Ads 468x60px

Sunday, January 15, 2017

दिल्या घरी सुखी रहा !!!

सध्या महिन्यातील तीन-चार दिवस तरी कोर्टात जात असतात. बहुतेक वेळा दिवसभर थांबूनदेखील पुढच्या तारखेपेक्षा जास्त काही हाती लागत नाही. अध्ये-मध्ये चोपदाराची येणारी "अमुक-तमुक हाजिर हो" ची ललकारी वगळता कोर्टाच्या आवारात भरपूर लोक असून देखील एक प्रकारची  निरव शांतता असते. बहुतेक जण शून्यात नजर लावून बसलेले असतात. वर्षानुवर्षे हेलपाटे घालूनही हाती काहीच न लागल्याचे  वैषम्यही चेहर्यावर झळकत असते. बहुतेक वाद भाऊबंदकीचेच असतात, सध्याच्या स्री-पुरूष समानतेच्या काळात त्यात आता भावा-बहिणींच्या वादाचीही भर पडली आहे. आम्हीसुद्धा त्यासाठीच नाईलाजाने कोर्टाच्या वार्‍या करत आहोत. नात्यांना मान-अपमान, हेवेदावे आणि गैरसमजाचा विकार जडला की कोर्टाची पायरी चढावी लागते. कोर्टात नात्यांची चिरफाड करून त्यांचे दहन होत असते त्यामुळेच दवाखाने आणि स्मशानानंतर उदास कुठे वाटत असेल तर ते कोर्टात.
       शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव मी मागील अडीच वर्षांपासून घेत आहे. कोर्ट कचेरीचे झंझट नको असे वाटते पण काही गोष्टीं टाळता येत नाहीत. कोर्टात संपूर्ण दिवस व्यर्थ जात असताना फार वाईट वाटते, ह्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा असे नेहमी वाटते पण तिथल्या सुतकी वातावरणात काही सुचतच नाही. आजूबाजूची वृद्ध,असहाय, पिडीत लोकं पाहून मन विषण्ण होते. त्यांच्यासाठी काय करता येईल हा वांझोटा विचार करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही कारण मीही त्यांच्यापैकीच एक पिडीत आहे. त्यामुळे फार तर आजूबाजूच्या व्यक्ती न्याहाळून त्यांचा मनात काय चालले असेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो. असाच एकदा बसलेलो असताना बाजूला बसलेल्या पाच-सहा बायकांची कोणातरी त्यांच्यादृष्टीने वाईट असणार्‍या व्यक्तीबदद्ल चर्चा चालू होती आणि काहीवेळात चर्चेचा ओघ त्या व्यक्तीवरून त्याच्या मुलीवर आला होता. महिन्याभारपूर्वी लग्न झालेल्या त्या मुलीला अवघ्या पंधरवड्यात वैधव्य आलं हे त्यांच्या बोलण्यातून कळले. 
            पंधरा दिवसात वैधव्य! किती दुःखदायक बाब आहे. आणि त्या बायका चवीने त्यावर चर्चा करत होत्या. नव्हे अभिमानाने सांगत होत्या "आमच्यात हळद उतरायच्या आत जरी मुलगी विधवा झाली तरी तिचे पुन्हा लग्न केलं जात नाही". ज्या गोष्टींची लाज वाटायला हवी त्या गोष्टीचा अभिमान कसा वाटू शकतो याचेच मला आश्चर्य वाटत होते.माणूस म्हणून आपली दिवसेंदिवस प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होत चालली आहे हे समाजातील लोकांचे विचार पाहून खात्री पटत आहे. हाच समाज एखादा पुरुष पंधरा दिवसांनीच काय पंधरा वर्षांनी विधुर झाला तरी आनंदाने दुसरे लग्न लावून द्यायला तयार असतो. आपण स्रियांना सोशिकतेची, पवित्रतेची, ईज्जतेची लेबलं चिकटवून त्यांचा छळवाद मांडला आहे. सासर-माहेरची असली-नसली खानदानी इज्जत राखण्यासाठी त्यांनी उभं आयुष्य एकटीने कंठायला भाग पाडत आहोत. केवढे हे कौर्य. स्रियांच्या इज्जतीची जर एवढीच काळजी आहे तर मग तिला घरात,समाजात दुय्यम स्थान का? कोणत्याही गोष्टीसाठी का तिला गृहीत धरले जाते? खरंतर इज्जत, पवित्रता हे सारे थोतांड आहे कारण याचा संबंध फक्त स्रियांच्या शरीराशीच जोडला जातो. या असल्या रूढी परंपरा  पुरुषी मानसिकता, अहंकार, वर्चस्ववाद, असुरक्षितता आणि संशयातून निर्माण झाल्या आहेत. स्रियांना फक्त उपभोग्य वस्तू समजून त्यांना आपल्या अधिपत्याखाली कसे ठेवता येईल हेच पाहण्यात आले आहे. जी बाई कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांमध्ये, लग्नासाठी अशुभ-अपवित्र मानली जाते ती उपभोगायला कशी चालते? असल्या रूढी-परंपरांचा हेतू स्रियांचे शोषण करणे सोपं जावे हाच आहे.  
वैधव्य कोणी मागून घेत नाही. हा किती मोठा आघात आहे अशा दुःखाच्या प्रसंगी समाज, कुटूंब म्हणून आपण तिला आधार देण्यापेक्षा अजून अडचणीत आणण्याचे प्रयत्न करतो.  सुहासिनी म्हणून पती जिवंत असताना जो मान-पान दिला जातो तो विधवा झाल्यावर लगेच निर्दयपणे हिरावून घेतो. मंगलकार्यातून बाद केले जाते. संपत्तीतून बेदखल करण्याचे प्रयत्न केले जातात.      म्हणून वेगळंपण जाणवू द्यायला नको. त्याची आठवण म्हणून  


            शेकडो वर्षांपासून कित्येक समाजसुधारकांनी वाईट चालीरीती, रूढी परंपरा  संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केले. अनेक सामाजिक सुधारणा केल्या प्रसंगी त्यासाठी आपले प्राणपणाला लावले,आयुष्यभर खस्ता खालल्या आपण मात्र त्यांच्या कार्याला जातीच्या कोंदणात अडकवले. याचाच परिपाक म्हणजे काही जातीत पुनर्विवाह सामान्य तर काही जातीत अगदी पाप. आपण महापुरुषांना देवत्व बहाल केले, त्यांचे पुतळे उभारले पण कधी विचार, वारसा आचरणात आणला नाही. आपण त्यांना जाती धर्मात बंदिस्त केल आणि त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करण्या व्यतिरिक्त दुसरं काहीही केलं नाही आणि ते ही स्वार्थासाठी समाज संघटन करण्यासाठी.






 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!