Ads 468x60px

Saturday, November 25, 2023

पणवती

असा हा पणवती, आमचा पणवती.

नकलाकार हा थोर, करितो भानामती.

झाले झोंबी सारे, करिती याची भक्ती.

झिंगुनी द्वेष नशेत, ओवाळती आरती. 

भेटे जो यांस, तयांशी जोडीतो नाती.


असा हा पणवती, आमचा पणवती.

नाकर्तेपणा झाकण्या, घालितो भिती.

साऱ्या ब्रम्हांडात, त्याची हो अपकीर्ती.

नको तिथे जाई, करी नसत्या उचापती.

पाहूनिया वेशभूषा, साऱ्यांचे डोळे दिपती.  


असा हा पणवती, आमचा पणवती.

आश्वासने पोकळ,करू म्हणे प्रगती.

भोंगळ सारा कारभार,झाली अधोगती.

बहू सुखी संसाराची, करुनिया माती.

म्हणे निर्ल्लज, करा सिद्ध राष्ट्रभक्ती.


असा हा पणवती, आमचा पणवती.

हा खरा पाखंडी, ढोंगी याची विरक्ती.

ह्यांस साऱ्याची हौस, न लपे आसक्ती.

भले न होवो कोणाचे, ही ह्याची अवनिती.

लुबाडूनी साऱ्यांस, केली ठकांची भरती.


असा हा पणवती, आमचा पणवती.

साहवेना यांस, विरोधकांची अस्वीकृती.

निंदा,बदनामी करे, दिसे त्याची विकृती.

गाई सदा रडगाणं, मुर्दाड याची प्रवृत्ती.

वांझ याच्या आणाभाका, न काही निष्पत्ती.


असा हा पणवती, आमचा पणवती.

पुरे हा आता, द्वेषाची व्हावी समाप्ती.

सलोखा टिकावा, व्हावी आता जागृती.

नसो कसली भिती, आपुल्या सभोवती.

भल्याबुऱ्याची जाण, लाभो सर्वां सन्मती.

तिमिर जावो, उजळो चहूकडे दीपज्योती.

                         ... संतोबा.

Friday, November 24, 2023

पणवती

 असा हा पणवती, आमचा पणवती.

नकलाकार हा थोर, करितो भानामती.

झाले झोंबी सारे, करिती याची भक्ती.

झिंगुनी द्वेष नशेत, ओवाळती आरती. 

भेटे जो यांस, तयांशी जोडीतो नाती.


असा हा पणवती, आमचा पणवती.

नाकर्तेपणा झाकण्या, घालितो भिती.

साऱ्या ब्रम्हांडात, त्याची हो अपकीर्ती.

नको तिथे जाई, करी नसत्या उचापती.

पाहूनिया वेशभूषा, साऱ्यांचे डोळे दिपती.  


असा हा पणवती, आमचा पणवती.

आश्वासने पोकळ,करू म्हणे प्रगती.

भोंगळ सारा कारभार,झाली अधोगती.

बहू सुखी संसाराची, करुनिया माती.

म्हणे निर्ल्लज, करा सिद्ध राष्ट्रभक्ती.


असा हा पणवती, आमचा पणवती.

हा खरा पाखंडी, ढोंगी याची विरक्ती.

साऱ्याची ह्यांस हौस,लपे ना आसक्ती.

भले न होवो कोणाचे, ही ह्याची अवनिती.

लुबाडूनी साऱ्यांस, केली ठकांची भरती.


असा हा पणवती, आमचा पणवती.

साहवेना यांस, विरोधकांची अस्वीकृती.

निंदा,बदनामी करे, दिसे त्याची विकृती.

गाई सदा रडगाणं, मुर्दाड याची प्रवृत्ती.

वांझ याच्या आणाभाका, काही न निष्पत्ती.

Saturday, October 28, 2023

भांडवलशाहीचे ठेकेदार

              तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करावे असे परवा एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणाले. पाश्चिमात्य कार्यसंस्कृतीला दोष देत आम्ही तरुणांनी पाश्चिमात्य देशांकडून वाईट सवयी स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नेहमीप्रमाणे अनेक उद्योगपतींसारखे आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी त्या वक्तव्याला देशभक्तीचा तडका दिला आहे. एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या माध्यमातून त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक साम्राज्य निर्माण केले आहे आणि त्यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करू दिला आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक आहेच. पण तरुणांना आठवड्याचे ७० तास काम करायला सांगून भांडवलशाहीसाठी कामगारांचे शोषण करणारी पोषक व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून ते वातावरणनिर्मिती करत आहेत का हे बघायला हवे कारण त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक उद्योगपतींनी त्यांचीच री ओढली आहे. तसेही आजकाल सर्व कामगार कायदे धाब्यावर बसवून लोकांची पिळवणूक केलीच जात आहे पण देशभक्तीच्या नावाखाली कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे आठवड्याचे तास वाढवले की भांडवलदारांना कामगारांची पिळवणूक करण्याला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल.

               आजकाल सर्वसामान्य जनतेने स्वयंभू देशभक्त आणि देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणाऱ्या लोकांचा धसका घेतला आहे. अनेक उद्योगपती त्यांची उत्पादने गुणवत्तेच्या तराजूत न तोलता देशभक्तीच्या तराजूत तोलून आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करत असतात. ज्याप्रमाणे राजकारणी नेते आपली समाजविघातक विचारसरणी, निर्णय सर्वसामान्य जनतेवर लादताना त्याला देशभक्तीचा, देशप्रेमाचा मुलामा देत असतात व कोणी विरोध केला की त्याला देशद्रोही ठरवत असतात अगदी तीच पद्धत आजकाल भांडवलदारांनी आणि तथाकथित सेलिब्रिटींनी अवलंबली आहे. देशभक्ती कोणी सिद्ध करायची तर ज्यांच्या शेकडो पिढ्या भारतात जन्मल्या इथेच राहिल्या, राबल्या आणि याच मातीत मिसळल्या त्यांनी आणि देशभक्ती कोणासाठी सिद्ध करायची तर ज्यांची जगभरात अनेक देशात संपत्ती आहे, ज्यांची मुले परदेशात शिकली आहेत, स्थायिक झाली आहेत त्यांच्यासाठी. उद्या देशात काही विपरीत घडण्याची शक्यता निर्माण झाली तर हे तथाकथित देशप्रेमी लोक पहिल्यांदा परदेशात पलायन करतील आणि येथील शोषित, कष्टकरी लोक देश वाचवण्यासाठी लढा देतील. स्वातंत्र्याचे, मानवी मूलभूत नैसर्गिक हक्कांचे महत्व या सर्वसामान्य जनतेशिवाय जास्त कोणाला कळणार आहे?. हीच सर्वसामान्य जनता कोणत्याही विपरीत परिस्थितीत जीवाची बाजी लावून देशासाठी लढतील मग शत्रू परकीय असो वा अंतर्गत कोणाला विकलेला दलाल असो ते सर्वांना पराभूत करुन स्वतंत्र देशासह स्वतंत्र राहतील.  

                शोषित, कष्टकऱ्यांनी मूलभूत हक्काची मागणी केली तर ते देशद्रोही ठरत असतील तर त्या हिशोबाने आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळावी यासाठी लढा देऊन १० जून १८९० पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर करावयास भाग पाडणारे रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे, ४ एप्रिल १९४६ रोजी दुस-या कारखाना कायदा दुरुस्तीने मजुरांसाठी दैनंदिन आणि साप्ताहिक तास मर्यादित करण्यास भाग पाडणारे आणि १९४८ पासून लागू झालेला किमान वेतन कायदा करण्यास पुढाकार घेणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नाविन्यपूर्ण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापरातून देशाच्या सामाजिक, आर्थिक विकासास उत्तेजन मिळेल यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक योजना आखून भारतात माहिती तंत्रज्ञानक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणारे व पाच दिवसांच्या आठवड्याची संकल्पना मांडणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अथवा सुट्टीच्या दिवशी अधिकचे काम, फोन कॉल्स नाकारण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना मिळावा म्हणून राईट टू डिस्कनेक्ट बिल लोकसभेत मांडणाऱ्या व ते मंजूर करून घेण्यास आग्रही असणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही देशद्रोही म्हणावे लागेल. 

               माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वदेशी टेक्नॉलॉजी कंपनी स्थापन व्हाव्यात, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या सामाजिक आर्थिक विकासास उत्तेजना मिळावी यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक योजना आखून भारतात माहिती तंत्रज्ञानक्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यासाठी १९८८ मध्ये टायफेक(Technology Information, Forecasting and Assessment Council (TIFAC) स्थापनेत योगदान दिले आणि त्यास आर्थिक मदतीसाठी सिडबी (Small Industries Development Bank of India) बँकेची स्थापना केली. प्रसंगी नुकसान सहन करून १९९० मध्ये Exim policy (Export Import Policy) मध्ये सुधारणा करून तिच्यामध्ये लवचिकता आणली आणि त्याची फळे आपल्याला १९९२ पासून दिसू लागली आहेत. पण आज भारतीय आयटी कंपन्यांची काय अवस्था आहे त्या नवीन उत्पादन निर्मितीसाठी किती निधी राखीव ठेवतात, नवीन संशोधनावर किती खर्च करतात. अमाप पैसा, प्रचंड उच्चशिक्षित मनुष्यबळ असताना त्यांनी काय नवीन संशोधन करून जागतिक दर्जाचे उत्पादन निर्माण केले आहे. त्यांनी केवळ उच्चशिक्षित माहिती तंत्रज्ञान अभियंते स्वस्तदरात घेऊन जगभरातील इतर कंपन्यांच्या कामांसाठी जास्तदराने पुरवठा केला आहे. सकाळी कामावर जाताना हडपसर गाडीतळ, चंदननगर येथे अनेक रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या मजुरांचा घोळखा दिसत असतो. तसेच तिथे वेगवेगळ्या बिल्डर आणि इतर उद्योजकांना रोजंदारीवर मजूर पुरवणारे दलाल(labour contractor) असतात. या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांकाकडून त्यांना कसल्याही सुरक्षेच्या सुविधा न पुरवता, कमीत कमी मोबदल्यात जास्तीत जास्त काम करून घेतले जाते. आपल्या आयटी कंपन्या काय त्यापेक्षा वेगळ्या आहेत काय?. जास्त तास काम म्हणजे जास्त कार्यक्षमता हा रुढीवादी विचार त्याचेच द्योतक आहे. 

          प्रश्न आठवड्याला ७० तास काम करण्याचा नाही, कामात जर काही उदात्त हेतू असेल, नाविन्य असेल, सृजशीलतेला वाव असेल तर ७० काय तरुण त्यापेक्षाही जास्तवेळ काम करतील पण रोज केवळ पाट्या टाकायचे काम असेल आणि त्याचा काही यथायोग्य मोबदला मिळणार नसेल तर कोण स्वतःचे शोषण होऊ देईल. आठवड्यातून पाच दिवस काम असेल तर रोजचे १४ तास अधिक ऑफिसला जाण्या-येण्याचे २-३ वैतागवाण्या ट्रॅफिकमधले तास असे १६-१७ तास आणि सहा दिवस काम असेल तर रोजचे १२ तास अधिक ऑफिसला जाण्या-येण्याचे २-३ तास असे १४-१५ तास काम करावे लागेल. राहिलेल्या सात-आठ तासांत झोपण्याव्यतिरिक्त काय करता येईल. वैयक्तिक आवडीनिवडी, घरदार, बायको-मुलंबाळं यावर तुळशीपत्र ठेवल्यासारखे होईल. आजकाल माहिती-तंत्रज्ञान अभियंत्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या वरचेवर येऊ लागल्या आहेत हा वैयक्तिक आणि व्यावसयिक जीवनातील समतोल बिघडल्याचे द्योतक नव्हे काय?. अनेक पिढ्या संघर्ष करून आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्य मिळाले आहे, हजारो वर्ष अन्याय सहन करून आता कुठे मानवाचे नैसर्गिक मूलभूत हक्क मिळू लागले आहेत. शालेय शिक्षण घेणारी ही माझी पहिली पिढी आहे. आता कुठे ताठ मानेने समाजात उभे राहता येऊ लागले आहे. आम्हाला साध्या रहाणीमानाचे उपदेश देऊन, देशप्रेमाचे उमाळे काढून आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आणि नैसर्गिक मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करू नका. देशप्रेम वैगरे शिकवण्याच्या भानगडीत तर अजिबात पडू नका, देशप्रेम आमच्या रक्तातच आहे त्यासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज अजिबात नाही!.   

                                                               संतोबा...

Wednesday, August 16, 2023

स्वर्गीय पुणे

 पुणे तिथे काय उणे, आहे राहावयास किती चांगले.

लोंढेच्या लोंढे स्थिरावले, बघा पुणे कसे चौफेर पांगले.

वाढली घरेदारे, इमारती, कुठे झोपड्या तर कुठे बंगले.

गुंजभर ना कुठे जागा राहिली, वाढली सिमेंटची भव्य जंगले.

बहुसांस्कृतिक झाले पुणे, आधुनिकतेच्या रंगाढंगात रंगले.


वाढ ही आक्राळ-विक्राळ, नाही त्यास कुठला धरबंध.

चवलीपावलीचा हिशोब, एवढाच शासन-प्रशासनाचा छंद. 

पायाभूत सुविधांवर वाढे ताण, नाही कोणाला त्याचा गंध.

पडे सारे अंगवळणी, दूरदृष्टीचा सगळीकडे आनंदी आनंद.

नेत्यांना ना लोकांशी देणंघेणं, त्यांचा तर मतांशी ऋणानुबंध.


घटकेला तास लागो, इतका होवो ट्रॅफिक जाम.

न पोहचो वेळेवर कुठेही अन् न होवो कोणतेही काम.

तोडू दे दुसऱ्यांना सिग्नल अन् वाहतुकीचे नियम.

माझा कासवगतीने पुढे सरकताना, कधी न ढळो संयम.

धावपळीच्या जमान्यात, सिग्नलवर मिळो थोडा आराम.


पडू दे आता जेवढे पडायचे आहेत तेवढे खड्डे.

जमू दे साऱ्या चौकाचौकात चाकरमान्यांचे अड्डे.

रहदारीतून बाहेर पडण्या, होऊ दे वाद अन् राडे.

बाकी ना काही उरे, भरू आपण टॅक्स अन् गाडीभाडे.

व्हायचे ते होऊ दे पण घरी सुखरूप येवढेच आता साकडे.


आवरा आता लोंढे आणि हा आत्मघातकी विकास. 

सारी धरती व्यापली, आता राहू दे थोडं खुले आकाश.

मिळू दे क्षणभर विश्रांती अन् घेऊ दे मोकळा श्वास.

सुधारणा होवो चहूकडे, थांबो लोंढ्यांचा यादिशेचा प्रवास.

विस्थापित लोंढ्यांस पुन्हा लाभो, तव कुटुंबीयांचा सहवास.

                                             संतोबा...


    


Monday, July 31, 2023

उषःकाल

                  मान्य आहे सगळीकडे अराजकता माजली आहे पण अशी कोणती परिस्थिती आहे जी शाश्वत आहे?. परिवर्तन अटळ आहे. सत्य, प्रेम, न्याय शाश्वत आहे. द्वेषाची, विषमतेची भयाण काळरात्र सरून समतेची सोनेरी पहाट नक्कीच उजाडेल. सतत द्वेषाची गरळ ओकणाऱ्या वैशाख वणव्यासारख्या या काळात परस्पर सौहार्द्रयाची पालवी बहरेल. स्वतःच्या डोळ्यातील मुसळ न बघता दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ शोधून झुंडीने येऊन निर्दयीपणे लचके तोडणाऱ्या हिंस्त्र श्वापदांचा निःपात होईल. दुसऱ्यांच्या आयुष्यात वांझोट्या अस्मितांची ठिणगी टाकून त्यांच्या आयुष्य-भविष्याची राखरांगोळी करणाऱ्या कारस्थानी लोकांना त्याच आगीच्या झळा सोसाव्या लागतील. आपल्या कुळातील व्यक्तीच्या राईएवढ्या कर्तुत्वाला पर्वताएवढे भासवून त्याचे उदात्तीकरण व दुसऱ्याच्या पर्वताएवढ्या कर्तुत्वात काहीना काही खुसपट काढून त्या व्यक्तीला बदनाम करणाऱ्या कपटी लोकांच्या वंशश्रेष्ठत्वाचा मुखवटा गळून पडेल.  

                    जेव्हा प्रत्येकाला आपआपले अंगभूत कलाकौशल्य दाखवण्याची संधी मिळेल आणि सृजशीलता ही कोणाची मक्तेदारी नाही याचे भान येईल तेव्हा चांगल्या गोष्टींची उचलेगिरी करून, जे श्रेष्ठ ते आम्हीच निर्माण करू शकतो असा संकेत प्रस्तापित करून इतरांमध्ये न्यूनगंड निर्माण करणाऱ्या कावेबाजांचा कावा उघडा पडेल. कर्तृत्वाचे, संस्कृतीचे, वर्तणुकीचे आपल्याला सोईस्कर असे मापदंड ठरवून बहुजनांमध्ये न्यूनगंड निर्माण करून ठेवणाऱ्या अभिजनांचे पितळ उघडे पडेल. पांढरपेशी क्षेत्रात आपले वर्चस्व अबाधित रहावे म्हणून कंपूशाहीच्या माध्यमातून इतरांना संधी नाकारून, येणकेन प्रकारे सर्व क्षेत्रातील धोरण ठरवण्याची अधिकारपदे ताब्यात ठेऊन इतरांच्या आयुष्याची धूळधाण करणाऱ्या धूर्त लोकांची मक्तेदारी संपुष्टात येईल. वैयक्तिक जीवनात सुधारणावादी असणाऱ्या पण सामाजिक जीवनात समाजविघातक रूढीपरंपरांचे समर्थन आणि साधनसुचीतेचे अवडंबर माजवून इतरांना कर्मकांडात गुंतवून अज्ञानाच्या, दारिद्र्याच्या अंधकारात खितपत ठेऊन आपल्याला स्पर्धा निर्माण होऊ न देण्याची काळजी घेणाऱ्या कलमकसायांचे मनसुबे धुळीस मिळतील.

                    हे सगळे होईल पण ते अनासाये होईल या भ्रमात राहुन चालणार नाही त्यासाठी निकराची लढाई लढावी लागेल आणि ती लढताना प्रसंगी स्वतःला धुळीस मिळायची तयारी ठेवावी लागेल. कारण ही लढाई तोलामोलाची नाही कारण एका बाजूला साम, दाम, दंड, भेद याचा पुरेपूर वापर करणारा समाजविघातक प्रतिस्पर्धी आणि दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत नीतिमत्तेने, न्यायाने लढा लढण्याचा वसा घेतलेले समाजाभिमुख कार्य करणारे विवेकशील पुरोगामी. त्यात जरा जरी गफलत झाली तर क्षणात बाजू पलटायला वेळ लागणार नाही कारण शोषित, पीडित अर्थात फिर्यादीलाच गुन्हेगार ठरवून बाजू पलटवण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिवाय हे मूठभर असून एवढे डोईजड कसे तर बुद्धीभेद करण्यात ते पटाईत आहेत. त्यासाठी देव, देश, धर्म, संस्कृती, इतिहास, महापुरुष या अस्मितेंच्या गोष्टींचा वापर केला जातो व त्यामागे या गोष्टींचे संवर्धन वा कोणताही उदात्त हेतू नसून किशोरवयीन पिढीचा बुद्धीभेद करून त्यांना झोंबी (स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची कुवत नसलेला) बनवण्याचा व त्यांचा वापर त्यांचे ईप्सित साध्य करण्यासाठी करून घेणे हा असतो. हा झोंबी वर्ग सांख्यिकीयदृष्ट्या सर्वात मोठा आहे. समाजकंटकांनी चिथावणीखोर वक्तव्य करून, दुसऱ्यांबद्दल द्वेष, भिती निर्माण करून या तरुणांची माथी भडकवून, विचारशक्ती नियंत्रित केली आहे पण याची जाणीव या तरुणांना नाही. मार्क ट्वेन म्हणतो त्याप्रमाणे "लोकांना फसविणे सोपे आहे पण त्या लोकांना तुम्ही फसवले गेले आहात हे पटवून देणे कर्मकठीण असते. आपल्याला या तरुणांना विवेकवादाच्या सन्मार्गावर आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागेल.

                      आपला संघर्ष हा कोणाला संपविण्यासाठी नाही, कोणावर वर्चस्व गाजवण्यासाठी नाहीतर सगळ्यांना नैसर्गिक, मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आहे आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी आहे. आज जरी हे बहुसंख्य बुद्धीभेद झालेले तरुण आपल्या विरोधात असले तरी त्यांना आपल्या विरोधात उभं करून हा संघर्ष लढता येणार नाही.  काहीतरी उदात्त, पुण्याचे दैवीकार्य त्यांचा हातून घडत आहे ह्या भ्रमात ही तरुण मंडळी आहेत. त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे की तुमच्या आयुष्याची भविष्याची आहुती कोणत्या दैवी कार्यासाठी नसून समाजकंटकाचे विकृत मनसुबे तडीस नेण्यासाठी आहेत. सतत तुम्हांला काही न काही कृती आराखडा देऊन कट्टर बनवले जाणार, कोणतेही विध्वंसक कृत्य करताना तुम्ही आघाडीवर असणार आहात. प्रत्येक संकटात, अडचणीच्या वेळी तुमचाच बळी जाणार आणि ज्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची राखरांगोळी केली ते लोक नामानिराळे राहणार. त्यांच्यासाठी लढताना तुम्ही त्यांच्यासाठी ढाल-तलवार आहात, तर त्यांच्या अधिकारांची,सत्तेची पालखी वाहताना तुम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहात, तुम्ही सेवा करावी आणि त्यांनी मेवा खावा हीच खरी तजवीज आहे.  या वाट चुकलेल्या तरुणांची सद्सदविवेक बुद्धी जागृत करायला हवी. त्यांची हेटाळणी न करता त्यांना आपुलकीने जवळ करायला हवे, त्यांना भल्याबुऱ्याची जाणीव करून द्यायला हवी.समाजाभिमुख कार्य करणाऱ्या समूहाची ही मोठी जबाबदारी ही आहे की कोणत्याही वादग्रस्त वक्तव्याचा समचार घेताना, कोणत्याही बऱ्यावाईट घटनवेर टीका करताना वा बाजू घेताना ती निरपेक्षपणे करावी त्यात एका विशिष्ट जात,धर्म, समुहालाच लक्ष्य केले जातेय अशी भावना निर्माण होऊ देऊ नये अन्यथा आपली बाजू न्याय्य असतानादेखील समोरच्या व्यक्तीला ती पटवून देणे कठीण जाईल. 

                       या वाट चुकलेल्या तरुणांना हे पटवून द्यावे लागेल की तुम्ही प्रगत झालात तर देश प्रगत होईल, तुम्ही नीतिमत्तेने वागलात तर देव प्रसन्न होईल, तुम्ही अनिष्ट रूढी परंपरा नाकारल्या तर धर्म वाढेल. तुम्ही उच्चशिक्षित झालात, समता, स्वातंत्र्य, न्यायाच्या तत्वाने वागालात तर सर्व महापुरुषांचा सन्मान होईल, तुम्ही समाजातील सर्व घटकांचा सन्मान केलात तर आपली संस्कृती महान ठरेल. तुम्ही द्वेष, तिरस्कार, वर्चस्ववाद त्यागला तर स्वत:च्या आणि येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक निकोप, निरोगी, सुरक्षित समाज निर्माण होईल. जिथे प्रत्येकाला कसलेही ओझे न बाळगता मुक्तपणे वावरता येईल.प्रत्येकाच्या नैसर्गिक, मूलभूत हक्कांचे संवर्धन, संरक्षण होईल. समाजाची वर्चस्ववादी मानसिकता बदलून, समतावादी मानसिकता निर्माण होईल. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा कोणत्याही क्षेत्रात कोणाचीही मक्तेदारी, कंपूशाही नसेल. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कौशल्यानुसार, आवडीनुसार त्या त्या क्षेत्रात प्रगती करण्याची समान संधी उपलब्ध होईल. प्रत्येकाला आपापल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. एखादी अनिष्ट रुढी, परंपरा, समूहाचा सामाजिक संकेत पाळला नाहीतर सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकणे असले प्रकार घडणार नाहीत. समाजात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित होईल, प्रगतीशील दुष्टिकोन बाळगणारा समाज निर्माण होईल.                                                                                                    

                                                                                                                                              संतोबा...



Sunday, February 5, 2023

हिंडेनबर्ग आणि अदानी समूह

 हिंडेनबर्ग काही अधिकृत संस्था नाही. त्याला उत्तर द्यायला ना अदानी समूह बांधील आहे ना सरकार. शिवाय हिंडेनबर्गने असा काय जावईशोध लावला आहे, भारतातील कित्येक देशद्रोह्यांना असे प्रश्न नेहमी पडतच होते. एखादी व्यक्ती, संस्था प्रगती करत असेल तर तिची बदनामी ही केली जातेच. अदानी समूह जागतिक पातळीवर सर्वोच्च पातळीवर जाण्यापासून केवळ एक पाऊल दूर होता. जगात भारतीय समूह नंबर एकवर असणे हा केवळ अदानी समूहाचा सन्मान नव्हे तर संपूर्ण देशाचा सन्मान झाला असता. अशी कामगिरी गेल्या सत्तर वर्षात आपल्याला करता आली नव्हती, मोठ्या मुश्कलीने ही संधी आली असताना अशी काहीतरी खळबळजनक घटना घडवून कपटीपणाने आपल्याला तिथे पोहचण्यापासून रोखले गेले. हा केवळ अदानी समुहच नव्हे तर अखंड भारताच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला आहे आणि तो आपण प्राणपणाने लढून (अदानी समूहात गुंतवणूक करून)परतवून लावला पाहिजे. शेवटी राष्ट्रप्रथम मानणारे आपण आहोत, देश टिकला तर आपण टिकू. पैसा, संपत्ती काय आज आहे उद्या नाही पण परवा पुन्हा कमवता येऊ शकते.प्रसंगी आपण आहे ती सर्व संपत्ती विकून, गहाण ठेऊन काहीही करून अदानी समूहात गुंतवणूक करून त्याचे शेअर्स कसे वाढतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपला मित्र परिवार, नातेवाईक व इतरांना देखील असे करण्यास भाग पाडावयास हवे व अदानी समूह आणि पर्यायाने भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यास हातभार लावायला हवा. एलआयसी, एसबीआय यांनी देशद्रोह्यांच्या नाकावर टिच्चून उगीच अदानी समूहात गुंतवणूक केली आहे का, आज जे देशद्रोही एलआयसीवर टीका करत आहेत त्यांना एवढाही शहाणपणा नाही की, लोकांनी केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन आहे. पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत हे क्षणिक संकट टळून गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेलच आणि नाही मिळाला तरी काय असा फरक पडणार आहे. आपण आपल्याकडचे अतिरिक्त पैसे आहेत ते आपण गुंतवतो आहोत, आपण एवढ्या वेगाने प्रगती करत आहोत की आपली पॉलिसी मॅच्युअर होईपर्यंत जी रक्कम मिळणार आहे ती त्यावेळी आपल्यासाठी क्षुल्लक असेल तिची आपल्या गरजही आपल्याला नसेल. खरंतर ही सुवर्णसंधी आहे देशसेवेच्या यज्ञात आपली आहुती देण्याची व आपले देशकर्तव्य पार पाडण्याची. आज आपण आपली सगळी संपत्ती विकून देशहितासाठी अदानी समूहात गुंतवणूक केली तर आपण विक्री केलेल्या संपत्तीचे कागदपत्र हा आपला अमूल्य खानदानी ठेवा ठरेल, आपल्या येणाऱ्या पुढील पिढ्या आपले हे बलिदान कधीच विसरणार नाहीत.

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!