Ads 468x60px

Sunday, December 25, 2016

प्रकल्पग्रस्त- एक शासकीय आजार!!!

              ग्रस्त म्हणजे एखाद्या आजाराने,विकाराने, व्याधीने त्रस्त व्यक्ती किंवा समाज. जसे की क्षयग्रस्त, कॅन्सरग्रस्त किंवा मोठ्या नैसर्गिक संकटात सापडलेले भूकंपग्रस्त,पूरग्रस्त,दुष्काळग्रस्त. याप्रमाणेच प्रकल्पग्रस्त हा एक शासकीय आजार आणि एक मोठे संकट आहे. ग्रस्त आणि त्यालाच समानार्थी शब्द म्हणजे बाधीत दोघांचा अर्थ एकच हे शब्द कोणत्याही शब्दाला जोडून आले तरी परिणाम दुःखदच असतो. आणि ग्रस्त हा शब्द सार्थ आहे, कारण आजवर शेकडो प्रकल्प झाले पण बहुतेक ठिकाणी ज्यांच्या जमिनी-घरे गेली त्यांना पूर्ण मदत केली नाही उलट त्यांना बेघर,उपरे होऊन पिढ्यानपिढ्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला.  त्यांना ना मोबदला मिळाला ना त्यांचे पुनर्वसन झाले, झाले तर फक्त शोषण, अपमान. प्रकल्पात उद्योगपती, भूमाफिया व इतर धनदांडग्यांचाच फायदा होतो. स्थानिक विस्थापित होतात आणि उपरे प्रस्थापित होतात.  जर प्रकल्पात स्थानिक पिढीत लोकांचा फायदा होत असता तर प्रत्येक ठिकाणी प्रकल्पाला विरोध का झाला असता? उलट फायदा असता तर स्वागतच झाले असते. तसेच त्यांना प्रकल्पबाधित  किंवा प्रकल्पग्रस्त म्हणण्याऐवजी प्रकल्पलाभधारक हा शब्द प्रचलित नसता झाला का?.   
          भूत ही संकल्पना असली तरी एखाद्या भीतीने,दबावाने सैरभैर झालेल्या व्यक्तीला आपण भूतबाधा झाली असे म्हणतो अशीच भूतबाधा प्रस्थापित विमानतळामुळे पारगांव-मेमाणे आणि पंचक्रोशीतील भूमिपुत्रांची झालेली आहे. विमानतळाची घोषणा झाल्यापासून भूमिपुत्रांची तहान-भूक विसरून या एकाच विषयाने झोप उडवली आहे. हे विमानतळाचे भूत आपल्या मानगुटीवरून कसे उतरेल, त्यावर काय उतारा आहे. त्यासाठी गावात रोज सभा होत आहेत. आंदोलन , उपोषणे , काळ्या गुढ्या उभारून निषेध अशी अनेक अहिंसक हत्यारे उपसली आहेत,  पण कशाचीच मात्रा विमानतळ घालवण्यासाठी लागू पडलेली नाही. प्रसारमाध्यमे आणि सामाजिक कार्यकर्त्यानीं या विरोधाची दखल घेतली असली तरी अद्यापपर्यंत या विरोधाची दखल शासन, प्रशासनाने घेतलेली नाही. उलट शासन,प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी विमानतळ व्हावे आणि तेही त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी यासाठी हट्टाला पेटले आहेत. त्यासाठी लोकांमध्ये फूट पाडणे, अडवणूक करणे , गैरसमज पसरवणे, बदनामी करणे असे अनेक उपदव्याप चालवले आहेत. 
           असं असले तरी पारगांव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा निर्धार पक्का आहे. कितीही भरपाई दिली तरी काळया आईचा सौदा करायचा नाही, प्रकल्पग्रस्त, ऊपरे व्हायचं नाही प्रसंगी जीव गेलातरी बेहत्तर. गावातील तरुण कामधंदा सोडून जिद्दीने विमानतळाला विरोध करण्यासाठी एकजूट झाले आहेत प्रसंगी नोकरीचा राजीनामा देण्यासही आहेत. आता जर विरोध नाही केला, आंदोलने नाही केली तर आयुष्यभर प्रकल्पग्रस्ताचा शिक्का कपाळी बसेल आणि आयुष्यभर उपरे होऊन  सरकार दरबारी दयेचा कटोरा घेऊन भरपाईची भीक मागवी लागेल याची जाणीव सर्वांना आहे. कोणाचे हित कशात आहे हे ज्याचे त्याला कळते. प्रकल्पाचे महत्व सांगत असताना ते त्याचे फायदे सांगत आहेत की तोटे याचेही भान त्यांना नसते. प्रकल्पात भागीदारी मिळेल वैगेरे विनोद केले जातात. प्रकल्प झाल्यावर भागीदारी सोडा तिथे कोणाला उभे पण करणार नाहीत. ऐकिव आणि गैरसमजावर आधारित माहितीवर आपला संबंध नसताना, परिणामांची जाण नसताना नको ते सल्ले देणे हे असंवेदनशीलपणाचे लक्षणच नाही तर प्रकल्पग्रस्तांवर होणार्‍या अन्यायातील पापाची भागीदारी पण आहे. त्यांचे असे बिनबुडाचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही विषाची परीक्षा का द्यावी.
            कायदा बऱ्यापैकी भूमीपुत्रांच्या बाजूने असला तरी  प्रत्येक ठिकाणी चार-दोन अशी उपद्रवी लोकं असतात ज्यांना आपल्या दुःखापेक्षा , दुसऱ्याच्या दुःखाचा आनंद जास्त असतो. नेते वैयक्तिक हेवेदावे, स्थानिक राजकारणातील मतभेदांचा व्यवस्थित अंदाज घेऊन आपलं सावज हेरत असतात. सुरुवातीला त्यांच्याकडून विरोधाचे नाटक करून ऐनवेळेस त्यांच्याकडून विरोधाची धार बोथट  केली जाते. लोकांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जाते. हा धोका टाळण्यासाठी  प्रकल्पविरोधी लढ्याचे नेतृत्व एकहाती किंवा मूठभर लोकांच्या हातात न देता सामूहिकपणे नेतृत्व करणे गरजेचे आहे.कोणीही क्षणिक लाभासाठी कोणाच्या हाताचे बाहुले बनू नये विमानासाठी इमान कोणी विकू नये. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रकल्प नाही झाला तर विकास नाही होणार असे कधी होत नसते.
        देशातील शेतकरी, कष्टकरी समाज कदाचित दुय्यम नागरिक असावेत असे वाटते कारण जगण्याच्या संघर्षासाठी हजारोंच्या संख्येने निघणारे, मोर्चे, आंदोलने यांची नेते, मंत्री, मुख्यमंत्री  दखल घेत नाहीत पण एखाद्या सेलेब्रिटीला ठेच  जरी लागली तरी त्यांना भेटण्यासाठी वेळ असतो. पैसा, प्रसिद्धी, श्रेयवादाच्या हव्यासापोटी सत्ताधारी हे विसरून जातात कि, त्यांना सत्ता लोकशाहीच्या माध्यमातून मिळाली आहे, वंशपरंपरेने आलेली राजसत्ता नाहिये. ही सत्ता आज ना उद्या जाणारच आहे याचे भान सत्ताधारयांनी ठेऊन सर्वसमावेशक विकास केला तर सगळ्यांचाच फायद्याचा आहे.
                         ....संतोबा   (संतोष गांजुरे)

Saturday, December 24, 2016

शेती- शाश्वत विकासाचा राजमार्ग.

           पुरंदर, नाव घेतले तरी अंगावर रोमांच उभे राहतात एवढा ऐतिहासिक,सामाजिक वारसा पुरंदरला आणि आजूबाजूच्या परिसरला लाभला आहे. पुरंदर तालुका अंजीर,सिताफळ यासाठी प्रसिद्ध असला तरी भौगोलिकदृष्ट्या दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. याच पुरंदर मधील पारगांव मेमाणे हे तीन-साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव. अपार मेहनत, आधुनिक शेतीची कास, दुग्धव्यवसायासारख्या जोडधंदयाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त ही ओळख पुसून, विकासाच्या मार्गावर चाललेले गाव अशी ओळख निर्माण होऊ लागली आहे त्याचेच फलित म्हणजे आज पारगाव शिक्षक, पोलिस आणि आता इंजिनीयर्सचे गाव म्हणूनही ओळखले जात आहे.  
            चौदा-पंधरा वर्षापूर्वी मात्र गावाची विदारक परिस्थिती होती. जीवनावश्यक वस्तूंची वानवा होती. सासवड हे तालुक्याचे ठिकाण. बी-बियाणे, कीटकनाशके, खते एवढेच काय अगदी झेरॉक्स हवी असेल तरी सासवडशिवाय पर्याय नव्हता. गावात दूध संकलन नव्हते तर त्यासाठी रोज सासवड किंवा बेलसर याठिकाणी दूध घालण्यासाठी जावे लागत असे.बहुतेक घरांत अठरावविश्वे दारिद्रय त्यामुळे घरांत गाडी नसल्याने तासनतास एसटीची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता . गावची बहुतांश घरे शेणामातीची, कौलांची होती. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, घरात वीज नाही, गॅस नाही. महिलांचे जीवन तर अधिक खडतर, दिवसभर काम करून मातीच्या चुलीवर धुरात स्वयंपाक , पाण्याची गैरसोय असल्याने दूरवरून विहीरींचे पाणी शेंदून आणणे अशी अनेक कामे स्रियांना करावी लागत. एवढे करून नेसायला दोन-तीन धडप्यांची लुगडी( दोन-तीन जुन्या लुगडयांचा चांगला राहिलेला भाग जोडुन केलेली साडी). शिक्षणाची आबाळ, शिकून फार तर डी. एड, बी. एड शिवाय वेगळा विचार नव्हता. त्यातच २००२ साली प्रचंड दुष्काळ पडला होता. पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा टॅंकरवर अवलंबुन रहावे लागत होते त्यामुळे गाई-गुरे सांभाळणे अवघड होते काही लोकांनी चारा छावणीच्या मदतीने गुरे जगवली होती. रोजगार हमी योजनेच्या कामाव्यतिरिक्त दुसरे काही काम आणि उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध नव्हते. काही लोकांवर नाईलाजाने गाव सोडण्याची वेळ आली होती. गावावर जणू अवकळाच पसरली होती. सगळीकडे उजाड ओसाड माळरान.  
                 गरीबी ही क्रांतीची जननी आहे असे म्हणतात. अशा विपरीत परिस्थितीत गावची मुले शिकली, उपलब्ध संधीनुसार शिक्षण इतर सेवा क्षेत्रात कार्य करू लागलीे त्यामुळे शेतीला आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ मिळू लागले. शेतात पाण्यासाठी विहीरी,पाईपलाईन्स , बोअरवेल्स तसेच उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी जमेल तिथे ठिबक सिंचनाची सोय केली. अधिकाअधिक पडीक जमीन लागवडी खाली आणण्यात आली. आठमाही नाही तर बारामाही शेती पिकू लागली. पूर्वी ज्वारी, बाजरी, गहू, मटकी, हुलगा . कमी पावसावर येणारी कोरडवाहू पिके तर कांदा हे एकमेव नगदी पिक घेतलं जायचे. आता कमी वेळात येणारे मेथी, कोथिंबीर, पालकाचे त्यासोबत इतरही तरकारी आणि माळव्याचे भरघोस उत्पन्न वर्षभर घेऊ लागले हा सगळा उत्पादित माल पुण्या-मुंबईला शेजारच्या बाजारपेठेत हा माल वितरित केला जाऊ लागला. डाळिंब, सीताफळाच्या बागाही लावल्या, सुरवातीला फळबागांनाच ठिबक सिंचनाने तर आता अगदी टोमॅटो, कांदयासारख्या पिकाला सुद्धा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे. त्यातच मागील काही वर्षात अनियमित का होईना पुरंदर उपसा योजनेचे पाणी मिळू लागल्याने पाण्याचा प्रश्न मिटण्याच्या मार्गावर अधिकाअधिक जमिनी बागायती होण्याच्या मार्गावर आहेत.
           मागच्या सात-आठ वर्षात गावातील शेणा मातीची घरे जाऊन बहुतेक सिमेंटची पक्की घरे झाली आहेत, घरात सुख-सुविधा आल्या आहेत. घरोघरी जीवनावश्यक गोष्टी बरोबरच मनोरंजन, दळणवळणाची स्वतःची साधने आली आहेत. मुलांना शिक्षणासाठी नामांकित शाळेत दाखल केले जात आहे. मुले फक्त आय.टी.आय मध्ये नाहीतर आता आय.टी. मध्ये शिकत आहेत, पुढे आय.आय.टीत ही शिकतील गुणवत्तेत कोणी कमी नाहीये. गावात दुग्धव्यवसाय ही प्रचंड वाढला आहे, त्यामुळे गावातच दूध संकलनासाठी दोन-तीन दूध संकलन केंद्र आहेत.बी-बियाणे, खते, कीटकनाशक यासाठी गावातच दोन दुकाने झाली आहेत. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत, त्यांच्यात कोणत्याही विपरीत परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे पारंपारिक पिके सोडून इतर जास्त उत्पन्न देणारी पिके घेण्याचे, शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस निर्माण झाले आहे. यावर्षी सुद्धा कमी पाऊस , पुरंदर उपसा योजनेचे पाणी वेळेवर सोडण्याचा शासन-प्रशासनाचा आडमुठेपणा, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संकट असतानादेखील दररोज शेकडो पोती पावटा, तूर , वाटाणा यांचे उत्पन्न घेऊन बाजारपेठेत पाठवले जात आहे. गावातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळेच कोणत्याही संकटाने कोलमडून, खचून जाता संकटावर मात करताना दिसत आहेत. 
          शेतीच्या माध्यमातून झालेला हा विकास शाश्वत आहे आणि तो असाच होत राहिल. विकास काही एका रात्रीत होत नसतो, त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मागच्या दहा-एक वर्षात पारगांवाने नेत्रदीपक प्रगती केली आहे. आजूबाजूच्या इतर गावांचीसुद्धा कमी-अधिक फरकाने अशीच प्रगती होत आहे. वर्षानुवर्षे दुष्काळग्रस्त असलेली ओळख पुसून मोठ्या जिद्दीने , कष्टाने मळे, बागा फुलवल्या आहेत. पुढील पाच एक वर्षात महाराष्ट्रातील आदर्शवत गावं म्हणून पारगाव उदयास येईल गावोगावची लोकं हा विकास, प्रगती पाहण्यासाठी भेटी देतील याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही.                                                                                    
                                                            ........संतोबा   (संतोष गांजुरे)

 

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखांविषयी काही थोडेसे !!!

माझ्या लेखणीविषयी काही थोडेसे !!!

ती कोणी अप्सरा वा परी नाही किवा घरंदाज खानदानातील नाही. तिला ना अलंकराची जाण ना साजशृंगाराची हौस. नटूनथटून, साजशृंगार करून एखाद्या वेश्येप्रमाणे मनोरंजन करणे हे ही तिला पटत नाही. ती अशीच आहे,डोंगरदर्यातिल,ओसाड,उजाड़ माळरानावरची राकट,रांगडी,रोखठोख.मोडक्या-तोडक्या झोपडयात विसावणारी. काट्याकुटयातुन,झाडाझुडपातून,दगडधोंडयातुन एखाद्या अवखळ कारवानी घोड्याप्रमाणे धावणारी. ती अशीच आहे आपल्यापेक्षा श्रीमंताची गरीबी पाहून हळहळणारी. ती कशी ही असू दे व्यभिचारी मात्र नक्कीच नाही कारण . ती माझी लेखणी आहे.

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!

आणि थोडेसे माझ्या विषयी !!!