण ठरवण्याची अधिकारपदे ताब्यात ठेऊन इतरांच्या आयुष्याची धूळधाण करणाऱ्या धूर्त लोकांची मक्तेदारी संपुष्टात येईल. वैयक्तिक जीवनात सुधारणावादी असणाऱ्या पण सामाजिक जीवनात समाजविघातक रूढीपरंपरांचे समर्थन आणि साधनसुचीतेचे अवडंबर माजवून इतरांना कर्मकांडात गुंतवून अज्ञानाच्या, दारिद्र्याच्या अंधकारात खितपत ठेऊन आपल्याला स्पर्धा निर्माण होऊ न देण्याची काळजी घेणाऱ्या कलमकसायांचे मनसुबे धुळीस मिळतील.
हे सगळे होईल पण ते अनासाये होईल या भ्रमात राहुन चालणार नाही त्यासाठी निकराची लढाई लढावी लागेल आणि ती लढताना प्रसंगी स्वतःला धुळीस मिळायची तयारी ठेवावी लागेल. कारण ही लढाई तोलामोलाची नाही कारण एका बाजूला साम, दाम, दंड, भेद याचा पुरेपूर वापर करणारा समाजविघातक प्रतिस्पर्धी आणि दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत नीतिमत्तेने, न्यायाने लढा लढण्याचा वसा घेतलेले समाजाभिमुख कार्य करणारे विवेकशील पुरोगामी. त्यात जरा जरी गफलत झाली तर क्षणात बाजू पलटायला वेळ लागणार नाही कारण शोषित, पीडित अर्थात फिर्यादीलाच गुन्हेगार ठरवून बाजू पलटवण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिवाय हे मूठभर असून एवढे डोईजड कसे तर बुद्धीभेद करण्यात ते पटाईत आहेत. त्यासाठी देव, देश, धर्म, संस्कृती, इतिहास, महापुरुष या अस्मितेंच्या गोष्टींचा वापर केला जातो व त्यामागे या गोष्टींचे संवर्धन वा कोणताही उदात्त हेतू नसून किशोरवयीन पिढीचा बुद्धीभेद करून त्यांना झोंबी (स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला) बनवण्याचा व त्यांचा वापर त्यांचे ईप्सित साध्य करण्यासाठी करून घेणे हा असतो. हा झोंबी वर्ग सांख्यिकीयदृष्ट्या सर्वात मोठा आहे. समाजकंटकांनी चिथावणीखोर वक्तव्य करून, दुसऱ्यांबद्दल द्वेष, भिती निर्माण करून या तरुणांची माथी भडकवून, विचारशक्ती नियंत्रित केली आहे पण याची जाणीव या तरुणांना नाही. मार्क ट्वेन म्हणतो त्याप्रमाणे "लोकांना फसविणे सोपे आहे पण त्या लोकांना तुम्ही फसवले गेले आहात हे पटवून देणे कर्मकठीण असते. आपल्याला या तरुणांना विवेकवादाच्या सन्मार्गावर आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागेल.
आपला संघर्ष हा कोणाला संपविण्यासाठी नाही, कोणावर वर्चस्व गाजवण्यासाठी नाहीतर सगळ्यांना नैसर्गिक, मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आहे आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी आहे. आज जरी हे बहुसंख्य बुद्धीभेद झालेले तरुण आपल्या विरोधात असले तरी त्यांना आपल्या विरोधात उभं करून हा संघर्ष लढता येणार नाही. काहीतरी उदात्त, पुण्याचे दैवीकार्य त्यांचा हातून घडत आहे ह्या भ्रमात ही तरुण मंडळी आहेत. त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे की तुमच्या आयुष्याची भविष्याची आहुती कोणत्या दैवी कार्यासाठी नसून समाजकंटकाचे विकृत मनसुबे तडीस नेण्यासाठी आहेत. सतत तुम्हांला काही न काही कृती आराखडा देऊन कट्टर बनवले जाणार, कोणतेही विध्वंसक कृत्य करताना तुम्ही आघाडीवर असणार आहात. प्रत्येक संकटात, अडचणीच्या वेळी तुमचाच बळी जाणार आणि ज्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची राखरांगोळी केली ते लोक नामानिराळे राहणार. त्यांच्यासाठी लढताना तुम्ही त्यांच्यासाठी ढाल-तलवार आहात, तर त्यांच्या अधिकारांची,सत्तेची पालखी वाहताना तुम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहात, तुम्ही सेवा करावी आणि त्यांनी मेवा खावा हीच खरी तजवीज आहे. या वाट चुकलेल्या तरुणांची सद्सदविवेक बुद्धी जागृत करायला हवी. त्यांची हेटाळणी न करता त्यांना आपुलकीने जवळ करायला हवे, त्यांना भल्याबुऱ्याची जाणीव करून द्यायला हवी.समाजाभिमुख कार्य करणाऱ्या समूहाची ही मोठी जबाबदारी ही आहे की कोणत्याही वादग्रस्त वक्तव्याचा समचार घेताना, कोणत्याही बऱ्यावाईट घटनवेर टीका करताना वा बाजू घेताना ती निरपेक्षपणे करावी त्यात एका विशिष्ट जात,धर्म, समुहालाच लक्ष्य केले जातेय अशी भावना निर्माण होऊ देऊ नये अन्यथा आपली बाजू न्याय्य असतानादेखील समोरच्या व्यक्तीला ती पटवून देणे कठीण जाईल.
या वाट चुकलेल्या तरुणांना हे पटवून द्यावे लागेल की तुम्ही प्रगत झालात तर देश प्रगत होईल, तुम्ही नीतिमत्तेने वागलात तर देव प्रसन्न होईल, तुम्ही अनिष्ट रूढी परंपरा नाकारल्या तर धर्म वाढेल. तुम्ही उच्चशिक्षित झालात, समता, स्वातंत्र्य, न्यायाच्या तत्वाने वागालात तर सर्व महापुरुषांचा सन्मान होईल, तुम्ही समाजातील सर्व घटकांचा सन्मान केलात तर आपली संस्कृती महान ठरेल. तुम्ही द्वेष, तिरस्कार, वर्चस्ववाद त्यागला तर स्वत:च्या आणि येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक निकोप, निरोगी, सुरक्षित समाज निर्माण होईल. जिथे प्रत्येकाला कसलेही ओझे न बाळगता मुक्तपणे वावरता येईल.प्रत्येकाच्या नैसर्गिक, मूलभूत हक्कांचे संवर्धन, संरक्षण होईल. समाजाची वर्चस्ववादी मानसिकता बदलून, समतावादी मानसिकता निर्माण होईल. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा कोणत्याही क्षेत्रात कोणाचीही मक्तेदारी, कंपूशाही नसेल. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कौशल्यानुसार, आवडीनुसार त्या त्या क्षेत्रात प्रगती करण्याची समान संधी उपलब्ध होईल. प्रत्येकाला आपापल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. एखादी अनिष्ट रुढी, परंपरा, समूहाचा सामाजिक संकेत पाळला नाहीतर सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकणे असले प्रकार घडणार नाहीत. समाजात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित होईल, प्रगतीशील दुष्टिकोन बाळगणारा समाज निर्माण होईल.
संतोबा...